Thursday, 08 Apr, 9.28 am सामना

ठळक
परीक्षा हेच आयुष्य नव्हे, तो आयुष्यातला एक लहान टप्पा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

'परीक्षा अचानक येत नाही आणि जे अचानक येत नाही त्याची भीती कशाला बाळगायची? आणि भीती तुम्हाला परीक्षेची नसतेच, भीती असते ती या भावनेची की परीक्षाच सर्व काही आहे आणि याला कारणीभूत आपल्या आजूबाजूची मंडळी असतात. म्हणूनच पालकांनी हे ध्यानात घ्या की परीक्षा हेच आयुष्य नव्हे, तो आयुष्यातला एक लहान टप्पा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण देऊ नका, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाची सुरुवात करीत विद्यार्थ्यांना धीर दिला.

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी लाइव्ह संवाद साधला आणि विद्यार्थ्यांना परीक्षेतील ताण व्यवस्थापनाचे धडे दिले. हा कार्यक्रम यंदा प्रथमच कोरोनामुळे व्हर्च्युअल पद्धतीने झाला. यावेळी मोदी म्हणाले, 'पूर्वी पालक विद्यार्थ्यासोबत सहज संवाद साधायचे, दैनंदिन विविध विषयांवर संवाद साधायचे. मात्र, आता पालकांना मुलांची प्रगती पाहण्यासाठी त्याची गुणपत्रिका हवी असते.

एका विद्यार्थ्याने पंतप्रधानांना रिकाम्या वेळी काय करायचे, असा प्रश्न विचारला. त्यावर मोदी म्हणाले, 'रिकामा वेळ मिळणे ही पर्वणीच असते. रिकाम्या वेळेचा तुम्ही कसा सदुपयोग करता हे महत्त्वाचे आहे. अभ्यास करून कंटाळा आला की थोडा विरंगुळा घ्यायला हवा याऐवजी रिकाम्या वेळी तुमच्या आवडीचे काम तुम्ही करा. असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

परीक्षा ही जीवन घडवण्याची संधी

परीक्षा म्हणजे आयुष्याचा अंत नव्हे, ती आयुष्य घडवण्याची एक संधी असते. तिला एक कसोटी म्हणून पाहायला हवे, असे मत मोदी यांनी विद्यार्थ्याशी बोलताना व्यक्त केले.जे आवडते ते आपण आधी करतो, विद्यार्थी सहज, सोप्या आणि त्यांना आवडणाऱया विषयाचा जास्त अभ्यास करतात आणि कठीण विषयाला घाबरतात. मात्र, तुम्ही कठीण असते त्याला आधी सामोरे जा. असे म्हटले जातं की परीक्षेत सोपं आधी सोडवा, पण मी तर म्हणेन जे कठीण आहे त्याचा निपटारा सर्वात आधी करायला हवा, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top