ठळक
राज्य सरकारची मेगाभरती सुरू, आरोग्य विभागाची 8500 जागांसाठी तर पोलीस खात्यात 5300 पदांची भरती प्रक्रिया

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य सरकारने मेगाभरतीला सुरुवात केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने मेगाभरती जाहीर करत 8500 जागांसाठी जाहिरात आज प्रसिद्ध केली. त्याचप्रमाणे पोलीस खात्यात 5300 पदांसाठीची भरती प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
राज्याच्या ग्रामविकास खात्याकडे आरोग्य विभागाची जी जवळपास दहा हजार पदे आहेत ती आणि आरोग्य खात्याची स्वतःची सात हजार पदे अशा 17 हजार पदांपैकी 50 टक्के पदांसाठी आज जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी पुढच्या महिन्यात म्हणजे 28 फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहे.
एसईबीसी उमेदवार हे आर्थिक दुर्बल प्रवर्गाचा लाभ घेऊ शकतात असे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. पोलीस खात्यात 12 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल, तर उर्वरित जागा या दुसऱया टप्प्यात भरण्यात येतील.
2019 मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नव्याने अर्जाची गरज नाही
या परीक्षेसाठी फेब्रुवारी 2019 मध्ये महापोर्टलच्या माध्यमातून अर्ज मागवले होते. त्यामुळे आता जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्या उमेदवारांना पुन्हा नव्याने अर्ज करायची गरज नसल्याचे सांगण्यात येतेय. फेब्रुवारी 2019 साली जे उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरले होते ते उमेदवार आता या नव्या जाहिरातीसाठीही पात्र ठरतील.