Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सामना अग्रलेख - बघून घेईन, सोडणार नाही! काय करणार?

सामना अग्रलेख - बघून घेईन, सोडणार नाही! काय करणार?

सामना 1 day ago

डणवीस व त्यांचे लोक सूडबुद्धीने वागत आहेत. सरकारच्या भ्रष्टाचारावर बोललेले त्यांना आवडत नाही. ही झुंडगिरी आहे. मुख्यमंत्रीपदावर आहात म्हणून ही झुंडगिरी खपवली जात आहे, पण जनतेत संताप आहे.

एका मिसिंग लिंकमध्ये 2500 कोटी सरळ या झुंडांच्या खिशात गेले. हे महाराष्ट्रासाठी बदनामीकारक आहे. राज्य कोणत्या पक्षाचे आहे, ते कोण चालवितो आहे, यापेक्षा ते कसे चालविले जात आहे याला महत्त्व आहे. आज राज्य चालविले जात नसून 'चंपत राय' पद्धतीचे कॅबिनेट महाराष्ट्र लुटत आहे. त्यावर आवाज उठविणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस बघून घेणार आहेत. म्हणजे नक्की काय करणार? भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणाऱ्यांच्या जिव्हा कापणार आहात की त्यांना कारसेवकांप्रमाणे गोळ्या घालणार आहात?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधकांसाठी वापरत असलेली भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही. एकतर महाराष्ट्रात राजकारण्यांची झुंडशाही वाढली आहे. त्यामुळे गुंडांच्या टोळ्यांना चेव चढला आहे. या टोळ्यांना पोसण्यासाठी भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा वापरला जातो. याच भ्रष्ट पैशांतून आमदार-खासदार फोडले जातात. यावर कोणी बोलायचे नाही असे श्री. फडणवीस यांना वाटणे हे त्यांच्या कमजोर नेतृत्वाचे लक्षण आहे. सरकारने मुंबई-पुणे रस्त्यावर जो मिसिंग लिंक नावाचा प्रकार केला, तो भ्रष्टाचाराचा जागतिक नमुना आहे. मिसिंग लिंकच्या भ्रष्टाचारावर कोणी संशोधन केले तर त्यास केम्ब्रिज, ऑक्सफर्ड विद्यापीठांची 'डॉक्टरेट' उपाधी मिळू शकेल. पहिल्याच पावसात या मिसिंग लिंक प्रकल्पाचे बारा वाजले. या लिंकवर 7,180 कोटी रुपये खर्च केले. एक किलोमीटर मिसिंग लिंक बनवायला 540 कोटींचा खर्च आला. हे अजब आहे. आता जी माहिती समोर आली, त्यानुसार प्रकल्पाची मूळ किंमत 4,797.55 कोटी रुपये होती. त्यात दोन बोगदे, आठ पदरी रोड, दोन पूल असा हा साधारण 13 किलोमीटरचा रस्ता प्रकल्प आराखडा होता. कितीही लुटमार केली तरी (सरकारी नियमानुसार) हा खर्च साडेपाच हजार कोटींवर जाऊ शकत नाही (खाऊन-पिऊन, ढेकर देऊन), पण या मिसिंग लिंकचा खर्च 7,180 कोटी केला. मूळ किमतीपेक्षा साधारण 2,500 कोटी वाढीव खर्च करून भ्रष्टाचाराचा जागतिक विक्रम केला. मिसिंग लिंक तरीही भसाभसा गळत असेल तर लोकांनी सरकारला प्रश्न विचारू नये? मिसिंग लिंकच्या 2,500 कोटींच्या भ्रष्टाचारावर प्रश्न विचारणाऱ्या जनतेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी दम दिला आहे, ''आमच्या भ्रष्टाचारावर प्रश्न विचारणे ही महाराष्ट्राची बदनामी आहे. बदनामी करणाऱ्यांना बघून घेईन.''

