Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सामना अग्रलेख - झुरळांचे बंड!

सामना अग्रलेख - झुरळांचे बंड!

सामना 2 days ago

देशातील नव्या कॉक्रोच पार्टीने अनेकांना 'मंच' दिले. ज्यांच्या डिग्य्रा खणांत धूळ खात पडल्या आहेत, ज्यांच्या स्पर्धा परीक्षांचे पेपर लीक होत आहेत, ज्यांची नोकरीची संधी इंटरव्ह्यूच्या आधीच विकली जाते, ज्यांच्या हक्कांची, अधिकारांची खिल्ली उडवली जाते, ज्यांना नपुंसक, अंधभक्त बनवले गेले अशा सर्व 'झुरळां'ना कॉक्रोच जनता पार्टीत स्थान मिळाले आहे.

भ्रष्ट न्याय व्यवस्था, शासन व्यवस्था, निवडणूक आयोगाची लाचारी यांना आता कॉक्रोचच्या संतापाला तोंड द्यावे लागेल. कॉक्रोच जनता पार्टीचा विजय असो! देशात झुरळांचे बंड सुरू झाले आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत तुमचे आभार!

देशाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या प्रेरणेने कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना झाली आहे. भारत हा तरुणांचा देश आहे, असे आपले पंतप्रधान मोदी नेहमी सांगत असतात. तरुणांत सर्व आव्हाने पेलण्याची ताकद आहे. भारतीय सीमेवर सैन्यात, हवाई दलात तरुण शौर्य गाजवीत आहेत. मोदी यांच्या कृपेने असंख्य तरुण सैन्यात अग्निवीर बनले, पण हे सर्व तरुण कॉक्रोच म्हणजे झुरळ असल्याचे मत सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी व्यक्त केल्यापासून दोन पाय, एक मेंदू, मन असलेल्या झुरळांनी भारतीय कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली. त्यांचे 'बीजेपी' तर झुरळ पार्टीचे 'सीजेपी' असे नामकरण झाले. या झुरळ पार्टीने लाखो तरुणांना आकर्षित केले. सध्या या पार्टीचे अस्तित्व 'सोशल मीडिया'वर आहे, पण मोदी व त्यांचा पक्ष 2014 साली याच सोशल मीडियाचा वापर करून निवडणुकीत उतरला आणि सत्तेवर आला. पुन्हा मोदी यांनी तरुणांना अनेकदा सोशल मीडियाचे महत्त्व समजावून सांगितले. 'रील' बनवणे हा एक रोजगार कमवण्याचा उद्योग आहे. त्यामुळे ते स्वतःही रील बनवून चार पैसे कमवत असावेत व त्याच स्वकमाईच्या पैशांतून इटलीच्या मिस मेलोनी यांना मेलोडी चॉकलेटची भेट नेली असावी. गृहमंत्री अमित शहा हे तर भाजपच्या सायबर सैनिकांचे मेळावे घेतात आणि विरोधकांवर कसे हल्ले करावेत, गोबेल्स पद्धतीने प्रचार कसा करावा याचे धडे देतात. आम आदमी पार्टीचा प्रचार-प्रसार सोशल मीडियातूनच होत असतो. त्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे भविष्य उज्ज्वल आहे, असे आम्ही मानतो. सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भारतीय तरुणांनी आभार मानायला हवेत. त्यांनी भारतीय तरुणांना 'कॉक्रोच' संबोधून मोठे न्यायाचे काम केले. त्यामुळे कॉक्रोच मंडळींची पार्टी खास आहे. कॉक्रोच हा प्राणी कठीण परिस्थितीतही जगत असतो. सिस्टीममध्ये धडपडतो व टिकतो. कॉक्रोचला खतम करण्यासाठी इतक्या प्रकारची

विषारी औषधे

निर्माण झाली, त्यांची जाहिरातबाजी झाली. तरीही आतापर्यंत मच्छर व कॉक्रोचला कोणी नष्ट करू शकलेले नाही. कॉक्रोच कधी निराश होत नाही. तो कठीण परिस्थितीतही जगण्याचा प्रयत्न करतो. भारतीय तरुण त्याच कॉक्रोचसारखा आहे. तो राग व्यक्त करतो, विद्रोहाचा प्रयत्न करतो, नोकरीच्या रांगेत चपला झिजवतो, हरतो व पुन्हा नव्याने सुरुवात करतो. कॉक्रोच हा परजीवी नाही. तो आळशी व बेरोजगार नाही. तो आळशी असता तर कधीच नष्ट झाला असता. या भारतीय कॉक्रोचना खतम करण्यासाठी भाजपने त्यांच्या मेंदूवर ताबा मिळवला. त्यांच्या खांद्यावर केशरी उपरणी टाकली. त्यांच्या कपाळावर गंध फासून धर्मांध केले. नकली हिंदुत्वाची दीक्षा देऊन त्यांच्यातली विचार करण्याची शक्ती नष्ट केली. तरीही सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या प्रेरणेतून दोन दिवसांत लाखो 'झुरळे' एकवटली आहेत. अभिजित दिपके हा 30 वर्षांचा तरुण बोस्टन युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे. त्याने कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना करताच लाखो तरुण या पार्टीचे समर्थक बनले. त्यामुळे सरकार घाबरले. सरकार झुरळांना असे घाबरले की, त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे सोशल मीडियावरील अकाