हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका 36 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने तलावात उडी घेत आपले जीवन संपवले. जीवन संपवण्यापूर्वी त्याने 19 पानांची एक सविस्तर चिठ्ठी (सुसाईड नोट) लिहून ठेवली होती.
या चिठ्ठीमध्ये त्याने आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले असून, कौटुंबिक कलहामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सीताराम असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. सीतारामची पत्नी रेणुका हिचे गेल्या दीड वर्षांपासून तीन वेगवेगळ्या पुरुषांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप सीतारामने सुसाईड नोटमधून केला आहे. यापैकी एका व्यक्तीने सीतारामच्या पत्नीसोबतचे काही खाजगी क्षण रेकॉर्ड केले होते. त्यानंतर रमणा नावाच्या एका व्यक्तीने हे व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर व्हायरल केले, असा दावाही सीतारामने आपल्या पत्रात केला आहे.
सोशल मीडियावर आपल्या पत्नीचे व्हिडिओ पाहिल्यानंतर सीतारामला या प्रकरणाची माहिती मिळाली. ही बाब समजताच त्याला मोठा मानसिक धक्का बसला. आपण घराबाहेर असताना यातील काही व्यक्ती आपल्या घरीही येऊन गेल्याचा उल्लेख त्याने पत्रात केला आहे. पत्नीची काळजी घेऊन आणि सर्व गरजा पूर्ण करूनही मिळालेल्या या विश्वासघातामुळे तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. यामुळेच सीतारामने हे लोकाचे पाऊल उचलले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सीतारामने लिहिलेली 19 पानांची चिठ्ठी जप्त केली असून त्यातील आरोपांची पडताळणी केली जात आहे. पत्नीचे कथित संबंध आणि व्हिडिओ व्हायरल करण्यामागील सत्य काय आहे, याचा पोलीस शोध घेत असून याप्रकरणी लवकरच संबंधितांची चौकशी केली जाणार आहे.

