ठळक
पाऊलखुणा - शिल्पकलेचा मौल्यवान ठेवा

>> अनीश दाते
कोणत्याही कालखंडाचा इतिहास हा त्या काळातील कलावंतांकडून घडलेल्या दृश्यकला माध्यमातून अधिकाधिक विस्तृतपणे उलगडत जातो असे म्हणतात ते यथार्थ आहे. महाराष्ट्राला दृश्यकलेतील कलावंतांची परंपरा लाभली आहे. कला इतिहासाचा ठेवा जपण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. किंबहुना असा ठेवा लेख, पुस्तके आणि कोशरूपाने संकलित करून ठेवल्यास पुढील पिढय़ांना मार्गदर्शक ठरतो, परंतु महाराष्ट्रात चित्रशिल्पकलेच्या क्षेत्रात असे प्रयत्न कमी प्रमाणात झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या दृश्यकलेची परंपरा आणि कलावंत अज्ञातच राहिले आहेत. संगीत, नाटक क्षेत्रात महाराष्ट्राची कलापरंपरा जरी देशभर ज्ञात असली तरी चित्रशिल्पकलेच्या क्षेत्रात महाराष्ट्र मागासलेला असल्याचा गैरसमज पसरला आहे. चित्रकार सुहास बहुलकर यांच्या संकल्पनेतून 2013 मध्ये 'दृश्यकला' या मराठीतील महाराष्ट्रातील चित्रशिल्पकारांवरील कोशाचे प्रकाशन करण्यात आले आणि समस्त कलारसिकांचा, वाचकांचा त्याला उदंड प्रतिसाद लाभला होता. आपल्या देशात प्रथमच झालेल्या या कोशाचे महत्त्व लक्षात घेता पंडोल आर्ट गॅलरीचे श्री. दादीबा पंडोल यांनी हा कोश आता इंग्रजीत आणला असून त्याचे प्रकाशन 2 मार्च 2021 रोजी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथे 164 व्या वर्धापनदिनी झाले आहे. हा सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टच्या इतिहासातील हा झळाळून उठणारा सुवर्णक्षणच! कारण सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या कलाशिक्षण पद्धतीतून गेल्या 164 वर्षांत शिक्षण घेत नावारूपाला आलेल्या असंख्य कलावंतांमधील निवडक कलावंतांच्या शेकडो कलाकृतींची माहिती असणारा हा इंग्रजीतील महत्त्वपूर्ण कोश आहे. गेली सहा वर्षे अथक परिश्रम घेत संपादक, ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर आणि दीपक घारे यांनी तो पूर्णत्वास नेला असून मूळ मराठी कोशातील माहितीचे भाषांतर करण्यासाठी मुंबई, पुणे येथील 37 तज्ञ मंडळींनी काम केले आहे.
या ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाच्या कोशात 1791 च्या सुमारास पेशवाईच्या अखेरच्या कालखंडात पुण्यातील शनिवारवाडय़ात सुरू झालेल्या कलाशाळेत शिक्षण घेतलेल्या गंगाराम चिंतामण नवगिरे तांबट यांच्यापासून ते सर ज. जी. कला महाविद्यालयाच्या बॉम्बे स्कूल या नावाने ख्यातनाम झालेल्या परंपरेत शिकून नावारूपाला आलेल्या व विस्मरणात गेलेल्या अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ चित्रशिल्पकारांची घेतलेली विस्तृत नोंद हे या कोशाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. त्यात चित्रकार पेस्तनजी बोमनजी ( 1861 - 1938 ) ते आधुनिक हिंदुस्थानी कलेत जागतिक स्तरावर विक्रम करणारे चित्रकार व्ही. एस. गायतोंडे ( 1924 - 2001 ) यांचा समावेश आहे. शिल्पकलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ व श्रेष्ठ शिल्पकार जी. के. म्हात्रे ( 1879 - 1947 ), बालाजी तालीम (1888 -1970 ) आणि व्ही.पी.करमरकर ( 1891 - 1967 ) यात आहेतच, पण त्यासोबत अदी दाविएरवाला (1922 - 1975) तसेच किशोर ठाकूर (जन्म 1957) या आधुनिक पद्धतीने शिल्पे घडवणाऱया शिल्पकारांच्या निर्मितीतून झालेले काळाचे तसेच कलेचे स्थित्यंतर अनुभवता येते.
उपयोजित कला हे चित्रशिल्पकलेचेच व्यावसायिक अंग असून त्यात मूलभूत भर टाकणारे कलावंत या इंग्रजी कोशातून ज्ञात होणार आहेत. व्यंगचित्रकला हे आधनिक समाजाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असून त्यात मोलाची कामगिरी बजावणारे 'शंवाकि' ऊर्फ शंकरराव किर्लोस्कर (1903 - 1994 ) ते बाळासाहेब ठाकरे (1926 - 2012 ) यांच्यासह सध्याच्या काळातील प्रभाकर वाईरकरांपर्यंत ( जन्म 1954 ) अनेकांचे कार्यकर्तृत्व या कोशात अनुभवता येते.
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी आयुष्यभर झगडणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर त्यांनी निश्चितच या इंग्रजीमधील 'एनसायक्लोपीडिया ः व्हिज्युअल आर्ट ऑफ महाराष्ट्र - 1760 ते 1960 ' हा ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ निर्माण करणाऱया सर्वांचे भरभरून कौतुक केले असते!
कोशाची वैशिष्टय़े
- 'व्हिज्युअल आर्ट ऑफ महाराष्ट्र' कोशात फाईन आर्ट आणि उपयोजित अशा दोन विभागांत मिळून एकूण 307 नोंदी आहेत. त्यात 27 नवीन नोंदींची भर घातली आहे व 1180 कृष्णधवल प्रतिमा आहेत.
- 76 पानांची विस्तृत प्रस्तावना आहे. प्रागैतिहासिक काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या महाराष्ट्राच्या कला प्रवासाचा आलेख, कातळशिल्पे, आदिमानवाची गुहाचित्रे यापासून ते आधुनिक काळातील कलेपर्यंतचा लोककला आणि अभिजात कला यांच्या समृद्ध प्रवासाचा आढावा आणि 227 नमुने.
- 132 पानांचा रंगीत चित्र विभाग - 321 रंगीत चित्रशिल्पांसह.
- सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, आर्टिस्टस् सेंटर या चार कला संस्थांचा प्रथमच नोंदवलेला इतिहास.
एस. बी. पळशीकर (1916-1984)
सिन्नारस डिव्हाइन, 1950
एस.एल. हळदणकर (1882-1968)
ग्लो ऑफ लाइट, 1952
एन.जी.पानसरे (1910-1968) इंडस्ट्री-स्टोन, 1937