>> प्रभाकर पवार, prabhakarpawar100@gmail.com
गेल्या आठवड्यात शंभरेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाच्या गृह विभागाने जारी केले. त्यात अपर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे, प्रवीण पडवळ, लखमी गौतम, निशीथ मिश्र, मनोज कुमार शर्मा, सुवेझ हक, राजेश प्रधान, जयकुमार, अनिल कुंभारे, सत्यनारायण चौधरी आदी आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर (जून २०२२) मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील सर्वच वरिष्ठ आयपीएस अधिकारी बदलण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या जागी सत्यनारायण चौधरी, गुन्हे शाखा सांभाळणारे सहपोलीस आयुक्त सुहास वारके यांच्या जागी लखमी गौतम, तर आर्थिक घोटाळा विभागाचे सहपोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांच्या जागी निशीथ मिश्र यांची वर्णी लावण्यात आली. प्रशासन विभागाचे सहपोलीस आयुक्त नवल बजाज यांच्या जागी जयकुमार यांना आणण्यात आले. २०२२ ते २०२६ यादरम्यान मुंबईचे दोन पोलीस आयुक्त सेवामुक्त झाले. परंतु महायुती सरकारने लखमी गौतम, निशीथ मिश्र व जयकुमार या आयपीएस अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्त कार्यालयाच्या पिंजऱ्यातून ४ वर्षे बाहेर काढलेच नाही. सार्वजनिक निवडणुकांच्या नावाखाली त्यांना पोलीस आयुक्त कार्यालयात अडवून ठेवले.
मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना आता अनिल कुंभारे (गुन्हे शाखा), मनोज कुमार शर्मा (कायदा आणि सुव्यवस्था), राजेश प्रधान (आर्थिक घोटाळा शाखा) व सुवेझ हक (प्रशासन) या ४ सहपोलीस आयुक्तांची पोलीस आयुक्त कार्यालयात साथ लाभणार आहे. त्यातील अनिल कुंभारे व मनोज कुमार शर्मा यांच्यासमोर मोठी आव्हाने आहेत. ज्या मुंबई क्राईम बॅचचा सर्वत्र लौकिक आहे ती क्राईम ब्रँच गेली ४ वर्षे (आजारी माणसासारखी) सुस्त वाटत होती. त्या क्राईम बँचमध्ये ऊर्जा आणण्यासाठी धडाडीच्या अनिल कुंभारे यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. अनिल कुंभारे अतिशय मेहनती व स्पष्टवक्ते आहेत. अनिल कुंभारे आपल्या हाताखालील अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देऊन, त्यांच्यावर विश्वास ठेवून अवघड, गुंतागुंतीची प्रकरणे मार्गी लावतील अशी अपेक्षा करण्यात येत आहे.
मुंबई क्राईम ब्रँचसमोर आज सायबर व ड्रग्ज माफियांचे मोठे आव्हान उभे आहे. ड्रग्ज पुरवठ्यामुळे आपली पिढीच्या पिढी बरबाद होत आहे. सायबर माफियांकडून ज्येष्ठ नागरिक व महिलांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात येत आहे. यावर नियंत्रण व जनतेमध्ये जागृतता आणली पाहिजे. यासाठी पोलीस पुत्र अनिल कुंभारे यांना कंबर कसावी लागणार आहे. साऱ्या जगात नावलौकिक असलेल्या मुंबई क्राईम ब्रँचचे प्रमुख म्हणून (सहपोलीस आयुक्त) यापूर्वी अरविंद इनामदार, आर. डी. त्यागी, एम. एन. सिंग, डी. शिवानंदन, डॉ. सत्यपाल सिंग, मीरा बोरवणकर, राकेश मारिया, हिमांशू रॉय, सदानंद दाते, मिलिंद भारंबे आदी आयपीएस अधिकाऱ्यांनी मुंबई क्राईम बँबॅचची यशस्वीपणे धुरा वाहिलेली आहे. अंडरवर्ल्ड संपविले आहे. अनिल कुंभारे ड्रग्ज व सायबर माफियांना संपवतील अशी अपेक्षा करू या!
अत्यंत कडक शिस्तीचे आयपीएस अधिकारी अशी ओळख असलेले राजेश प्रधान यांनी मुंबई क्राईम बॅचच्या आर्थिक घोटाळा शाखेची (ईओडब्ल्यू) नुकतीच सूत्रे हाती घेतली. यापूर्वी त्यांनी मुंबईच्या उत्तर परिक्षेत्रात अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम केले होते. त्यानंतर प्रतिनियुक्तीवर त्यांची सीबीआयमध्ये बदली झाली. कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये एका कनिष्ठ महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराचा (बलात्कार करून खून) तपास त्यांनी केला. आरोपीविरुद्ध ठोस पुरावे जमा केले. त्यातील एक आरोपी संजय रॉय यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अशा या कर्तव्यकठोर अधिकाऱ्याने ‘ईओडब्ल्यू’चे सहपोलीस आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या बॅचला अलीकडे सेटलमेंट बँच म्हणूनच ओळखले जाते. राजेश प्रधान ईओडब्ल्यूला लागलेला सेटलमेंट बँचचा शिक्का पुसून काढतील अशी अपेक्षा आहे.
मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारे सहपोलीस आयुक्त मनोज कुमार शर्मा यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पदवी शिक्षण पूर्ण करून आयपीएस सेवेत बाजी मारली त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना एक चांगला हात मिळाला आहे. मुंबईतील १०० पोलीस ठाण्यांचे नेतृत्व शर्मा करणार आहेत. त्या पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या समस्यांकडे ते लक्ष देतील ही अपेक्षा आहे. पोलीस शिपाई, फौजदार यांना पोलीस ठाण्यात रेस्ट रूम सोडा, बसायला खुर्च्य नसतात यासारखी शोकांतिका नाही. अपयशातून पुढे आलेल्या मनोज कुमार शर्मा यांनी याची दखल घ्यावी. पोलीस ठाण्यांना भेटी द्याव्यात.
मोहम्मद सुवेझ हक यांची मुंबई पोलिसांच्या प्रशासन विभागाचे सहपोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या धाडसी अधिकाऱ्याने गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरोधात अत्यंत आक्रमक व यशस्वी कारवाया केल्या आहेत. सीबीआयमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. असा हा कर्तबगार अधिकारी मुंबई पोलीस दलाला लाभल्याने त्यांचे मुंबई पोलीस दलातून स्वागत होत आहे. मुंबईबाहेर राहणाऱ्या पोलिसांच्या समस्या समजावून घेऊन त्यांना मुंबईत किंवा घराजवळ पोस्टिंग द्याव्यात ही किमान अपेक्षा सुवेझ हक यांच्याकडून करण्यात येत आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती हे एक अनुभवाचा दीपस्तंभ आहेत. त्यांच्याकडे निर्णय क्षमता आहे. दूरदृष्टी असलेल्या या अधिकाऱ्याच्या छत्रछायेखाली एका ध्येयाने प्रेरित असलेली चार सहआयुक्तांची आपापल्या क्षेत्रात निष्णात असलेली ही नवीन टीम काम करणार आहे. अशा या पंचसूत्री, पंचतारांकित फौजेला आमच्या शुभेच्छा!

