Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सामना अग्रलेख - हे जिंकतात तरी कसे?

सामना अग्रलेख - हे जिंकतात तरी कसे?

सामना 2 weeks ago

. बंगालातील विजयानंतर भाजपचे पुढारी म्हणाले, ममता बॅनर्जी यांना हिंदूंनी मतदान केले नाही. भाजपचा निवडणुका लढण्याचा हाच 'पॅटर्न' आहे. देशभरात महिलांवर अत्याचार वाढले आहेत.

महाराष्ट्रात चिमुकल्या मुलींवर बलात्कार करून त्यांना ठार केले जात आहे. मात्र लोक हे सर्व स्वीकारतात. भाजपच्या या जुलमी राजवटीस मतदान करतात. मुलींवरील बलात्कारांनी धरणी कापत असताना महाराष्ट्रात, प. बंगाल, आसामच्या निवडणुकीत विजय मिळाला म्हणून 'उत्सव' साजरे होतात हे लोकशाहीचे भेसूर रूप सध्या दिसत आहे. अशा विकृतीला कोणी धर्माचा विजय म्हणणार असतील तर धर्माच्या रक्षणासाठी यापुढे कोणीही अवतार पृथ्वीवर अवतरणार नाही. कारण खरा धर्म बुडताना दिसत आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल भारतीय जनता पक्षाने जसे ठरवले होते त्याप्रमाणेच लागले आहेत. मोदी-शहा यांनी निवडणुका ताब्यात घेण्याचा एक 'पॅटर्न' ठरवला आहे. त्या पॅटर्ननुसार भाजपने आसाम आणि प. बंगाल जिंकले. त्याच पॅटर्ननुसार तामीळनाडूत सत्तापरिवर्तन घडवून 'द्रमुक'ला बाहेर काढले. अभिनेता विजय याच्या 'टीव्हीके' पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही, पण मतविभागणी करून टीव्हीके शंभरपेक्षा जास्त जागा जिंकणार, हे निश्चित झाले आहे. द्रमुक-काँग्रेस युतीला 70 च्या आसपास जागा तर भाजप-अण्णा द्रमुक युतीला 50 च्या मागे-पुढे जागा मिळतील. केरळात काँग्रेसने मुसंडी मारली, तर आसामात भाजपने मोठे यश मिळवले. पुद्दुचेरीत भाजपने पुन्हा सत्ता राखली. पाच राज्यांतील निवडणूक निकाल भाजपसाठी 'गेम चेंजर' ठरले, पण हे निकाल सरळ मार्गाने आल्याचे दिसत नाही. सगळ्यात जास्त उत्कंठा प. बंगालात काय घडेल याची होती! ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने याआधीच्या तीन निवडणुका सलग जिंकल्या. या काळात ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी मोदी-शहांनी जंग जंग पछाडले, पण ममता यांचा पराभव करणे त्यांना जमले नाही. मात्र यावेळी मोदी-शहांना निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या रूपाने तिसरा भिडू मिळाला. त्यामुळे भाजपला आताच्या निवडणुकीत यश मिळाले. प. बंगालमध्ये भाजप जिंकला त्याचे श्रेय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना द्यावे लागेल. ज्ञानेश कुमार प. बंगाल निवडणुकीत भाजपच्या मित्रपक्षाप्रमाणे वावरले. तीन लाखांचे अर्धसैनिक बल बंगालात उतरवले. राज्य सरकारचे सर्व अधिकारी राज्याबाहेर पाठवले. निवडणूक निष्पक्ष व्हावी हा त्यांचा 'उदात्त' हेतू होता, पण हाच 'उदात्त' हेतू त्यांनी आसामात दाखवला नाही. प. बंगालात

सत्ता स्थापनेचे स्वप्न

मोदी-शहांनी बाळगले. त्यासाठी बंगालच्या मतदार यादीतून 92 लाख मतदारांची नावे उडवली. हे बहुसंख्य ममता बॅनर्जी यांना मानणारे मतदार होते. भारतीय जनता पक्ष निवडणुका कशा पद्धतीने लढवतो व जिंकतो हे पुन्हा दिसले. तामीळनाडू व प. बंगालातील निकाल राष्ट्रीय राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे आहेत. ज्या बेइमान पद्धतीने निवडणूक आयोग वागला ते पाहता यापुढे विरोधी पक्षांनी निवडणुका लढायच्या की नाहीत हा विचार गांभीर्याने करावा लागेल. प. बंगालच्या मतदानानंतर लगेच भाजपने विजयोत्सवाची तयारी सुरू केली हे रहस्यमय आहे. याचा अर्थ भाजपने जिंकण्याची सर्व कारस्थाने पडद्यामागे रचली होती. लोकशाहीत निवडणुका निष्पक्ष रीतीने झाल्या तर 'पराभव'ही दिलदारीने स्वीकारायचा असतो. जनतेचा काैल म्हणून पराभव मान्य करायचा असतो, पण सध्या ज्या पद्धतीने निकाल लावले जात आहेत त्यास जनतेचा काैल मानता येत नाही, तर निवडणूक आयोगाच्या सहकार्याने भाजपने लावलेले काैल म्हणावे लागतील. प. बंगालात ते उघडपणे दिसले. त्याआधी महाराष्ट्र आणि हरयाणात हाच 'पॅटर्न' दिसला होता. भारतातील लोकशाहीचे हे अधःपतन आहे, निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह आहे. या सगळ्यांची तक्रार घेऊन सुप्रीम कोर्टात जायचे तर तेथे सगळ्यांच्याच तोंडात मोदी-शहांच्या 'पॅटर्न'ने बोळे कोंबले आहेत. त्यामुळे या व्यवस्थेवरचाही विश्वास उडावा अशी स्थिती रोज निर्माण होताना दिसते. तामीळनाडूत द्रमुक व अण्णा द्रमुक हे आलटून पालटून जय-पराजयाचे धनी होतात. या वेळी इथे तिसऱ्या भिडूने

तामीळ जनतेची मने

जिंकली. अभिनेता विजय याच्या टीव्हीके पक्षाला भरघोस मतदान झाले. द्रमुकचे नेते व मुख्यमंत्री स्टॅलिन हे तामीळ अस्मितेसाठी लढत होते. त्यांनी पुन्हा एकदा टोकाचा हिंदी विरोध केला. त्याचा फटका त्यांना बसला काय? पिढी व मतदारांचा विचार बदलतो आहे याचा विचार जुन्या पठडीतले नेते आणि पक्ष करायला तयार नाहीत. त्यामुळे द्रमुक-अण्णा द्रमुकला सोडून तामीळ जनतेने तिसरा पर्याय निवडला. लोकांना बदल हवा असतो हे मान्य, पण मग ते आसामातील भाजपचे अराजक का बदलत नाहीत? मोदी-शहांची व्यापारी पद्धतीची राज्य व्यवस्था देशात अपयशी ठरली आहे. गरीब-मध्यमवर्गीयांचे जगणे त्यांच्या व्यापारी राज्य पद्धतीने कठीण केले आहे. सर्वच महाग झाले आहे. बेरोजगारी वाढली आहे. देशात आर्थिक मंदीची वावटळ उठली आहे. तरीही आसाम, प. बंगालात भाजपला मतदान झाले ते निव्वळ जातीय, धार्मिक तणाव आणि विद्वेषाच्या वातावरणात भाजपने तेल ओतल्यामुळे. प. बंगालातील विजयानंतर भाजपचे पुढारी म्हणाले, ममता बॅनर्जी यांना हिंदूंनी मतदान केले नाही. भाजपचा निवडणुका लढण्याचा हाच 'पॅटर्न' आहे. देशभरात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. महाराष्ट्रात चिमुकल्या मुलींवर बलात्कार करून त्यांना ठार केले जात आहे. मात्र लोक हे सर्व स्वीकारतात. भाजपच्या या जुलमी राजवटीस मतदान करतात. मुलींवरील बलात्कारांनी धरणी कापत असताना महाराष्ट्रात, प. बंगाल, आसामच्या निवडणुकीत विजय मिळाला म्हणून 'उत्सव' साजरे होतात हे लोकशाहीचे भेसूर रूप सध्या दिसत आहे. अशा विकृतीला कोणी धर्माचा विजय म्हणणार असतील तर धर्माच्या रक्षणासाठी यापुढे कोणीही अवतार पृथ्वीवर अवतरणार नाही. कारण खरा धर्म बुडताना दिसत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana