अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार आणि अमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोलाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबई युनिटने अटक करून दिल्लीहून मुंबईत आणले. आज रात्री उशिरा त्याला एनसीबीच्या कार्यालयात नेण्यात आले.
गुरुवारी डोलाला सत्र न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
2024 मध्ये हिंदुस्थानने डोलाच्या विरोधात इंटरपोलच्या माध्यमातून रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. परदेशातील तपास यंत्रणा या डोलाचा शोध घेत होत्या. डोला हा तुर्कीमध्ये असल्याची माहिती मिळाली. गेल्या आठवड्यात तुर्की येथील एका हॉटेलमधून डोलाला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला अटक करून मंगळवारी हिंदुस्थानात आणले.
हिंदुस्थानात आणल्यावर त्याला दिल्ली येथील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कार्यालयात नेण्यात आले. तेथे त्याची चौकशी केली. त्यानंतर डोलाला दिल्ली येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची ट्रान्झिट रिमांड दिले. ट्रान्झिट रिमांड दिल्यावर आज एनसीबी मुंबई युनिटने त्याला विमानाने मुंबईत आणले.

