Sunday, 07 Mar, 5.05 am सामना

ठळक
परीक्षण - एका उद्योजकाचा लेखन प्रवास

>> श्रीकांत आंब्रे

'छपाई ते लेखणी' हे प्रसिद्ध उद्योजक यशवंत मराठे यांचे पहिलेच पुस्तक. जीवनातील अनेक विषयांकडे खेळकरपणे पाहताना आणि त्यावर भाष्य करताना त्या लेखनातील ताजेपणा, चिकित्सक वृत्ती, सूक्ष्म निरीक्षणदृष्टी, चौफेर व्यासंग, कुठलाही विषय वर्ज्य नसलेले अमर्याद लेखनविश्व आणि स्वतःची ठाम मते मांडतानाही त्यामागील पटेल अशी कारणमीमांसा करण्याचा त्यांचा बिनधास्त मनमोकळा स्वभाव यांचे प्रतिबिंब त्यांच्या या लेखनात उमटते आणि या कलंदर व्यक्तिमत्त्वाविषयी कुतूहल वाटल्याशिवाय राहात नाही. जेव्हा लेखनामागे जीवनातील अनुभवाची परिपक्वता असते तेव्हाच सहजसुंदर, ओघवत्या शैलीतील त्या लिखाणाला साहित्याचा दर्जा प्राप्त होतो. यशवंत मराठे यांचे लेखन याच प्रकारातील आहे. कसलीही साहित्यिक पार्श्वभूमी नसताना, मुद्रणयंत्रे उत्पादनाचा कौटुंबिक व्यवसाय असताना, छपाईच्या व्यवसायात सुलभता आणणारी 'स्विफ्ट' या ब्रँडची एक हजारपेक्षा जास्त यंत्रे देशात आणि परदेशात आज कार्यरत असताना 2010 ला त्यांनी या व्यवसायातून निवृत्ती घेतली आणि नंतरची आठ वर्षे पालघर जिह्यातील आदिवासी गावांमध्ये 'नीरजा' सामाजिक संस्था स्थापन करून बंधारे बांधणे, विहिरी व बंधारे दुरुस्त करणे, तलाव सफाई अशा विविध मार्गांनी जलपुनर्भरण म्हणजे रेन हार्वेस्टिंगचे काम या संस्थेने सुरू केले. संस्थेचे काम सुरळीत चालू आहे आणि आपल्याकडे बराच वेळ आहे, हे लक्षात आल्यावर मात्र त्यांनी गेल्या तीन वर्षांत लेखनाकडे मोर्चा वळवला आणि 'सरमिसळ' या नावाने ब्लॉग लेखन सुरू केले. इतिहास, संस्कृती, चालू घडामोडी, तत्त्वज्ञान, आठवणी, व्यक्तिचित्रणे, प्रवासवर्णने, बालपणीच्या, तरुणपणीच्या आठवणी अशा विविध विषयांवर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये सुमारे 175 लेख लिहिले. त्यांच्या ब्लॉगला पन्नास हजार वाचक आणि सत्तर हजार ट्विटस् लाभले. त्यांच्या खुमासदार लेखनशैलीचं हे यश होतं. त्यांच्या भावाच्या आणि मित्रांच्या आग्रहावरून त्यातील निवडक लेखांचं 'छपाई ते लेखणी' हे त्यांच्या जीवन प्रवासाचं पुस्तक आज आकाराला आलं आहे. यात त्यांचे विविध विषयांवरील तीस लेख आहेत. प्रभादेवीला जे मराठे उद्योग भवन आहे त्याची स्थापना यशवंत मराठे यांचे आजोबा अप्पासाहेब मराठे यांनी केली. वेंगुर्ल्यात जन्मलेल्या या उद्योजकाने कराची येथे आपल्या उद्योगाचं साम्राज्य उभे केले, पण फाळणीनंतर जीव वाचवण्यासाठी त्यांना सारी मालमत्ता कवडीमोल किमतीने विकून मुंबईत यावे लागले. इथे त्यांनी शून्यातून विश्व उभं केलं. अनेक उद्योग व्यवसाय सुरू केले आणि शेवटी हिंदुस्थानातील पहिलं ऑफसेट प्रिंटिंग मशीन इथे तयार झालं आणि त्यानंतर छपाई यंत्राच्या 'स्विफ्ट'ं या ब्रँडचा जगात नावलौकिक झाला. अप्पासाहेब वयाच्या 58 व्या वर्षी 1969 साली गेले, परंतु त्यांच्या पुढच्या पिढीने आजपर्यंत जबाबदारीने या उद्योग-व्यवसायाची धुरा सांभाळली. त्यात लेखकाचा मोलाचा वाटा होता. कोणत्याही मराठी उद्योजकाने ज्यांचा आदर्श बाळगावा अशा अप्पासाहेबांच्या कर्तृत्वाची गाथा यशवंत मराठे यांनी पहिल्याच लेखात सादर केली आहे.

उद्योग व्यवसायात उतरणाऱया कोणत्याही मराठी माणसाला प्रेरणा देण्याची शक्ती अप्पासाहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वात आणि कर्तृत्वात आहे, हे लेख वाचताना निश्चित लक्षात येईल. तसेच निश्चित ध्येय डोळय़ांसमोर असेल तर माणूस अडथळय़ांची शर्यत कधीही जिंकू शकतो, त्यांचा आदर्श म्हणजे अप्पासाहेबांचे जीवन हेही कळू शकेल. लेखक जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो. त्यांचे 'आनंदी जीवनाचा पाया', 'आयुष्याचे ध्येय' हे लेख त्यांचे द्योतक आहेत. लेखकाच्या व्यासंगी वृत्तीमुळे विविध विषयांवर त्यांचे प्रभुत्व आहे. 'गंधपुराण' या लेखात धूर आणि गंध, फुलांच्या सुगंधाचे स्वभाव, संगीत व सुगंध यांचं नातं, माळरानातील सुगंध अशा अनेक सुगंधांचे रहस्य तो उलगडून दाखवतो. गावगाडय़ाची कहाणी सांगताना गावगाडा संस्कृतीची वैशिष्टय़े तो खुलवून सांगतो. मुंबईतील गिरणगावच्या भूतकाळात जमा झालेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा त्याला अस्वस्थ करतात. गिरण संस्कृती, गिरणी कामगार, तो ऐतिहासिक संप हे सारं वाचताना तेव्हाचा गिरणगाव तो डोळय़ांसमोर उभा करतो आणि त्याच्या भग्न अवशेषामुळे व्यथित होतो. त्याच्या स्मृती पुसल्या जाऊ नयेत म्हणून काही उपायही सुचवतो. देशातील जाती आणि वर्णव्यवस्थेवरील त्याचे भाष्यही अभ्यासपूर्ण आणि या सर्व विषयांकडे डोळसपणे पाहणारं आहे. जोशी काका, फॅमिली डॉक्टर दीपक यादव या व्यक्तिचित्रांइतकेच त्यांनी रेखाटलेले भालचंद्र ऊर्फ भाल्याचे व्यक्तिचित्र अतिशय हृद्य आणि काळजाला स्पर्शून जाणारे आहे.

मुंबईसारख्या महानगरातच लेखकाचं बालपण गेलं. शिवाजी पार्क, कॅडल रोड या भागातच तो मोठा झाला. त्यामुळे सकाळच्या वेळी कानी पडणारे वासुदेवाचे स्वर, कम्पाऊंडमध्ये उभे राहून तिसऱया मजल्यावरील मित्राच्या बायकोला 'ताई, संकष्टीचा उपवास का सोडलात?' असं विचारणाऱया वासुदेवाबद्दल वाटणारं गूढ, फेरीवाल्यांची हाळी, बर्फाच्या गोळय़ापासून बालमोहनच्या कोपऱयावरील वडापावपर्यंत आणि शिवाजी उद्यानातील उद्यान गणेशापासून कॅफे कॅडेल आणि कॅफे ग्रीनमधल्या तेरा तेरा बीयरच्या बाटल्या रिचवणाऱया मित्रांपर्यंत अनेक रंजक आठवणी, शिवाजी पार्कच्या गप्पा, तरुणपणात स्वतः केलेली मौजमजा हे सारं काही तो खुल्लमखुल्ला सांगतो. 'नक्षत्राचे देणे' या लेखात लेखकाला असलेली नक्षत्रांची माहिती जशी थक्क करणारी आहे तशीच हिंदुस्थानी कालगणनेवरील लेखातील माहितीही त्यांच्या संशोधनात्मक वृत्तीची साक्ष देणारी आहे. काही सामाजिक विषयही तो अभ्यासपूर्ण रीतीने हाताळतो. 'बेरोजगारी - ज्वलंत समस्या', 'भारतीय दांभिकता', 'मराठी संस्कृती', 'रुढी आणि परंपरा', 'सत्यनारायण' अशा अनेक विषयांवर त्याची ठाम मते तो सरळसोट पद्धतीने मांडतो. अध्यात्मावरील त्यांचे सात लेख व त्यामागील त्याची चिकित्सा त्यांची अभ्यासू वृत्ती दर्शवते. 'ओशो - एक त्सुनामी' या लेखात ओशोंच्या विचारांचे आकलन होण्याइतपत आपला समाज आणि राज्यकर्ते सक्षम नाहीत असे सांगण्यास तो कचरत नाही. ओशोंचे क्रांतिकारी विचार अमलात आणायचे ठरवले तर धर्मसंस्था, समाजसंस्था पार ढवळून निघतील आणि त्यामुळे ते करायची कोणाची हिंमत नाही, असं ओशोंच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून तो सांगतो. त्यामुळे कोणाचाही कोणताही विचार स्वतःच्या तर्कबुद्धीवर पारखून घेण्याची लेखकाची वृत्ती निश्चित त्याच्या स्वतंत्र आणि पारदर्शी वृत्तीची चमक दाखवते. 'बरखा रानी'त त्याने केलेला हिंदुस्थानातील पर्जन्यविचार त्यांच्या अभ्यासू वृत्तीची तसंच 'लतादीदी' हा लेख त्यांच्या लतादीदींच्या गाण्यातील अद्वितीयतेची साक्ष पटवतो. साऱया जगाकडे निर्मळ वृत्तीने पाहणाऱया या लेखकाला स्वतःच्या मृत्यूविषयी तटस्थपणे लिहितानाही खंत वाटत नाही. म्हणूनच या कलंदर व्यक्तिमत्त्वाविषयी कुणालाही कुतूहल वाटावं आणि त्याच्या लेखनावर जीव जडावा यात नवल नाही.

छपाई ते लेखणी
लेखक ः यशवंत मराठे
प्रकाशक ः ग्रंथाली प्रकाशन
पृष्ठs ः 184, मूल्य ः रुपये 200/-

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top