Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पडद्याआडून - 'ए भाऊ, डोकं नको खाऊ!!' दमदार संकल्पनेचं सैलसर सादरीकरण

पडद्याआडून - 'ए भाऊ, डोकं नको खाऊ!!' दमदार संकल्पनेचं सैलसर सादरीकरण

सामना 2 weeks ago

>>परागखोत

1998 सालच्या 'ला डिनर डी कॉन्स' अर्थात 'डिनर गेम' या एका आगळय़ावेगळय़ा थीमवर आधारित एका फ्रेंच कॉमेडीने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली होती.

नंतर भारतीय प्रेक्षकांसाठी त्या कथेची अनेक भारतीय रूपे विविध माध्यमांतून समोर आली. सागर बेल्लारी दिग्दर्शित 2007 सालचा 'भेजा फ्राय' हा सिनेमा आवडला होता. त्याच काळात अभय परांजपे यांनी या फ्रेंच नाटकावर आधारित 'ए भाऊ, डोकं नको खाऊ' हे फार्सिकल नाटक लिहिलं. संतोष पवार दिग्दर्शित या नाटकात ऋषिकेश जोशी आणि अतुल परचुरे प्रमुख भूमिकेत होते. त्यावेळी या नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या नाटकाचे जवळपास तीनशेच्या वर प्रयोग झाले होते. त्यानंतर आता वीस वर्षांनी तेच नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आलंय. मध्यंतरीच्या काळात अभिनेता अतुल परचुरे यांचं अकाली निधन झालं. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून रॉयल थिएटर्स हे नाटक रंगभूमीवर घेऊन आले आहेत. त्यात अतुल परचुरे यांनी गाजवलेली भूमिका साकार करतायत त्यांचेच सुहृद आणि नामवंत विनोदी अभिनेते विनय येडेकर, तर ऋषिकेश जोशी यांनी केलेल्या भूमिकेत स्वतः दिग्दर्शक संतोष पवार आपल्यासमोर येतात.

दिग्दर्शक दिवाकर थोटे एका टीव्ही मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ते आटपून त्याला त्याच्या मित्रांसोबत दर बुधवारी होणाऱ्या एका 'खास' पार्टीसाठी जायचंय. तत्पूर्वी एक ऑडिशन आटपायची आहे. त्याच्या बायकोला, सुरुचीला एका वेगळय़ाच पार्टीला जायचंय, पण दिवाकरला तिथे जायचं नाही. कारण मित्रांसोबतची त्याची ती बकरा पार्टी त्याला चुकवायची नाहीये. या पार्टीत ते एका इनोसंट गेस्टला बोलावून त्याची यथेच्छ टिंगल करतात आणि ती पार्टी एन्जॉय करतात. अशातच त्र्यंबक शिंत्रे हा ऑडिशन द्यायला आलेला नमुना दिवाकरला हा त्यांच्या त्या दिवशीच्या पार्टीला गेस्ट म्हणून अगदी योग्य आहे हे जाणवतं आणि तो त्याला त्या पार्टीचे आमंत्रण देतो.

त्यानंतर होणारा समजुतीचा घोटाळा आणि त्याची उकल म्हणजेच हे नाटक होय. विशेष म्हणजे पार्टीत मामा करायचा म्हणून ज्याची निवड झालीय तो त्र्यंबक शिंत्रेच या सगळय़ांना पुरून उरतो आणि या सगळय़ांची नकळत फिरकी घेतो हे या नाटकाचे कथासूत्र आहे. या नाटकात दिवाकर थोटे आहे, त्याची व्यावसायिक सहकारी असलेली, मोना नावाची त्याची एक प्रेयसी आहे, त्याची लग्नाची बायको सुरुची आहे, तिचा एक जुना मित्र सचिन आहे, त्यांचा फॅमिली डॉक्टर कम फ्रेंड असलेला डॉ. मोने आहे, अक्षय मेहता नावाचा एक मोठा निर्माता आहे आणि या सगळ्यांना आपल्या निरागसतेने सळो की पळो करून सोडणारा या नाटकाचा नायक, 'ए भाऊ?? म्हणजे त्र्यंबक दत्तात्रेय शिंत्रे आहे.

