Tuesday, 27 Jul, 7.26 am सामना

ठळक
पूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा पूर्ववत करा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करा. अनेक ठिकाणी रस्ते खचले असून पूल पाण्याखाली गेले आहेत. तेथील वाहतूक तातडीने सुरू करण्यासाठी दुरुस्ती युद्धपातळीवर पूर्ण करा. पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले.

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थिती आणि नुकसानीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज 'वर्षा ' या शासकीय निवासस्थानी आढावा घेतला. पूरग्रस्त भागातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, वीजपुरवठा यांच्या अनुषंगाने बैठकीत तपशीलवार माहिती त्यांनी घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुनः पुन्हा ही आपत्ती येऊ नये. त्यातून बचाव करता येईल यासाठी पूरसंरक्षक भिंती, धोकादायक वस्त्यांबाबत जिल्हानिहाय प्रस्ताव तयार करा. डोंगराळ भागातील खचणारे रस्ते, पायाभूत सुविधांबाबतही एक सर्वंकष आराखडा तयार करा. पंचनामे करण्यासाठी ड्रोन तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश दिले. या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीषकुमार सिंह यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नुकसानभरपाई,

मदतीचे प्रस्ताव तयार करा

नुकसानीबाबतची आकडेवारी आणि करावयाच्या मदतीबाबत तपशीलवार वस्तुनिष्ठ अहवाल तयार करा, जेणेकरून आपद्ग्रस्तांना वेळेत आणि तातडीने मदत पोहचविता येईल. पुराचा फटका बसलेल्या सर्वच व्यापारी, व्यावसायिकांची माहिती एकत्र करा, त्यांना राज्य आणि पेंद्राच्या कोणकोणत्या योजनांमधून सवलत देता येईल, मदत करता येईल त्याबाबतचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

एनडीआरएफच्या धर्तीवर राज्यात प्रत्येक जिह्यात एसडीआरएफ केंद्र

एनडीआरएफच्या धर्तीवर राज्यात प्रत्येक जिह्यात एसडीआरएफचे केंद्र असावे. तसेच त्या ठिकाणी जवानांना मदत व बचावाचे प्रशिक्षण द्यावे यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले.

कोकणातील सात नद्यांवर पुराचा इशारा देणारी यंत्रणा

कोकणामध्ये एपंदर 26 नद्यांची खोरे असून, या ठिकाणी पुराबाबत इशारा देणारी 'आरटीडीएस' यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वित करा, असे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यानुसार जलसंपदा विभागाकडून पहिल्या टप्प्यात सात नद्यांवर येत्या तीन महिन्यांत अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

290 रस्ते, 800 पुलांची वेगाने दुरुस्ती

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार यांनी माहिती दिली की, महाबळेश्वर, पोलादपूर आणि पन्हाळा या ठिकाणचे रस्ते अर्धे खचले आहेत. त्या ठिकाणी पाइप्स टाकून एकमार्गी वाहतूक सुरू करण्यात येत आहे. एकूण 290 रस्ते दुरुस्त करण्याची गरज असून, 469 रस्त्यांवरची वाहतूक बंद आहे. 800 पूल आणि मोऱया पाण्याखाली गेल्या आहेत. प्रत्येक विभागात एक-एक अतिरिक्त मुख्य अभियंता दर्जाचा अधिकारी नियुक्त केला आहे. त्याच्याकडून प्रत्यक्ष सर्वेक्षण केले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सहा लाख घरांचा वीजपुरवठा सुरळीत

ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, बारामती- सातारा आणि पेण अशा दोन उपपेंद्रांचे नुकसान झाले आहे. 14 हजार 737 ट्रान्सफार्मर्स नादुरुस्त झाले होते, त्यापैकी 9 हजार 500 दुरुस्त झाले आहेत. नादुरुस्त 67 उपकेंद्रांपैकी 44 परत सुरू करण्यात आले आहेत. एकंदर 9 लाख 59 हजार बाधित ग्राहकांपैकी साडेसहा लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. महाडमध्ये दोन मोठे वीज मनोरे तातडीने दुरुस्त करणे सुरू आहे.

पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती सुरू, टँकरने पाणीपुरवठा

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांनी सांगितले की, रत्नागिरी, चिपळूण, खेड, पोलादपूर या ठिकाणी पाणीपुरवठा योजनांचे नुकसान झाले असून, रत्नागिरीत 17 गावांना तसेच सिंधुदुर्गात 20 गावांत पाणी पुरवठय़ाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी टँकर्सद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. पूरग्रस्त 746 गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांचे नुकसान झाले आहे.

खराब हवामानामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सातारा दौरा रद्द

तळिये, चिपळूण येथील नुकसानीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली तसेच कोल्हापूरमध्ये पूर, भूस्खलन आणि अन्य घटनांमुळे झालेल्या नुकसानीची हवाई पाहणी करणार होते. साताऱयाच्या पाटण तालुक्यातील पूरपरिस्थितीची पाहणी तसेच महापुराने बाधित झालेल्या लोकांच्या कोयनानगर येथील निवारा छावणीस भेट देऊन संवाद साधणार होते. तेथील जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेऊन पत्रकारांशीही बोलणार होते. मात्र कोयनानगर परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हेलिकॉप्टर उड्डाणासाठी आवश्यक वातावरण नसल्याने हा दौरा रद्द करण्यात आला. मुख्यमंत्री ठाकरे यांचे हेलिकॉप्टर साताऱयात उतरू शकले नाही. त्यामुळे हेलिकॉप्टरचे पुण्यात लॅण्डिंग करण्यात आले. तिथून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत परतले.

वैद्यकीय पथकांच्या घरोघरी भेटी

आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, पूरग्रस्त 496 गावांमध्ये 459 वैद्यकीय पथके प्रत्यक्ष घरोघर भेटी देत आहेत. कोल्हापूर जिल्हय़ात 293 तर रत्नागिरी जिह्यात 6 मदत छावण्या उघडण्यात आल्या आहेत. ही पथके पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीनच्या गोळय़ांचे वाटप, किटकनाशक औषधांची फवारणी करत आहेत. याशिवाय सर्पदंशावरील लसीची पुरेशी उपलब्धता आहे. गरोदर माता आणि लहान मुलांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. लेप्टास्पायरोसीस टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक औषधे देणे सुरू केले आहे. याशिवाय गंभीर रुग्णांना पुरेशा रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

दरडग्रस्त गावांचे पुनर्वसन

महाड येथील तळिये गावाचे पुनर्वसन करण्यासाठी योग्य जागा निश्चित करा. तेथील सोयीसुविधांसाठी नियोजन करा, उद्योजकांचीदेखील मदत घ्या. गावकऱयांना त्यांच्या शेतीसाठी अडचण येणार नाही असे बघा, तसेच त्यांच्या घरांचा आराखडा लगेच तयार करून कार्यवाही करा. अशा प्रकारे डोंगरउतारांवरील वाडय़ा आणि वस्त्या ग्रामीण भागात तसेच शहरी भागातदेखील आहेत. धोकादायक स्थितीतील या वाडय़ा-वस्त्यांचे कशापद्धतीने पुनर्वसन करता येईल यावर निश्चित असा आराखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

पूरग्रस्तांना दहा हजारांची रोख मदत - वडेट्टीवार

सांगली - पुरामुळे घरात पाणी शिरून नुकसान झालेल्यांना प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपये रोख मदत तसेच ज्यांच्या अन्नधान्याचेही नुकसान झाले आहे अशा कुटुंबांना पाच हजार रुपयांची तत्काळ मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जमा करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिली. याशिवाय पूर्णपणे घर पडलं असेल त्यालादेखील मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top