Saturday, 06 Mar, 8.05 am सामना

ठळक
पाटण तालुक्यात दीड टनाची स्फोटके जप्त

हरुगडेवाडी नवा रस्ता (ता. पाटण) येथे खडी क्रशर खाणींवर महसुली कारवाई करताना तब्बल 1650 किलो वजनाची 66 बॉक्स स्फोटके सापडली आहेत. याबाबतची माहिती तहसीलदार योगेश टोंपे यांनी पाटण पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन एक लाख 99 हजार 590 रुपये किमतीची स्फोटके जप्त केली असून, याबाबत पाटण पोलिसांत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार तहसीलदार योगेश टोंपे यांनी हारुगडेवाडी नवा रस्ता येथील बेकायदेशीर दोन खडी क्रशरवर कारवाई केली. त्यावेळी संबंधित दोन्ही खडी क्रशर सील करीत त्या ठिकाणची सात पोकलेन मशीन जप्त केली. याच वेळी त्यांना घटनास्थळी अस्ताव्यस्त पडलेली स्फोटके आढळली. त्यांनी तातडीने याबाबतची माहिती पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांना दिली. त्यांनी पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांच्यासह घटनास्थळी भेट दिली. त्या ठिकाणचे 25 किलो वजनाचे 66 बॉक्स अशी एकूण 1650 किलो वजनाची स्फोटके, 69 डिटोनेटर्स व स्फोट घडविण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण एक लाख 99 हजार 590 रुपयांचा माल जप्त केला.

याबाबत पाटण पोलिसांत गुन्हा नोंदविला आहे. जप्त माल यशवंत एंटरप्रायजेस सूर्यकांत यादव पुसेसावळी (ता. खटाव) यांचा असल्याची माहिती मिळाली असून, सूर्यकांत करजगर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याशिवाय सूर्यकांत यादव (पुसेसावळी, ता. खटाव), सुनील लक्ष्मण माथने (नवा रस्ता, ता. पाटण) यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top