Wednesday, 19 Feb, 7.48 am सामना

ठळक बातम्या
फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यामार्फत, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँगेसच्या नेत्यांच्या फोन टॅपिंगच्या चौकशीसाठी आयपीएस व आयएएस अशा दोन उच्चस्तरीय अधिकाऱयांची समिती नेमण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र याऐवजी निवृत्त पोलीस आयुक्त किंवा निवृत्त पोलीस महासंचालक दर्जाच्या आयपीएस अधिकाऱयांमार्फत ही चौकशी नेमण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला जात होता. राज्यात सत्तास्थापनेच्या काळात भाजपकडून फोन टॅपिंगसाठी सरकारी कर्मचाऱयांनी इस्रायलहून सॉफ्टवेअर आणले असल्याचीही चर्चा आहे. याबाबत तक्रारी आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख फोन टॅपिंगचे तंत्रज्ञान आणण्यासाठी कोणते सरकारी अधिकारी इस्रायलला गेले होते, त्यांनी आणलेल्या सॉफ्टवेअरचा वापर भाजपने राजकीय वापरासाठी केला होता काय, याची चौकशी करण्यासाठी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंग व गुप्तचर विभागाचे सहआयुक्त अमितेशकुमार या दोन वरीष्ठ अधिकाऱयांची समिती घोषित केली होती.

मात्र चौकशीत या अधिकाऱयांवर कोणाचाही दबाव येऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार निवृत्त आयपीएस दर्जाच्या अधिकाऱयांची नेमणूक केली जाणार आहे, असे देशमुख यांनी सांगितले. यासाठी निवृत्त पोलीस आयुक्त किंवा महासंचालक दर्जाच्या अधिकाऱयांचा शोध सुरू असून लवकरच त्यांचे नाव जाहीर केले जाईल, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top