पात्र-अपात्रतेचा खेळ बंद करा, सर्व धारावीकरांना धारावीतच 500 चौरस फुटांचे घर द्या, या प्रमुख मागणीसाठी हजारो धारावीकर आज रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरले. आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा अदानी कंपनीला धारावीत एकही वीट रचू देणार नाही, असा संतप्त इशारा रहिवाशांनी दिला.
'अदानी हटाओ, धारावी बचाओ', 'संपूर्ण धारावी पात्र, गौतम अदानी केवल अपात्र' अशा घोषणा मोर्चेकऱयांनी देत अदानीविरोधात आपला संताप व्यक्त केला.
धारावी बचाव आंदोलनाच्या नेतृत्वाखाली सकाळी कुंभारवाडा येथून मोर्चाला सुरुवात झाली. शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते-आमदार अंबादास दानवे, विभागप्रमुख-आमदार महेश सावंत, धारावी बचाव आंदोलनाचे नेते बाबुराव माने, काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, आमदार ज्योती गायकवाड यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चाला विभागप्रमुख प्रमोद शिंदे, माजी महापौर श्रद्धा जाधव, नगरसेवक जोसेफ कोळी, टी. एम. जगदीश, नगरसेविका अर्चना शिंदे, हर्षला मोरे, आशा काळे, नगरसेवक बब्बू खान, विठ्ठल मोरे, राष्ट्रवादीचे उलेश गजाकोश, भाकपचे नसरुल हक, प्रकाश नकाशे, सपाचे राहुल गायकवाड, असफाक खान, समीर मंगरु, अन्सार शेख, मनसेचे आरिफ शेख, काँग्रेसचे दीपक खंदारे, शकील चौधरी, आपचे राफेल पॉल, शाखाप्रमुख विठ्ठल पवार, महादेव शिंदे, किरण काळे, आनंद भोसले, मुन्ना शेख, सतीश कटके, मनी पंडन, गणेश तेवर, समन्वयक सुरेश सावंत, गंगा देरबर, बसपाचे शामलाल जैस्वार, महादेव शिंदे, कुंचीकोरवे समाजाचे ज्येष्ठ नेते जगन भोसले सहभागी झाले होते. या मोर्चासाठी तीनशेपेक्षा अधिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने निघाला तरी पोलिसांनी साहिल हॉटेल चौकात रोखला. त्यामुळे मोर्चेकरी संतप्त झाले.
रहिवाशांना धारावीबाहेर घालवाल तर याद राखा…
धारावीकरांना धारावीबाहेर घालवण्याचा विचार मनात आणू नका. नाहीतर या विरोधात शिवसेना उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना नेते-आमदार अंबादास दानवे यांनी दिला. डीआरपीने धारावीचा मास्टर प्लॅन तयार करून धारावीच्या चौकाचौकात लावावा. तसेच रहिवाशांना हरकती, सूचना नोंदवण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी यावेळी शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांनी केली. अदानी समूहाच्या नवभारत मेगा डेव्हलपर्स कंपनीने धारावीतील प्रत्येक झोपडपट्टीवासीयाबरोबर करार करावा अशी मागणी आमदार महेश सावंत यांनी केली. सर्व पात्र-अपात्र धारावीकरांना घराला घर, दुकानाला दुकान मिळाले पाहिजे, अशी मागणी बाबुराव माने यांनी केली.
…अन् शिष्टमंडळ एसआरएवर धडकले
पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर 25 जणांचे शिष्टमंडळ वांद्रे पूर्व येथील एसआरए कार्यालयावर धडकले. धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने रहिवाशांच्या मागण्यांचे निवेदन धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना सादर केले. मोर्चातील शिष्टमंडळाचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. तसेच रहिवाशांच्या मागण्यांबाबत धारावी बचाव आंदोलन या संघटनेसोबत एक बैठक घेण्याचे आश्वासन कल्याणकर यांनी यावेळी दिले.

