Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पनवेलमधील ६४ इमारती कधीही कोसळतील, घरे तातडीने रिकामी करण्याचे पालिकेचे आदेश

पनवेलमधील ६४ इमारती कधीही कोसळतील, घरे तातडीने रिकामी करण्याचे पालिकेचे आदेश

सामना 2 weeks ago

नवेल महापालिकेने धोकादायक इमारतींच्या केलेल्या सर्वेक्षणात ६४ इमारती या सी-१ प्रवर्गात म्हणजेच अतिधोकादायक असल्याचे आढळून आले आहे. या इमारती पावसात कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने मोठी जीवितहानी होण्याची भीती आहे.

त्यामुळे या इमारतींमध्ये वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांनी तत्काळ घरे रिकामी करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. तशा नोटिसाच प्रशासनाने बजावल्याने ऐन पावसाळ्यात दुसरे घर शोधायचे तरी कुठे, असा प्रश्न शेकडो कुटुंबीयांना पडला आहे.

पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पालिका प्रशासनाने चारही प्रभाग समित्यांमध्ये धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले. यात ६४ इमारती अतिधोकादायक असल्याची बाब समोर आली. या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे निर्देश प्रशासनाच्या स्वतीने देण्यात आले असून रहिवाशांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी जीवितहानी टाळण्यासाठी तातडीने घरे रिकामी करून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.

अतिधोकादायक इमारतींची यादी

महापालिकेच्या चारही प्रभाग समित्यांमध्ये धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये प्रभाग समिती अ (खारघर) येथे ४, प्रभाग समिती ब (कळंबोली) येथे २०, प्रभाग समिती क (कामोठे) येथे ८ आणि प्रभाग समिती ड (पनवेल) येथे ३२ अशा एकूण ६४ इमारतींचा अतिधोकादायक यादीत समावेश करण्यात आला आहे.

अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना वेळोवेळी नोटिसा बजावून सदनिका रिकाम्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र तरीही काही रहिवासी अतिधोकादायक इमारतींमध्ये राहात आहेत.

पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे इमारती कोसळण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे कोणतीही जोखीम न पत्करता नागरिकांनी त्वरित सुरक्षित ठिकाणी स्थलांतर व्हावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. सर्व अतिधोकादायक इमारतींच्या मालकांना तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याच्या नोटिसा धाडल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana