ठळक
पर्यटन, रस्ते आणि विहिरींसाठी प्राधान्य देणार, पालकमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती

कोविडच्या संकटामुळे जिल्हा नियोजनचा निधी मोठ्या प्रमाणात कोविड उपाययोजनांसाठी वापरला गेला. पुढील वर्षी मात्र 170 कोटी रूपयांचा निधी विकासकामांसाठी वापरता येणार असून त्यामध्ये आम्ही पर्यटन, रस्ते आणि विहिरींसाठी प्राधान्य देणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही 498 कोटी रूपयांची मागणी केली असून फेब्रुवारी महिन्यात त्याची बैठक मु्ंबईत होणार असल्याचे पालकमंत्री परब यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्ह्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता कोयनेचे अवजल हे रत्नागिरी जिल्ह्यासाठीच वापरात आणले जाईल. रत्नागिरी जिल्ह्यासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा अहवाल तयार केला जाईल. रत्नागिरीच्या पाण्याची गरज पुर्ण झाल्याशिवाय ते पाणी कोणत्याही अन्य जिल्ह्यात वळवले जाणार नाही, असा निर्णय आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेतला गेला असल्याची माहिती पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आमदार योगेश कदम यांनी कोयनेचे पाणी हे अन्य जिल्ह्यात घेऊन न जाता ते पाणी रत्नागिरी जिल्ह्यातच वापरावे अशी मागणी केली. ही मागणी आम्ही मान्य केली असून कोयनेचे पाणी रत्नागिरी जिल्ह्यातच विशेष करून कोकणच्या हक्काचे पाणी दक्षिण कोकणासाठी वापरण्याचा निर्णय घेतला असल्याचे ॲड.परब म्हणाले.
रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनाला खूप वाव आहे. त्यामुळे पर्यटन विकासावर भर दिला जाईल. रस्त्यांच्या कामाकरिता निधी उपल्बध करून दिला जाणार असून मुख्यमंत्री रस्ते निधीतून काही रस्त्यांची कामे केली जातील असे पावकमंत्री ॲड. अनिल परब यांनी सांगितले. यावेळी जिल्हापरिषद अध्यक्ष रोहन बने, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आमदार योगेश कदम, शेखर निकम, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग उपस्थित होते.