Dailyhunt
पहिल्याच दिवशी दोन ट्रक केबल जप्त, ओव्हरहेड विरोधात पालिकेची कारवाई

पहिल्याच दिवशी दोन ट्रक केबल जप्त, ओव्हरहेड विरोधात पालिकेची कारवाई

सामना 0 months ago

पुणे शहरातील अनधिकृत ऑप्टिकल फायबर केबल्सच्या जंजाळावर नियंत्रण आणण्यासाठी पुणे महापालिकेने अखेर धडक कारवाई सुरू केली असून गुरुवारी सातारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात केबल्स हटविण्यात आल्या.

या कारवाईत तब्बल दोन ट्रकभर केबल जप्त करण्यात आल्या.

महापालिकेच्या विद्युत, अतिक्रमण व अग्निशमन विभागाच्या संयुक्त पथकाने पोलिस बंदोबस्तात ही मोहीम राबविली. आदिनाथ सोसायटी परिसरापासून सुरू झालेली कारवाई पुष्प मंगल कार्यालय, उत्सव इमारत परिसर, राजर्षी शाहू महाराज सोसायटी, पुण्याई नगर आणि धनकवडी भागात करण्यात आली. हायड्रॉलिक क्रेनच्या सहाय्याने खांब, झाडे आणि इमारतींवर टाकलेल्या केबल्स काढण्यात आल्या. महापालिकेच्या माहितीनुसार, जानेवारीपासून सुरू असलेल्या प्राथमिक कारवाईत आतापर्यंत 123.6 किलोमीटर लांबीच्या अनधिकृत केबल्स हटविण्यात आल्या आहेत. नव्या टप्प्यात ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. केबल्स हटवल्यानंतर पुन्हा टाकल्या जातात. त्यामुळे याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

कारवाईनंतर नेटवर्क विस्कळीत

कारवाईनंतर संबंधित परिसरातील मोबाईल व इंटरनेट सेवा काही काळ विस्कळीत झाली. नामांकित दूरसंचार कंपन्यांच्या केबल्सही हटविण्यात आल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. महापालिका व पोलिसांच्या सीसीटीव्ही यंत्रणेशी संबंधित केबल्स मात्र वगळण्यात आल्या.

अनधिकृत केबल्सविरोधातील कारवाई नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार आहे. एका दिवसात सुमारे १० किलोमीटर परिसरातील दोन ट्रकभर केबल्स हटविण्यात आल्या.
- मनिषा शेकटकर, प्रमुख, विद्युत विभाग, पुणे महापालिका

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana