राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेला गृहमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत, अशी टीका काँग्रेसचे माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केली.
नवनियुक्त शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि दीप्ती चवधरी यांना डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते काँग्रेस भवन येथे नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. कदम म्हणाले, राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. जलदगती न्यायालयांबाबत सरकारने किती घोषणा केल्या, किती प्रकरणे प्रत्यक्षात चालवली, किती पीडितांना अद्याप न्याय मिळालेला नाही, हे सर्वांसमोर आहे. युद्धस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांवर परिणाम होणार असल्याची पूर्वकल्पना केंद्र सरकारला होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून भाजप सरकार पाच राज्यांतील निवडणुकांतच मग्न राहिले. मतदान संपल्यानंतर ४८ तासांतच इंधनदरवाढ केली. युवकांना ‘झुरळ’ संबोधणे हा युवाशक्तीचा अपमान आहे. वाढती बेरोजगारी आणि युवकांच्या प्रश्नांवर सरकार मीठ चोळण्याचे काम करत आहे. पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून, दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
नाराजी अन् गटबाजीच्या चर्चा
डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते दोन्ही नवनियुक्त शहराध्यक्षांना नियुक्तीपत्र देण्यात आले. मात्र, यावेळी मावळते शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी राज्यमंत्री रमेश बागवे आणि अविनाश बागवे हे या कार्यक्रमासाठी उपस्थित नव्हते. त्यामुळे शहर काँग्रेसमध्ये नाराजी आणि गटबाजी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर विश्वजीत कदम यांनी अरविंद शिंदे यांच्या घराण्याकडून दरवर्षी पंढरपूर येथे विठ्ठलाची महापूजा केली जाते. त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी याबाबत पूर्वकल्पना दिली असल्याचे सांगितले.

