Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पीक पाहणीदरम्यान पेढांबेत चक्क बिबट्याचे दर्शन; कर्मचारी, शेतकऱ्यांची उडाली धावपळ

पीक पाहणीदरम्यान पेढांबेत चक्क बिबट्याचे दर्शन; कर्मचारी, शेतकऱ्यांची उडाली धावपळ

चिपळूण तालुक्यातील पेढांबे येथे खरीप हंगामातील पीक पाहणीचे काम सुरू असताना चक्क बिबट्याचे दर्शन झाल्याने कर्मचारी व शेतकरी यांची एकच धावपळ उडाली. शेतात पिकांची पाहणी करत असतानाच अचानक बिबट्या नजरेस पडल्याने उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेमुळे पेढांबे परिसरात वन्यप्राण्यांच्या वावराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सध्या खरीप हंगामातील पीक पाहणीची कामे विविध गावांमध्ये सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची नोंद करणे, प्रत्यक्ष पिकांची स्थिती तपासणे आणि आवश्यक माहिती संकलित करण्याचे काम कर्मचारी करीत आहेत. याच कामानिमित्त चिपळूण तालुक्यातील पेढांबे येथे कर्मचारी शेतात गेले होते.

पिकांची पाहणी सुरू असतानाच अचानक त्यांना बिबट्या जांभ्या दगडांवर बसलेला दिसला. अनपेक्षितपणे तो समोर दिसल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी, कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. नेहमीच्या शासकीय कामादरम्यान आलेल्या या अनपेक्षित अनुभवामुळे उपस्थितांमध्ये भीती आणि आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

पेढांबे परिसरात बिबट्या दिसल्याची घटना समोर आल्यानंतर स्थानिकांमध्येही या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. शेतीच्या कामांसाठी शेतात जाणारे शेतकरी, पिक पाहणीसाठी येणारे कर्मचारी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यानिमित्ताने चर्चेत आला आहे.पावसाळ्यात शेतीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असतात. शेताच्या बांधावर, झाडीझुडपांमध्ये तसेच डोंगरालगतच्या भागात काम करताना नागरिकांना सतर्क राहावे लागते. अशा परिस्थितीत बिबट्यासारख्या वन्यप्राण्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होणे स्वाभाविक आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana