Thursday, 14 Jan, 6.00 am सामना

ठळक
प्रतीक्षा संपली, 'जीवनदायी' कोरोना लस आली; मुंबईत रोज 14 हजारांना डोस

अवघ्या जगाला हादरवून सोडलेल्या 'कोरोना'वरील लसीची प्रतीक्षा अखेर संपली असून मुंबईत आज 1 लाख 39 हजार 500 कोविड डोस दाखल झाले आहेत. पालिकेच्या एफ - साऊथ परळ येथील वॉर्ड ऑफिसच्या कोल्ड स्टोरेज सेंटरमध्ये या डोसची साठवणूक करण्यात आली असून 16 जानेवारीपासून पालिकेच्या 9 सेंटर्सवर प्रत्यक्ष लसीकरण सुरू होणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 'कोविड योद्धा' आरोग्य कर्मचाऱयांना लस देण्यात येणार असून दररोज 14 हजार 400 जणांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 लाख 25 हजार जणांना लस दिली जाईल.

मुंबईत मार्चमध्ये शिरकाव केलेल्या कोरोनाने आतापर्यंत एकटय़ा मुंबईत 11 हजारांवर बळी घेतले आहेत. तर सुमारे 3 लाख जणांना लागण झाली आहे. त्यामुळे लस कधी येणार अशी प्रतिक्षा सर्वांना लागून लाहिली होती. अखेर ही प्रतिक्षा संपली असून पुण्याच्या सीरम इन्स्टिटय़ुटमधून कोव्हिशिल्ड लसीचे डोस पालिकेच्या एफ साऊथ वॉर्ड ऑफिसच्या कोल्ड स्टोरेज सेंटरमध्ये पहाटे 5.30 वाजता दाखल झाले. या लसींच्या साठवणुकीची पाहणी महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केली. दरम्यान, स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांच्या मागणीमुळे प्रशासनाने लसीकरणाची सविस्तर माहिती देण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिल्यानंतर अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी लसीकरणाची माहिती देताना मुंबईत दररोज 14 हजार 400 जणांना लस देण्यासाठी नियोजन पालिकेने केल्याचे स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात 1 लाख 25 हजार जणांना लस दिली जाणार असून पोर्टलवर आतापर्यंत 1 लाख 19 हजार 268 हेल्थ वर्परची नोंदणीही झाल्याचे त्या म्हणाल्या. लसीकरणासाठी 18 मास्टर ट्रेनर्स, 1452 स्टाफ नर्स, 2357 इतर टीम मेंबरना प्रशिक्षण देण्यात आले आहे. लसीकरणाच्या ठिकाणी साइडइफेक्ट झाल्यास खबरदारी म्हणून कार्डिओलॉजिस्ट, गायनॅकोलॉजिस्टची अशा तज्ञांची, डॉक्टरांची टीम तैनात ठेवली जाणार आहे. पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसांच्या अंतराने दुसरा डोस दिला जाईल. ज्याचा रिमाइंडर लाभार्थ्यांना पोर्टलवरून स्वयंचलित पद्धतीने जाणार असल्याचेही भिडे यांनी सांगितले.

दुसऱया टप्प्यात दररोज 24 हजारांना लस

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पालिकेने सद्यस्थितीत लसीकरणाच्या पहिल्या आणि दुसऱया टप्प्याचे नियोजन केले आहे. यामध्ये दुसऱया टप्यासाठी आणखी 3 जम्बो कोविड फॅसिलिटी सेंटर, 2 स्पेशल हॉस्पिटल, 9 पेरिफेरल हॉस्पिटल, 14 मेटर्निटी होम आणि 43 दवाखान्यांमध्ये लसीकरण करता येणार आहे. त्यामुळे दुसऱया टप्प्यात दररोज 24 हजारांना लस देता येईल असे भिडे यांनी सांगितले. लसीकरणाच्या तिसऱया टप्प्याच्या नियोजनाचे निर्देश केंद्र सरकारकडून अद्याप आले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

दुसऱया टप्प्यात प्रंटलाइन वर्परला प्राधान्य

लसीकरणाच्या दुसऱया टप्प्यात 2 लाख प्रंटलाइन वर्परना लस दिली जाणार आहे. यामध्ये 'एसडब्ल्यएम' कर्मचारी, पोलिसांना लस दिली जाणार असून पोर्टलवर 99 हजारचा डाटा अपलोडही झाला आहे.

पालिकेची यंत्रणा सज्ज, साठवणुकीची चिंता नाही!

ड्रग पंट्रोलर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आपत्कालीन वापरासाठी सिरम इन्स्टिटय़ूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला परवानगी दिली असल्याचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.

कांजूरमार्ग येथे पालिका लसीसाठी सेंट्रल कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करीत आहे. तोपर्यंत एफ साऊथ वॉर्ड ऑफिसच्या ग्राऊंड फ्लोअरवर कोल्ड स्टोअरेजसाठी 225 लिटर क्षमतेचे आठ आइस लाइन रेफ्रिजरेटर (आयएलआर) ठेवण्यात आले आहेत.

सद्यस्थितीत पाच रेफ्रिजरेटर कार्यरत झाले असून प्रत्येकाची लस स्टोरेजची कॅपेसिटी 62 हजार 550 इतकी आहे. म्हणजेच एकटय़ा एफ साऊथ येथील कोल्ड स्टोरेज सेंटरमध्ये 3 लाख 12 हजार लसींची साठवणूक करता येणार आहे. त्यामुळे लसींच्या साठवणुकीची कोणतीही चिंता नसल्याचेही भिडे यांनी स्पष्ट केले.

या ठिकाणी होणार लसीकरण

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात मुंबईत पालिकेची चार मेडिकल कॉलेज, चार पेरिफेरल हॉस्पिटल आणि बीकेसी जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये लसीकरण केले जाणार आहे. यामध्ये पालिकेचे केईएम, नायर, शीव, कूपर, राजावाडी, व्ही. एन. देसाई, भाभा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top