भ्रष्टाचारावर शंका

उपस्थित करणाऱ्यांना 'भाडोत्री', 'कुत्रे' वगैरे शेलक्या शब्दांनी अलंकृत करून मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत नवा पायंडा पाडला. फडणवीस एकदा म्हणाले, ''शरद पवार, उद्धव ठाकरे म्हणजे तर महाराष्ट्र नाही.'' मग देवेंद्र फडणवीस म्हणजे कणभरसुद्धा महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र तोडण्याचे स्वप्न घेऊनच ते राजकारणात आले. त्यामुळे त्यांचे महाराष्ट्र राज्याशी भावनिक नाते नाही. मोगल, इंग्रजांप्रमाणे लुटायचे व निघायचे हेच त्यांचे धोरण आहे. सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांची मोठी 'माळ' महाराष्ट्राला लाभली आहे. यशवंतराव चव्हाणांपासून संस्कार, संस्कृतीची परंपरा महाराष्ट्र जपत आला आहे. यशवंतरावांविषयी बोलायचे तर प्रज्ञा आणि प्रतिभा, विवेक आणि विचार, संयम आणि सहिष्णुता, मर्दुमकी आणि मुत्सद्देगिरी या गुणांनी मंडित असे हे व्यक्तिमत्त्व होते. यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वात महाराष्ट्राचे आणि भारताचे महन्मंगल करण्याचे प्रचंड सामर्थ्य साठविलेले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या अंगात यशवंतरावांप्रमाणे एक तरी गुण आज दिसत आहे काय? मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, शरद पवार, विलासराव देशमुख, मनोहर जोशी, उद्धव ठाकरे अशा मुख्यमंत्र्यांनी मराठी शब्दांचे सामर्थ्य जाणले व ते तोलून मापून वापरले. विधानसभेचा वापर त्यांनी विरोधकांना धमक्या देण्यासाठी आणि भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी केला नाही. सर्वच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला विचार आणि दिशा दिली. विचार हे भ्रष्टाचारातून, धमकीच्या भाषेतून प्राप्त होत नाहीत. ते सामर्थ्य संस्कारांतून आणि संघर्षातून येते. ''बघून घेईन'' ही भाषा गुंडांची आहे व अशी भाषा वापरणाऱ्या राज्यकर्त्याला संविधानिक पदावर बसण्याचा अधिकार नाही. फडणवीस यांचा कोणत्याही सामाजिक चळवळीशी कधीच संबंध आला नाही.

स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षाचे

वारे त्यांच्या कानावरून गेले नाहीत. भाजप, मिंधे गट म्हणजे काही अलंकारांची खाण नाही. भ्रष्टाचारातून झालेली ही उत्पत्ती आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? सार्वजनिक जीवनातील नेत्यांनी आपल्यावर काही बंधने घालून घेऊन आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायला हव्यात. नैतिक चारित्र्य, कर्तृत्व, अभ्यासूपणा, गुणग्राहकता, लोकसंग्रह यांना सार्वजनिक जीवनात विशेष महत्त्व असते. ज्याच्या जवळ किमान ही पुंजी नसेल तो फारशी प्रगती करू शकणार नाही. फडणवीस, मिंधेंसारख्या लोकांना जर वाटत असेल की, आपण स्वयंसिद्ध आहोत किंवा परिपूर्ण आहोत तर ते चुकीचे आहे. सरकारच्या बाहेर अशी अनेक मोठी मंडळी होऊन गेली की, त्यांनी राज्यात अचाट काम करून ठेवले आहे, पण फडणवीस व त्यांचे 'उप'टराव यांचे मोठे काम म्हणजे 50-50 कोटींना आमदार-खासदार विकत घेऊन राज्य चालवणे. लोकशाहीची ही विटंबना आहे. त्यातून महाराष्ट्राची बदनामी होते असे या लोकांना वाटत नाही. फडणवीस व त्यांचे लोक सूडबुद्धीने वागत आहेत. सरकारच्या भ्रष्टाचारावर बोललेले त्यांना आवडत नाही. ही झुंडगिरी आहे. मुख्यमंत्रीपदावर आहात म्हणून ही झुंडगिरी खपवली जात आहे, पण जनतेत संताप आहे. एका मिसिंग लिंकमध्ये 2500 कोटी सरळ या झुंडांच्या खिशात गेले. हे महाराष्ट्रासाठी बदनामीकारक आहे. राज्य कोणत्या पक्षाचे आहे, ते कोण चालवितो आहे, यापेक्षा ते कसे चालविले जात आहे याला महत्त्व आहे. आज राज्य चालविले जात नसून 'चंपत राय' पद्धतीचे कॅबिनेट महाराष्ट्र लुटत आहे. त्यावर आवाज उठविणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस बघून घेणार आहेत. म्हणजे नक्की काय करणार? भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणाऱ्यांच्या जिव्हा कापणार आहात की त्यांना कारसेवकांप्रमाणे गोळ्या घालणार आहात?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana