साहित्याच्या जगातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. आधुनिक गझलेचे उस्ताद मानले जाणारे प्रसिद्ध उर्दू शायर बशीर बद्र यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले आहे. ते दीर्घकाळापासून आजारी होते.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच साहित्य विश्वात आणि त्यांच्या लाखो चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
बशीर बद्र यांच्या साहित्यातील अतुलनीय योगदानासाठी केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९३५ रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे झाला. त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून आपले उच्च शिक्षण आणि पीएचडी पूर्ण केली. याच विद्यापीठात त्यांनी उर्दूचे प्राध्यापक म्हणूनही काम पाहिले.
बशीर बद्र यांच्या शायरीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा साधेपणा. रोजच्या संवादातील साधी, सरळ भाषा त्यांनी आपल्या गझलांमध्ये वापरली, ज्याला पारंपरिक उर्दू शायरीमध्ये फारसे स्थान मिळत नव्हते. त्यांनी ‘इमकान’, ‘आहटें’, ‘कुल्लियात-ए-बशीर बद्र’ आणि ‘उजाले अपनी यादों के’ यांसारखी अनेक प्रसिद्ध पुस्तके लिहिली आहेत.

