Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Ratnagiri News - आंबेत पुलाखाली अडकलेल्या बार्जेस बाहेर काढण्यात यश; तांत्रिक पाहणीनंतरच वाहतूक पूर्णपणे सुरू होणार

Ratnagiri News - आंबेत पुलाखाली अडकलेल्या बार्जेस बाहेर काढण्यात यश; तांत्रिक पाहणीनंतरच वाहतूक पूर्णपणे सुरू होणार

सामना 4 days ago

रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या सावित्री नदीच्या खाडीपात्रावरील आंबेत-म्हाप्रल पुलाखाली अडकलेल्या दोन्ही बार्जेस बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. महाड-सापे दिशेकडून वाहून आलेल्या या बार्जेस पुलाच्या मधोमध अडकल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक तातडीने बंद करण्यात आली होती.

मात्र, स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने अथक परिश्रम घेत मंगळवारी रात्री उशिरापर्यंत यातील एक बार्ज पुलापासून दूर केली. तर चिखलात रुतलेली दुसरी बार्ज बाहेर काढण्यासाठी दोन हायड्रा बोटींची मदत घेण्यात आली. अखेर प्रशासकीय यंत्रणेच्या यशस्वी कामगिरीमुळे दोन्ही बार्जेस सुरक्षितपणे हटवण्यात आल्या आहेत.

मंडणगडचे तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जरी दोन्ही बार्जेस बाहेर काढण्यात आल्या असल्या, तरी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि संबंधित तांत्रिक यंत्रणांकडून पुलाची सविस्तर पाहणी केली जाणार आहे. या तांत्रिक पाहणीचा लेखी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुलावरील वाहतूक पूर्णपणे पूर्ववत करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. सध्या सुरक्षेचा उपाय म्हणून अवजड वाहनांना या पुलावरून प्रवास करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवा, दुचाकी आणि लहान चारचाकी वाहनांना प्रशासनाच्या देखरेखीखाली एकेरी (One-way) पद्धतीने सोडले जात आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक अधिकारी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana