Monday, 20 Jan, 5.00 am सामना

ठळक बातम्या
'सह्याद्रीच्या घोरपडी'वर काळाचा घाला

सह्याद्रीच्या नव्या वाटय़ा शोधून शेकडो जणांना आरोहणाचा मार्ग दाखवणारे 'सह्याद्रीची घोरपड' अशी ओळख असणारे प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा हरिश्चंद्र गडावरील कोकणकडय़ावरून कोसळून मृत्यू झाला. ते 60 वर्षांचे होते. ट्रव्हर्स क्लायम्बिंग या मोहिमेवर असलेले अरुण सावंत कालपासून बेपत्ता होते. बचाव पथकाला रविवारी त्यांचा मृतदेह सापडला. सावंत यांच्यासारख्या ज्येष्ठ मार्गदर्शकाच्या निधनाने गिर्यारोहकांमध्ये शोककळा पसरली आहे.

मुंबईतील 30 जणांचे पथक कोकणकडय़ाच्या मोहिमेवर गेले होते. अरुण सावंत हे त्यांचे गुप लीडर होते. कोकणकडा ते माकडनळ कडय़ापर्यंत त्यांची टीम आधी वरून खाली येऊन त्यानंतर एका टोकाकडून दुसऱया टोकाकडे ट्रव्हर्स क्लायम्बिंग करणार होती. त्यानंतर पुन्हा रॅपलिंग अशी ती मोहीम होती. रॅपलिंगचा पहिला टप्पा पार झाल्यानंतर सावंत यांचा दोर तुटून ते दरीत पडले असा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्यासोबत असलेले इतर गिर्यारोहक सुखरूप आहेत. सावंत यांचा शोध घेण्यासाठी मुंबई, पुणे आणि लोणाकळा येथून पाच रेस्क्यू टीमना पाचारण करण्यात आले. दरीमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. सावंत हे गोरेगाव येथे नागरी निवारा वसाहतीत राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.

  • ज्या कोकण कडय़ावरून कोसळून गिर्यारोहक अरुण सावंत यांचा मृत्यू झाला त्याच कडय़ावर त्यांनी 1986 साली बचाव मोहीम राबवली होती. तेव्हा झालेल्या दुर्घटनेत एका गिर्यारोहकाचा मृत्यू झाला होता. तो मृतदेह सावंत यांनी कोकण कडय़ावरून रॅपलिंग करून कडय़ाखाली आणला होता. एवढे उत्तम गिर्यारोहणाचे कौशल्य असतानाही त्याच ठिकाणावरून कोसळून त्यांचा अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

नव्या वाटांचा शोधकर्ता

अरुण सावंत गेली 40 वर्षे गिर्यारोहणाच्या प्रांतात आहेत. 1985 साली लोणाकळा येथील डय़ुक्स नोजवर आरोहण करणारे ते पाहिले गिर्यारोहक ठरले होते. अरुण सावंत यांच्या डोंगरभटकंतीला 1975 पासून सुरुवात झाली. त्यांच्या या भटकंतीला गिरिविहारच्या 1979 मधील प्रस्ताकरोहण शिबिरामुळे दिशा मिळाली. गिरिविहार आणि हॉलिडे हायवर्सच्या माध्यमातून त्यांनी फ्रेंडशिप, लडाख, मनाली, क्षितीधर, सैफी, भागीरथी या हिमालयातील मोहिमांमध्ये भाग घेतला, पण त्यांचा ओढा कायमच हिमालयापेक्षा सहय़ाद्रीकडेच राहिला. 1984 पासून गिर्यारोहणाच्या त्यांच्या मोहिमेला सुरुवात झाली. यामध्ये त्यांनी तुंगी, माहुली, भटोबा, तैलबैलाची भिंत, हरिश्चंद्र गडाजवळील शेंडी सुळका, कळकराय, भिक्याची काठी असे अनेक सुळवे सर केले. त्यानंतर त्यांचे नाव ठळकपणे पुढे आले ते डय़ुक्स नोज (नागफणी) सुळक्यावरील पहिल्याच यशस्वी चढाईमुळे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top