स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक शौचालये, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचे काम चोख बजावणाऱ्या पंचायत समिती स्तरावरील गट संसाधन केंद्राच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
डिसेंबर २०२५ पासून तब्बल ५ ते ६ महिने झाले तरी गट समन्वयक व समूह समन्वयक पदांवरील या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून ( 1जून 2026) ‘काम बंद’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
एकीकडे शासन विविध योजनांतर्गत फुकट पैसे वाटप करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करत आहे, तर दुसरीकडे शासकीय कार्यालयात इमानेइतबारे रात्रंदिवस काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन द्यायला शासनाकडे पैसे नाहीत. करोडो रुपयांच्या योजना आणून नागरिकांना केवळ गाजर दाखवले जात आहे का? असा संतप्त सवाल कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
दीर्घकाळ पगार न मिळाल्यामुळे या कर्मचाऱ्यांना दैनंदिन घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि रोजचा प्रवास खर्च भागवणेही अशक्य झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत कर्मचारी प्रतिनिधी मिथुन थरवळ आणि सावी दळवी यांनी संगमेश्वर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी लोकरे यांना ‘काम बंद’ आंदोलनाचे अधिकृत निवेदन दिले आहे.

