22 ऑक्टोबर रोजी रिपब्लिक चॅनेलवर पोलीस आयुक्तांविरोधात बदनामीकारक बातमी देण्यात आली होती. त्याप्रकरणात पोलिसांनी अँकर शिवानी गुप्ता हिची चौकशी केली. तेव्हा 'आय न्यूज नामक सॉफ्टवेअरद्वारे मिळालेले आऊटपूट तसेच चॅनेलच्या आऊटपूट डेस्ककडून टेलीप्रॉम्टरद्वारे मिळालेल्या मजकुराच्या आधारे ते वृत्त दिल्याचे अँकर शिवानीने म्हटले आहे. पोलिसांनी त्याबाबत चॅनेलकडे माहिती मागितली परंतू त्यांच्याकडून अजिबात सहकार्य मिळत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिस दलातील अधिकारी आयुक्तांच्या विरोधात बंड करण्याच्या पवित्र्यात असल्याचे खोटे वृत्त रिपब्लिक चॅनेलवर 'बिगेस्ट स्टोरी टुनाईट' या कार्यक्रमात दिले होते.
त्यानुसार पोलिसांनी अँकर शिवानी गुप्ता हिची चौकशी केली. तेव्हा चौकशीतून असे समोर आले की, न्यूज रुममधील आय न्यूज नामक सॉफ्टवेअर द्वारे आऊटपुट इन्चार्ज यांच्या द्वारे तसेच चॅनेलच्या आऊटपुट डेस्ककडून टेलीप्रॉम्टरद्वारे मिळालेला मजकूर अँकर म्हणुन तिने प्रसारित केला. दरम्यान, शिवानीच्या चौकशीनंतर तिने दिलेल्या माहितीची शाहनिशा करण्यासाठी ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलच्या प्रशासनाला नोटिस बजावून संबंधित माहिती मागितली आहे. परंतू अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

