<< प्रा. वर्षा चोपडे
इडगुंजी हे उत्तर कन्नड जिह्यातील होन्नावर तालुक्यातील एक छोटेसे ठिकाण आहे. येथील विनायक मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर इडगुंजीचे मुख्य आकर्षण असून येथे दरवर्षी 10 लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात.
स्कंदपुराणातील 'सह्याद्री खंडा'त या क्षेत्राचे महत्त्व सांगितले आहे. श्री गणेश हे ज्ञान, साहित्य आणि यशाचे अधिपती असलेले हत्तीच्या मुखाचे हिंदू दैवत आहेत. त्यांना 'विघ्नेश्वर' किंवा 'विघ्नहर्ता' म्हणजेच 'विघ्नांचे स्वामी आणि ती दूर करणारे' असे संबोधले जाते. लोक प्रामुख्याने सिद्धी (यश) आणि बुद्धी (ज्ञान) प्राप्तीसाठी गणेश देवतेची उपासना करतात. कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यापूर्वी बाप्पाची पूजा केली जाते. इडागुंजी देवस्थानातील भगवान विनायकाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे देव स्वतः उभे असून त्यांची केवळ दोनच हात असलेली मूर्ती आहे. त्यांच्या उजव्या हातात 'पद्म' अर्थात कमळ आणि डाव्या हातात 'मोदक' आहे. भक्तांनी अर्पण केलेली सेवा आणि पूजा स्वीकारताना आणि सर्वांना सुखसमृद्धीचा आशीर्वाद देताना प्रसन्न मुद्रेत उभे असलेले हे दैवत पाहणे अत्यंत विलोभनीय असते.
लोककथेनुसार द्वापार युगाच्या शेवटी बद्रिकाश्रमात महान ऋषीमुनी 'सूत-पौराणिकां'कडे प्रार्थना करत होते. 'कलियुगा'त येणाऱ्या दोषांचे निवारण करण्याचा संकेत भगवान श्रीकृष्णाने दिला होता. त्यानंतर दिव्य ऋषी वालखिल्य यांनी 'कुंजवना'चे महत्त्व सांगण्यास सुरुवात केली. वालखिल्य आणि इतर अमर ऋषी एका अरण्यात तपश्चर्या करत होते. मात्र त्यांच्या तपश्चर्येत विविध अडथळे येऊ लागले. या अडथळ्यांमुळे ते ऋषी अस्वस्थ झाले. त्यांनी दिलासा मिळवण्यासाठी भगवान श्रीपृष्णाची उपासना केली. त्यानंतर देवर्षी नारद वालखिल्य ऋषींकडे आले. वालखिल्य यांनी योग्य विधींसह नारदांचे आदरपूर्वक स्वागत केले. वालखिल्य यांनी आपली कठीण परिस्थिती नारदांना सांगितली आणि मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी व्यावहारिक उपाय सुचवण्याची विनंती केली. नारदांनी त्यांना पुन्हा तपश्चर्या सुरू करण्यापूर्वी विघ्नेश्वरची उपासना करण्याचा सल्ला दिला. वालखिल्य यांनी नारदांना देवतेच्या उपासनेसाठी योग्य जागा दाखवण्याची विनंती केली. नारद, वालखिल्य आणि इतर ऋषी योग्य जागेच्या शोधात पश्चिमेकडे निघाले. प्रवासादरम्यान त्यांना शरावती नदी दिसली, जी अत्यंत सुंदररीत्या समुद्राला जाऊन मिळत होती. नारदांनी शरावती नदीच्या डाव्या बाजूला काही मैल अंतरावर एक विशिष्ट जागा निश्चित केली. या जागेला 'कुंजारण्य' असे नाव देण्यात आले. त्यांच्या तपश्चर्येसाठी हे एक अत्यंत योग्य ठिकाण होते. या जागेचे महत्त्व अधिक अधोरेखित करताना नारदांनी सांगितले की, भूतकाळात 'हरी' (विष्णू), 'हर' (शिव) आणि 'ब्रह्मा' या त्रिमूर्तींनी असुरांचा विनाश करण्यासाठी वेळोवेळी येथे येऊन तपश्चर्या केली होती. त्यांनी येथे 'चक्रतीर्थ' आणि 'ब्रह्मतीर्थ' नावाची सरोवरेही निर्माण केली होती, जी खऱ्या अर्थाने आध्यात्मिक प्रेरणा देणारी आहेत.
सर्व ऋषीमुनींसमोर या योजनेची रूपरेषा मांडल्यानंतर नारदांनी त्या ऋषींच्या साहाय्याने 'देवतीर्थ' नावाचे आणखी एक सरोवर निर्माण केले. त्यानंतर त्रिमूर्तींसह म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश इतर सर्व देवांना आणि बाप्पाला तिथे घेऊन येण्याचे त्यांनी ठरवले. नारदांनी कुंजारण्यात ऋषींनी आयोजित केलेल्या पूजेला उपस्थित राहण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांची विनवणी केली. तसेच विघ्न निवारणासाठी आपला पुत्र गणपतीला ऋषींकडे पाठवण्याची विनंतीही त्यांनी पार्वतीदेवींकडे केली. नारदांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे भगवान गणपती आणि इतर सर्व देवगण अत्यंत थाटामाटात व भव्यतेने या पूजेसाठी उपस्थित राहिले. त्यावेळी श्रीगणरायांनी आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली. इतर देवतांचाही यथोचित सन्मान करण्यात आला आणि त्यांनीही आपल्या उपासकांना आशीर्वाद दिले. इतर देवतांनी आपापल्या मूळ स्थानांवर परत जाण्याची विनंती केली. मात्र, गणपतींनी तिथेच राहून भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्याचा आपला निर्णय ठामपणे मांडला. तसेच त्यांनी इतर देवतांना त्यांच्या सर्वज्ञ शक्तीचा काही अंश तिथे असलेल्या विविध सरोवरांमध्ये तीर्थांमध्ये समर्पित करण्यास सांगितले. भक्तगण या विविध 'तीर्थांमध्ये' स्नान करून आणि गणपतीची पूजाअर्चना करून आपल्या मनातील इच्छा आजही पूर्ण करून घेऊ शकतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. असे म्हणतात की, गणपतीच्या विनंतीवरून स्नानासाठी पाणी उपलब्ध करून देणारे एक सरोवर निर्माण करण्यात आले, ज्याला 'गणेशतीर्थ' असे नाव देण्यात आले. या पुराणकथेनुसार, भगवान गणपती 'कुंजारण्य' या ठिकाणी स्थायिक झाले, जे आज 'इडगुंजी' या नावाने प्रसिद्ध आहे. येथील विश्वस्त मंडळाद्वारे वेद आणि संस्कृत पाठशाळा चालवल्या जातात. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे भगवान गणपतीसाठी 'पंचखाद्य' तयार केले जाते. हा या मंदिराचा विशेष प्रसाद आहे. जवळपासची आकर्षणे अर्थात मुरुडेश्वर, गोकर्ण, अप्सराकोंडा, कासारकोड बीच, शरावती नदी, रामतीर्थ आणि लक्ष्मणतीर्थ या स्थळांना भेट देऊ शकता. इडागुंजी देवस्थान येथे निवास व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच होन्नावर, कुमटा आणि भटकळ यांसारख्या जवळच्या ठिकाणीही राहण्याची सोय उपलब्ध आहे. विवाहासाठी 'कल्याण मंडप' उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, उपनयन मुंज आणि चौल मुंडन संस्कारांचे कार्यक्रमही येथे केले जातात. इडागुंजी मंदिर परिसरातील मयूर प्रसाद भोजनालय येथे सर्व भाविकांसाठी दुपारी मोफत भोजनाची सुविधा उपलब्ध आहे. गणेशभक्तांना आवडेल असेच हे मंदिर आहे.

