अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी धडाकेबाज कारवाई करायला सुरुवात केली आहे. खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केल्याप्रकरणी योगगुरू रामदेव बाबा यांच्या 'पतंजली' या आयुर्वेदिक उत्पादनांवर मुंढे यांनी कारवाई केली असून या कारवाईमध्ये 73 लाख 24 हजार 656 रुपये किमतीची 'पतंजली'ची औषधे जप्त करण्यात आली.
दिशाभूल आणि भ्रामक जाहिराती प्रसिद्ध करणे आणि अवैध औषध उत्पादन व विक्री विरोधात एफडीए कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल, असा स्पष्ट इशारा मुंढे यांनी दिला आहे. 'औषधे व जादूटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा 1954'चा भंग केल्याप्रकरणी योगगुरू रामदेव बाबा यांच्या उत्तराखंडमधील हरिद्वार येथील मे. दिव्या फार्मसी या 'पतंजली' ब्रॅण्डअंतर्गत औषधांचे उत्पादन करणाऱया नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, कोकण, अमरावती, छत्रपती संभाजी नगर येथील आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. अवैध औषध विक्री, औषधांमधील भेसळ किंवा फसव्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन एफडीएकडून करण्यात आले आहे. तसेच कुठल्याही औषधांवर असलेल्या भ्रामक जाहिरातींवर विश्वास ठेवू नये, असेही एफडीएने म्हटले आहे.
n या कारवाईदरम्यान नागपूर येथील आस्थापनामधून 7 लाख 26 हजार 755 रुपये, नाशिकमधून, 7 लाख 10 हजार 945 रुपये, पुणे येथून 14 लाख 68 हजार 981, मुंबईतून 1 लाख 85 हजार 600 रुपये, कोकण विभागातून 18 लाख 58 हजार, अमरावतीमधून 1 लाख 42 हजार 229 रुपये, छत्रपती संभाजीनगरमधून 48 हजार 718 रुपयांचा औषधांचा साठा जप्त करण्यात आला. पुणे विभागामध्ये केलेल्या कारवाईमध्ये दोन ऍलोपॅथी बनावट औषधांचा तब्बल 21 लाख 83 हजार 428 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
n औषधांच्या दर्जाबाबत शंका असल्यास किंवा अवैध साठवणुकीची माहिती मिळाल्यास नागरिकांनी त्वरित एफडीएकडे तक्रार करावी. तक्रार करताना आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, तसेच संशयित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि औषधाचे नाव स्पष्टपणे नमूद करावे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींची अत्यंत गोपनीयतेने पडताळणी करून तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही एफडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

