Thursday, 04 Jun, 7.15 am सामना

ठळक बातम्या
राणी बागेतील वाघ, चित्ता, तरस, कोल्हा 'होल्डिंग एरियात'! परिसरावर सीसीटीव्ही कॅमेर्‍याचीही नजर

निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील वाघ, चित्ता, तरस आणि कोल्हा अशा मांसाहारी प्राण्यांची व्यवस्था 'होल्डिंग एरियात' करण्यात आली आहे. या ठिकाणी आणखी दोन दिवस त्यांची संपूर्ण देखभाल करण्यात येणार असल्याची माहिती संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली. या शिवाय वादळाच्या पार्श्वभूमीवर राणी बाग परिसरावर सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे.

पालिकेच्या माध्यमातून संपूर्ण उद्यान आणि प्राणी संग्रहालयाचे नूतनीकरण केल्यानंतर आणलेल्या वाघ, चित्ता, तरस, कोल्हा अशा प्राण्यांसाठी नैसर्गिक स्वरूपाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. हे प्राणी पर्यटकांना जवळून पाहता यावेत यासाठी काचेच्या मोठमोठ्या तावदानांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र निसर्ग वादळाचे वेगाने वाहणारे वारे लक्षात घेता खबरदारी म्हणून या ठिकाणच्या प्राण्यांना आरसीसी स्ट्रक्चर असणार्‍या ठिकाणी हलवण्यात आल्याचे डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले. या ठिकाणी प्राण्यांना फिरण्यासाठी, त्यांच्या मोकळ्या हालचालींसाठी पुरेसी जागा उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.

आपत्कालीन स्थितीसाठी २० जणांची टीम
प्राण्यांबरोबरच राणीबागेतील देशी-विदेशी पक्षांवरही प्रशासनाच्या माध्यमातून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहेत. राणी बागेतील आपत्कालिन प्रतिसाद पथकाच्या २० सदस्यांना यासाठी तैनात ठेवण्यात आले. प्राण्यांची देखभाल करणारे कर्मचारी, माळी, सुरक्षा रक्षक आणि झाडांच्या धोकादायक फांद्या कापण्यासाठी नियुक्त कर्मचार्‍यांचा या पथकात समावेश आहे. चक्रीवादळाच्या काळात कोणतीही दुर्घटना घडल्यास तात्काळ मदत कार्याची जबाबदारी या पथकावर असणार आहे. यासाठी आवश्यक साधन सामुग्री पुरविण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top