Thursday, 04 Mar, 9.15 am सामना

ठळक
पाणीपुरवठय़ाच्या गोंधळावरून स्थायी समितीत खडाजंगी

मुंबईतील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठय़ाच्या गोंधळामुळे रहिवाशांचे हाल होत आहेत. याबाबत संबंधित विभागांकडे तक्रार केल्यानंतर प्रशासनाकडून तात्पुरती आणि संबंधित विभागापुरतीच कार्यवाही केली जाते. पाणीपुरवठय़ातील या गोंधळावरून स्थायी समितीत आज प्रचंड खडाजंगी झाली. शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी प्रशासनाला धारेवर धरले. प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आली.

मुंबईच्या विविध भागांत पाणीपुरवठय़ाच्या अनियमिततेचा निषेध करीत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीच्या सुरुवातीलाच सभा तहकुबी मांडली. याला सर्वपक्षीयांनी जोरदार पाठिंबा दिल्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सभा तहकूब केली. जलाशयांची डागडुजी आणि जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम असल्याचे सांगत पाणीपुरवठय़ाच्या वेळा बदलल्या जातात, पाणीपुरवठय़ात कपात केली जाते. अचानक ही कामे केली जात असल्यामुळे नागरिकांचे मात्र हाल होत असल्याचे रवी राजा यांनी सांगत शीव परिसरातील स्थिती मांडली.

यावेळी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्यासह शिवसेनेचे प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, संजय घाडी, राजुल पटेल, सुजाता पाटेकर, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांच्यासह राष्ट्रवादीच्या राखी जाधव यांनी देखील तलावांत पाणीसाठा पुरेसा असतानाही काही अधिकाऱयांच्या नियोजनशून्य कारभारामुळेच मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगित प्रशासनाचा निषेध केला.

पालिका म्हणते

दुरुस्तीचे काम सुरू असले तरी उपलब्ध जलवाहिन्यांमधून तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिले. मुंबईचे वाढते औद्योगिकीकरण, नागरिकीकरणामुळे पाण्याची मागणी वाढली असून उपलब्ध व्यवस्थेवर ताण वाढल्याचेही काकाणी यांनी कबूल केले. मात्र पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी दीर्घकालीन योजना आणि सद्यस्थितीत पुरवठा सुरळीत करण्यासाठी 'अल्पकालीन' उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. शिवाय पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी 'पाणीशिक्षणा'सारख्या योजना राबविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

भायखळ्यात वितरणाचा फज्जा

पालिकेचा ई विभाग म्हणजेच भायखळ्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी वितरणाचा फज्जा उडाल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. आपल्या स्वतःच्या घरालाच गेल्या सात दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे संपूर्ण मुंबईचा आढावा घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top