दोन दशकांपूर्वी आलेलं आणि तेव्हा विषयाच्या ताजेपणामुळे भावलेलं हे नाटक आज तितपंसं अपील होत नाही आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे काळानुरूप अपेक्षित असलेले बदल त्यात दिसत नाहीत. नेपथ्य आणि मांडणी वेगळी केली असली तरी त्यातील आशय तोच जुना आहे. इथे विनोदनिर्मितीचा खटाटोप आहे आणि नवे कलाकार त्यांच्या भूमिकांना न्याय देऊ शकलेले नाहीत. दिग्दर्शक संतोष पवार यांनी संहितेत काही बदल केल्याचे जाणवते. मध्यवर्ती भूमिकेत असलेले एक विनय येडेकर सोडता इतर कोणाचाही प्रभाव पडत नाही. संतोष पवारांची स्वतःची एक टिपिकल शैली आहे, जी लोककलांच्या माध्यमाला अधिक पूरक आहे. त्यांच्या विनोदाची जातपुळी वेगळी आहे. त्यांच्या विनोदाला एक ठसका असतो ज्यामुळे कधीकधी पांढरपेशा प्रेक्षकाला ठसका लागू शकतो. त्यांनी या आधी दिग्दर्शित केलेल्या 'मर्डरवाले पुलकर्णी' आणि 'हीच तर फॅमिलीची गंमत आहे' या दोन नाटकांत अशीच अडचण झाली होती. त्यांनी केलेल्या या नाटकाच्या बांधणीत थोडासा सैलसरपणा जाणवतो. ती अधिक बांधेसूद व्हायला हवीय. लेखनात पेरलेले अपेक्षित लाफ्टर्स वसूल करण्यात नटमंडळी कमी पडतात. मात्र या नाटकाच्या तांत्रिक बाजू जमून आल्या आहेत. संदेश बेंद्रे यांचं नेपथ्य देखणं झालंय. रंगसंगती खास. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना उत्तम आहे. आशुतोष वाघमारे यांचं संगीत आश्वासक आहे.

विनय येडेकर यांनी साकारलेला त्र्यंबक शिंत्रे या नाटकाचा हायपॉइंट आहे. त्यांची अंगभूत निरागसता भूमिकेला पूरक ठरते. संतोष पवार यांच्यासोबत त्यांनी गाजवलेल्या 'दिनूच्या सासूबाई राधाबाई' या नाटकामुळे त्या दोघांचे टय़ुनिंग छान आहे. संतोष पवार सहजपणे काम करतात खरे, पण कधीकधी ती सहजता आहे की निरुत्साह, असा प्रश्न पडतो. पीजेलाही हमखास टाळय़ा घेणारा त्यांच्यातला लेखक-दिग्दर्शक पुठेतरी हरवल्यासारखा वाटतोय. सोबत आनंदा कारेकरसारखा हरहुन्नरी विनोदवीर असताना त्याचा वापर करून घेण्यात आलेला नाही.

'बात पुछ जमीं नहीं' असं या नाटकाच्या बाबतीत होतं. काही चमकदार प्रसंग आणि चटपटीत संवाद आहेत, पण कथाविषयाच्या परिचयामुळे नाविन्य संपतं. एपंदरीत नव्या संचातील हा भाऊ, डोकं खाणारा ठरतो.

nलेखन अभय परांजपे

nदिग्दर्शन संतोष पवार

nकलाकार विनय येडेकर, आनंदा कारेकर, सोनाली मगर, सानिका शिंदे, संकेत बिवलकर, आदित्य गटे आणि संतोष पवार

nनेपथ्य संदेश बेंद्रे

nप्रकाश शीतल तळपदे

nसंगीत आशुतोष वाघमारे

nवेशभूषा हास्या पवार

nनिर्माता मिहिर गवळी

nसूत्रधार नितीन नाईक, दीपक जोशी

nछायाचित्रसौजन्य संजय पेठे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana