Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सामना अग्रलेख - डॉ. मुखर्जी व आजचा भाजप

सामना अग्रलेख - डॉ. मुखर्जी व आजचा भाजप

सामना 3 days ago

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना अखंड हिंदुस्थानचे प्रणेते वगैरे ठरवण्याचा आटापिटा निरर्थक आहे. राष्ट्रनिर्माण, त्याआधी स्वातंत्र्य लढा व इतर कोणत्याही चळवळीत त्यांचा सहभाग असल्याचे पुरावे नाहीत.

मुखर्जी यांना मानणारा समाज राम मंदिर ट्रस्टचे काम पाहतो व त्यांनी प्रभू श्रीरामाच्या मंदिरावर सगळ्यात मोठा दरोडा टाकला आहे. याच लोकांनी हिंदुत्ववादी शिवसेनेचे तुकडे केले व त्यासाठी संविधानाचा गैरवापर केला. हे तेच लोक आहेत, जे पहलगाम हल्ल्यानंतर पाकड्यांना फक्त सुका दम देत राहिले आणि 'ऑपरेशन सिंदूर' अर्धवट सोडून गायब झाले. प्रे. ट्रम्प यांच्या दबावाखाली सरळ माघार घेतली. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना मानणाऱ्या लोकांकडून राष्ट्रभक्ती व शौर्याची अपेक्षा करता येणार नाही. त्यांच्यामुळे देश, हिंदुत्व आणि राम असुरक्षित झाले आहेत हेच खरे!

भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व, त्यांचे राष्ट्रीयत्व वगैरे एक अजब रसायन आहे. त्यात शुद्ध आणि पवित्र असे काहीच नाही. हिंदुत्वाच्या नावाखाली अयोध्येवर ताबा मिळवला व थेट श्रीराम मंदिरावर दरोडा टाकला. या दरोडाप्रकरणी चंपत राय यांना दूर केले, पण चंपतच्या जागी ज्यांना आणले ते बजरंग लाल बागडा, यांचे आधीचे कारनामे पाहिले तर चंपत बरे होते असेच म्हणायची वेळ आली आहे. हे असे का? याचे कारण भाजपच्या निर्मितीत घोटाळा आहे. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची 125 वी जयंती भाजपने 6 तारखेला साजरी केली. (डॉ. मुखर्जी हेच भाजपचे मूळ पिताश्री आहेत.) पंतप्रधान मोदींपासून अनेक मोठ्या नेत्यांनी डॉ. मुखर्जी यांच्यावर श्रद्धासुमने उधळली. पंतप्रधान मोदी यांनी डॉ. मुखर्जी यांना अखंड भारताचे प्रणेता म्हटले आहे. मुखर्जी हे राष्ट्रवादी (प्रखर), महान शिक्षणतज्ञ, सशक्त व आत्मनिर्भर भारतराष्ट्र निर्माण करण्यातल्या त्यांच्या जीवनाबाबत मोदी यांनी जनतेला माहिती दिली. डॉ. मुखर्जी यांच्या राष्ट्रकार्याची महती सांगणारे लेख पंतप्रधान मोदी यांनी लिहिले व प्रसिद्ध करून घेतले. डॉ. मुखर्जी हे भारताचे भाग्यविधाते वगैरे असल्याचे त्या लेखात म्हटले आहे. हा बनचुकेपणा आहे. देशाच्या खऱया भाग्यविधात्यांच्या जयंत्या- मयंत्यांच्या दिवशी श्रद्धांजलीचे शब्द कंजूषपणे वापरायचे व देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात 'उलटी' भूमिका घेणाऱ्यांवर फुले उधळायची. डॉ. मुखर्जी यांच्या बाबतीत तोच प्रकार दिसत आहे. श्यामा प्रसाद मुखर्जी हे भारतीय जनसंघाचे संस्थापक आहेत. त्याच जनसंघाचा आजचा 'भाजप' झाला. म्हणजेच भाजपचे मूळ संस्थापक डॉ. मुखर्जी आहेत. मुखर्जी यांचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातले योगदान शून्य आहे. तरीही पंडित नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले. विचारधारा वेगळी असली तरी राष्ट्रनिर्माणासाठी सगळ्यांचीच आवश्यकता आहे, असे पंडित नेहरूंचे मत होते. डॉ. मुखर्जी यांचे राष्ट्राप्रति कर्तृत्व काय? याविषयी अलीकडच्या काळात अनेक दबलेली प्रकरणे समोर आली. डॉ. मुखर्जी खरे कोण होते? हे उघड झाले त्यास

'भाजप'चा अतिरेकी हिंदुत्ववाद

आणि राष्ट्रवादाचे अजीर्ण कारणीभूत आहे. महात्मा गांधींची हत्या झाली तेव्हा डॉ. मुखर्जीसारख्यांच्या आनंदाला उकळ्या फुटल्या. पाकिस्ताननिर्मितीचा ठपका या लोकांनी गांधींवर टाकला, पण स्वतः ते स्वातंत्र्याच्या आंदोलनात कोठेच नव्हते. त्यामुळे देशाचे विभाजन टाळण्यातही ते काहीच करू शकले नाहीत. गांधीहत्या हे ईश्वरी वरदान असल्याचे या लोकांनी ठरवले व गांधीहत्येतील आरोपींच्या बचावासाठी निधी संकलनाची मोहीम ते राबवू लागले. तेव्हा गृहमंत्री सरदार पटेल यांनी श्यामा प्रसाद मुखर्जींना झाप झाप झापले! गांधींच्या खुन्यांना मदत करणे हे अमानुष, विकृत आणि देशद्रोहासारखे कृत्य असल्याचे सरदार पटेल यांनी डॉ. मुखर्जी यांना सुनावले. डॉ. मुखर्जी हे प. बंगालातील सुऱहावर्दी यांच्या सरकारातही सहभागी होते. हे जवळ जवळ मुस्लिम लीगचेच सरकार होते. स्वातंत्र्य, हिंदुत्व, राष्ट्रीयत्व अशा विचारांशी मुखर्जींचा दुरान्वयेही संबंध नव्हता. डॉ. मुखर्जी हे कोलकाता विद्यापीठाचे कुलगुरू होते. विद्यापीठात शिरताच इंग्रजांच्या 'युनियन जॅक'ला सॅल्यूट मारण्याची सक्ती कुलगुरू मुखर्जी यांनी विद्यार्थ्यांवर केली होती व तसा आदेश त्यांनी काढला होता. एका विद्यार्थ्याने 'युनियन जॅक'ला 'सॅल्यूट' करण्यास नकार दिला, तेव्हा त्यास विद्यापीठातून बडतर्फ केले व ब्रिटिश सरकारकडे त्या विद्यार्थ्याची तक्रार केली. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य लढा शेवटच्या टोकावर नेला व 'चले जाव'चा नारा दिला. लोकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले. डॉ. मुखर्जी यांनी 'इंग्रज चले जाव' आंदोलनास विरोध केला. इतकेच करून ते थांबले नाहीत, तर 'चले जाव' आंदोलन बळाचा वापर करून मोडून काढा, असे इंग्रजी सरकारला सुचवले. नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेना घेऊन भारताच्या दिशेने पूच करू लागले, तेव्हा श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी नेताजींना विरोध केला. आझाद हिंद सेना व नेताजींविरुद्ध कडक कारवाई करावी, असे त्यांनी इंग्रज सरकारला सुचवले. भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी डॉ. मुखर्जी यांनी उभा दावा मांडला व संधी मिळेल तेव्हा

स्वातंत्र्यसेनानींना विरोध

करत राहिले. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी व नेताजींचा फॉरवर्ड ब्लॉक पक्षातील संघर्ष इतक्या टोकाला गेला की, मुखर्जी बंगालात सभा करत होते तेव्हा नेताजींच्या फॉरवर्ड ब्लॉकचे कार्यकर्ते त्यांच्या सभा उधळून लावत. त्यांच्यावर दगडफेक करत. पुढे जाऊन हिंदुत्ववादी विचारांच्या जनसंघाची त्यांनी स्थापना केली. वीर सावरकरांच्या हिंदू महासभेला विरोध करण्यासाठी मुखर्जी यांनी हा उपद्व्याप केला, असे म्हणतात. वीर सावरकर हिंदुत्वाची वकिली करत असताना मुखर्जी यांनी जनसंघ निर्माण का केला? त्यामागे वेगळ्या शक्ती कार्यरत होत्या. 370 कलमाविरोधात मुखर्जी यांनी कश्मीरात जाऊन बलिदान केले, असे सांगितले गेले. ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला साधे खरचटवून घेतले नाही त्यांनी अखंड हिंदुस्थानसाठी बलिदान केले ही दंतकथा ठरते. सरदार वल्लभभाई पटेल भारतीय संविधान सभेत '370' मंजूर करून घेत होते, तेव्हा डॉ. मुखर्जी यांनी त्याविरोधात एक शब्दही काढला नाही.डॉ. आंबेडकर संसदेत हिंदू कोड बिल मंजूर करण्याच्या प्रयत्नात होते. तेव्हा डॉ. मुखर्जी यांनी हिंदू कोड बिलास विरोध केलाच, पण डॉ. आंबेडकरांचाही अपमान केला. त्यामुळे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना अखंड हिंदुस्थानचे प्रणेते वगैरे ठरवण्याचा आटापिटा निरर्थक आहे. मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपये प्रसिद्धीसाठी खर्च होतात, त्याचे औचित्य काय? राष्ट्रनिर्माण, त्याआधी स्वातंत्र्य लढा व इतर कोणत्याही चळवळीत त्यांचा सहभाग असल्याचे पुरावे नाहीत. मुखर्जी यांना मानणारा समाज राम मंदिर ट्रस्टचे काम पाहतो व त्यांनी प्रभू श्रीरामाच्या मंदिरावर सगळ्यात मोठा दरोडा टाकला आहे. याच लोकांनी हिंदुत्ववादी शिवसेनेचे तुकडे केले व त्यासाठी संविधानाचा गैरवापर केला. हे तेच लोक आहेत, जे पहलगाम हल्ल्यानंतर पाकड्यांना फक्त सुका दम देत राहिले आणि 'ऑपरेशन सिंदूर' अर्धवट सोडून गायब झाले.

प्रे. ट्रम्प यांच्या दबावाखाली सरळ माघार घेतली. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना मानणाऱया लोकांकडून राष्ट्रभक्ती व शौर्याची अपेक्षा करता येणार नाही. त्यांच्यामुळे देश, हिंदुत्व आणि राम असुरक्षित झाले आहेत हेच खरे!

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana