Thursday, 14 Oct, 11.40 am सामना

विदेश
पाकिस्तानात महागाईला उकळी; हिंदुस्थानची साखर नाकारणाऱ्या पाकड्यांचं चहानं तोंड पोळलं

हिंदुस्थानला येन केन प्रकारेण त्रास देण्यासाठी तत्पर असलेल्या पाकिस्तानला शेवटी तोंडावर आपटावे लागते हा इतिहास आहे. आता देखील तसेच झाले आहे. पाकिस्तानमध्ये महागाई प्रचंड वाढली आहे. गेल्या एक वर्षात महागाईने कळस गाठला आहे. पाकिस्तानच्या शहरांमध्येच नाही तर खेड्यापाड्यात दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणि पदार्थांचे दर वाढल्याचे चित्र आहे. एकवेळचा चहा देखील महागला आहे. पाकिस्तानने हिंदुस्थानातून साखर खरेदी केली असती तर त्याचा त्यांनाच फायदा झाला असता. मात्र त्यांनी हिंदुस्थानातून साखर आयात करणार अशी भूमिका घेतल्याने त्याचेच तोंड कडू पडले आहे.

रावळपिंडीत चहा महाग झाल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. इथे एक कप चहासाठी नागरिकांना तब्बल 40 रुपये इतकी किंमत मोजावी लागत आहे. पाकिस्तानचे प्रमुख्य वृत्तपत्र 'डॉन' ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार एक कप चहासाठी आतापर्यंत 30 रुपये मोजावे लागत होते. आता मात्र एक कप चहाची किंमत 40 रुपये इतकी महाग झाली आहे. चहा पत्ती, टी बॅग्स, साखर, दूध आणि गॅस सर्वांचीच किंमत वाढल्याचा परिणाम चहाच्या दरवाढीवर झाला आहे. दरात तब्बल 35 टक्क्यांची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार दूधाचे दर 105 रुपये लिटर वरून 120 रुपये प्रतिलिटर इतके झाले आहेत. तर चहापत्ती 800 रुपयांवरून आता 900 रुपयांवर पोहोचली आहे. गॅसचे दर देखील 1500 ते 3000 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे चहाचे दर प्रचंड वाढले आहेत. अब्दुल अजीज नावाच्या एका चहावाल्याने आपली परिस्थिती कठीण आहे त्याचा हिशोबच मांडला आहे. माझी दिवसाची एकूण कमाई 2600 रुपये आहे. त्यातून इतर सर्व खर्च वजा केल्यानंतर निव्वळ नफा अवघे 15 रुपये आला. आता 15 रुपयात दिवस कसा ढकलायचा अशा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे.

चहाच्या किमती वाढल्याने दिवसाला चार-पाच कप चहा ढोसणाऱ्य़ा ग्राहकांनी देखील आता एक किंवा दोन कप चहावर समाधान मानण्यास सुरुवात केली आहे. तर अनेकांनी आपण चहा सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सतत वाढणाऱ्या महागाईवर नियंत्रण कसे आणायचे असा प्रश्न पाकिस्तानच्या इम्रान खान यांच्या सरकारसमोर पडला आहे. हिंदुस्थानी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानने दोन्ही देशांमधील संबंध चांगले ठेवण्याचे प्रयत्न केले असते तर त्यांच्यावर आज ही वेळी आली नसती.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top