अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी खेड येथील न्यायालयाने आरोपीला सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. रोहन शंकर पालकर असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायालयात बुधवारी या खटल्याची सुनावणी पार पाडली.
यावेळी जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. चांदगुडे यांनी ही शिक्षा सुनावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन शाळकरी मुलगी ही कोरोना काळात ऑनलाईन क्लाससाठी मैत्रिणीच्या घरी गेली होती. यावेळी घरी कुणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने पिडीतेला धमकावून तिच्यावर जबरदस्तीने लैगिंक अत्याचार केला. ही बाब कुणाला सांगितल्यास पिडीतेला आणि तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे घाबरुन पीडितेने अत्याचाराबद्दल पालकांना सांगितले नाही.
मुलीची मासिक पाळी चुकल्याने तिची आई तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. यानंतर मुलीच्या पालकांनी खेड पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रा नोंदवली. पीडितेच्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला.
या प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. सदरकामी पिडीतेची स्वतःची साक्ष, वैद्यकीय पुरावे तसेच डी.एन.ए अहवाल महत्त्वाचे ठरले. न्यायालयात सादर केलेल्या पुरावे पाहता आरोपीविरुद्ध गुन्हा सिध्द झाला. सदर प्रकरणी अॅड. मृणाल जाडकर यांनी सरकार पक्षाच्या बाजूने काम पाहिले. तपासिक अंमलदार महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली झेंडे, पोलीस ठाणे खेड तसेच कोर्ट पैरवी चंद्रमुनी ठोके यांचे अनमोल सहकार्य लाभले.

