Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune news - फटाकेबाज बुलेटराजांना उठाबशाची सजा, 16 जणांविरुद्ध गुन्हा; 11 दुचाकी जप्त

Pune news - फटाकेबाज बुलेटराजांना उठाबशाची सजा, 16 जणांविरुद्ध गुन्हा; 11 दुचाकी जप्त

सामना 4 days ago

दुचाकींच्या सायलेन्सरमधून फटाक्यासारखा आवाज काढून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या बुलेटराजांविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी कारवाई केली आहे. रात्री-अपरात्री फटाक्यांचा आवाज काढणाऱ्या बुलेटस्वारांमुळे नागरिक हैराण झाले होते.

त्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी मोहीम राबवून बुलेटराजांना अद्दल घडवून त्यांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्यांना पोलिसांनी उठाबशा काढायला लावल्या. तसेच दुचाकी मॉडीफाईड करणाऱ्या गॅरेज मालकांना कारवाईचा दणका देण्यात आला.

काळेपडळ परिसरातील कडनगर चौक, महंमदवाडी, उंड्री, रहेजा व्हिस्टा चौक परिसरात ३१ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत बुलेटस्वार बेशिस्त दुचाकीस्वारांनी धुमाकूळ घातला. सायलेन्सरमधून कानठाळ्या बसवणारे आवाज काढून परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. त्यापार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होताच, संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांच्या आदेशानुसार बेशिस्त दुचाकीस्वार, बुलेटचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष पथक नेमले होते. सहायक पोलीस फौजदार राजस शेख, हवालदार प्रवीण काळभोर, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे यांनी बुलेट चालक, दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई केली.

काळेपडळ पोलिसांनी बुलेटसह ११ दुचाकी जप्त केल्या. मोटार वाहन कायदा, सार्वजनिक शांततेता भंग केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला, तर दुचाकी वाहनांमध्ये सायलेन्सर मॉडीफाईड करणाऱ्या तीन गॅरेजमालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. इतर पसार मॉडीफाईड बुलेटस्वारांचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, सहायक निरीक्षक विलास सुतार, राजस शेख, प्रवीण काळभोर, अमोल फडतरे, नीलेश देसाई, दाऊद सय्यद, प्रतीक लाहीगुडे, शाहीद शेख, अतुल पंधरकर, नितीन ढोले, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे यांनी केली.

हे आहेत बेशिस्त दुचाकीस्वार आणि गॅरेजचालक

सुमित वसंत सगट (वय २०), शिवम दीपक जाधव (वय २१), आर्यन जगन्नाथ गायकवाड (वय १९), सार्थक प्रदीप अल्हाट (वय १८), राज ऊर्फ यश सागर रणदिवे (वय १९), तुषार नितीन गायकवाड (वय २१), धीरज लक्ष्मण गेंजगे (वय २३), प्रेम सिद्धार्थ गायकवाड (वय १८), दयानंद रामचंद्र सुतार (वय ५०), वरद सनी तोडकर (वय १८), दिनेश रितेश लांबोटे (वय १९), राजेश सतीश वाघमोडे (वय १८), रवि किसन लोखंडे (वय २०) यांच्यासह गॅरेजचालक युसूफ फारुख शेख (वय २४), निखिल फुलाजी सरडे (वय २६), रोहन बबलू महापुरे (वय २४) यांच्याविरुद्ध कारवाई केली.

दुचाकी वाहनांमध्ये फेरफार करीत सायलेन्सरमधून फटाक्यासारखा आवाज काढत नागरिकांना त्रास देणाऱ्या बेशिस्तांविरुद्ध कारवाई केली आहे. तसेच गॅरेज मालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही आम्ही बेशिस्तांविरुद्ध सातत्याने कारवाई करणार आहे.

– गिरीशा निंबाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस ठाणे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana