Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पीएम ते सीएम, हे सर्व भाषण माफिया; GDP वाढला असेल तर 85 कोटी लोकांना 10 किलो धान्य फुकट देऊन का जगवताय? - संजय राऊत

पीएम ते सीएम, हे सर्व भाषण माफिया; GDP वाढला असेल तर 85 कोटी लोकांना 10 किलो धान्य फुकट देऊन का जगवताय? - संजय राऊत

सामना 1 week ago

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी एक सेल्फी व्हिडीओ शेअर करत चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत जीडीपी 7.8 टक्के नोंदवला गेल्याचे म्हटले. एकीकडे महागाई, बेरोजगारी वाढत असताना दुसरीकडे जीडीपी वाढीचे कौतुक सोहळे करणाऱ्या मोदींवर विरोधक तुटून पडले आहेत.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. जीडीपी एवढा वाढला असेल तर देशाची परिस्थिती अशी का? बेरोजगारी, महागाई का वाढली? रुपया का घसरला? 85 कोटी लोकांना 10 किलो फुकट धान्य देऊन का जगवताय? असे खणखणीत सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, हे खोटे आकडे लावण्यात पटाईत आहेत. खोटे आकडे लावतात आणि त्याच्यावर राजकारण करतात. जीडीपी एवढा वाढला असेल तर देशाची परिस्थिती अशी का आहे? बेरोजगारी, महागाई का वाढली आहे? रुपया 89 पर्यंत का घसरला आहे? बेरोजगार रस्त्यावर का उतरला? लोकांना नोकऱ्या का मिळत नाहीत? याची उत्तरं द्या.

जीडीपी वगैरे ठीक आहे, पण तो कुणाला कळतो. पंतप्रधान नरेंद्र, गृहमंत्री अमित शहा यांना तरी कळतोय का? लोकांना रोजी-रोटी, कपडा, मकान हे हवे आहे. जीडीपी वाढला असेल तर 85 कोटी लोकांना 10 किलो धान्य देऊन का जगवताय? याचाच अर्थ 85 कोटी लोक उपाशी असून त्यांना 10 किलो फुकट धान्यावर जगवताय. राज्या-राज्यात महिलांच्या खात्यावर 1500 रुपये, 10000 रुपये टाकून मतं विकत घेताय. याला तुम्ही जीडीपी वाढला असे म्हणतात. पंतप्रधानांपासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळेच भाषण माफिया असून या भाषण माफियागिरीला लोक आता कंटाळले आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महिला आरक्षण विधेयकासंदर्भातील विधानाचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू असताना व्यासपीठावर लोक झोपले होते. कुणी जांभल्या देत होते. काही आमदार डुलक्या काढत होते. हे सगळे भाषण माफिया आहेत. ही भाषण माफियागिरी महाराष्ट्राच्या हिताची नाही. महिला आरक्षण बील 2023 मध्येच मंजूर झाले होते, त्याची आधी अंमलबजावणी करा. देवेंद्र फडणवीस यांनी त्या बिलाचे अभिनंदन करणारे ट्विट केले होते, ते त्यांनी स्वत: वाचावे. त्यावेळी 850 जागांचा उल्लेख नव्हता, मग आता अचानक या जागा कशा उपटल्या? लोक या भाषण माफियागिरीला कंटाळले आहेत. यालाच कंटाळून जेन-झी उसळून उठलेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

सीजेपीला काँग्रेस जिताओ पार्टी म्हणणाऱ्या फडणवीसांवर संजय राऊत यांनी टीका केली. सीजीपी काँग्रेस जिताओ पार्टी असेल तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेतला? रात्री-अपरात्री तुमचे पंतप्रधान येऊन काँग्रेस जिताओ पार्टीला का चुचकारत होते? 12 वाजता इन्स्टा, फेसबुकवर व्हिडीओ का अपलोड करत होते? एवढी का फाटली होती? त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काळजीपूर्वक वक्तव्य केली पाहिजे. तोंडाला येईल ते बोलू नये, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana