Dailyhunt
प्रगत देशांनी विनाशकारी मानून नाकारले पीफासचे उत्पादन आमच्या सुपीक जमिनीवर कशाला? 800 ग्रामस्थांचे लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीला खुले पत्र

प्रगत देशांनी विनाशकारी मानून नाकारले पीफासचे उत्पादन आमच्या सुपीक जमिनीवर कशाला? 800 ग्रामस्थांचे लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीला खुले पत्र

सामना 5 days ago

सुरक्षेचा दावा करणाऱ्या लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज़ लिमिटेड कंपनीला गावकऱ्यांनी एक खुले पत्र लिहिले आहे. या पत्रात कंपनीला काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. जगातील प्रगत देशांनी ज्या पीफास रसायनाला विनाशकारी मानून बाहेर काढले त्याचे उत्पादन आमच्या सुपीक जमिनीवर का?

पीफास उप-उत्पादने आणि प्रक्रिया करताना निघणारा कचरा कोणते तंत्रज्ञान वापरणार आहात याचे पुरावे द्या. अनेक गावांतील ग्रामसभांनी या प्रकल्पाच्या विरोधात ठराव मंजूर केलेले असताना, स्थानिक संमतीशिवाय हा प्रकल्प रेटणे लोकशाहीला धरून आहे का? इटलीमध्ये पीफास उत्पादनांमुळे 3.5 लाख लोक बाधित केलेल्या, 11 अधिकाऱ्यांना 111 वर्षे सजा झालेल्या मिटेनी कंपनीचा कारखाना तुम्ही आपल्या देशात का आणला? असे सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत. हे पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे.

खुल्या पत्रात ग्रामस्थांनी असे म्हटले आहे की, आपण सांगता की प्रकल्प सुरक्षित आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर पीफास रसायनांवर बंदी घालण्यात आली आहे. युरोपियन युनियन ने या रसायनांच्या उत्पादनावर कडक निर्बंध लादले आहेत. जगातील प्रगत देश ज्या रसायनांना विनाशकारी मानून बाहेर काढत आहेत, त्यांचे उत्पादन आमच्या सुपीक जमिनीवर का लादले जात आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपूर्वी झालेला टँकर अपघात हा तुमच्या सुरक्षिततेच्या दाव्यांना छेद देणारा आहे असे नमूद करताना त्या टँकरमध्ये नेमके कोणते घातक रसायन होते? त्या अपघातामुळे झालेल्या माती आणि पाणी प्रदूषणाची जबाबदारी कंपनीने का स्वीकारली नाही? भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याचे पर्यावरणीय दायित्व कोण घेणार? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

ईआयए अहवाल सार्वजनिक करा. संपूर्ण अहवाल मराठी भाषेत त्वरित प्रसिद्ध करावा. कंपनीच्या दाव्यांची सत्यता तपासण्यासाठी गावकऱ्यांनी नियुक्त केलेल्या स्वतंत्र तज्ज्ञ समितीद्वारे पर्यावरणीय ऑडिट करण्यात यावे. जोपर्यंत वरील सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत, तोपर्यंत पीफास प्रकल्पाचे काम जैसे थे स्थितीत थांबवावे, अशा मागण्या ग्रामस्थांनी या पत्रामध्ये मांडल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana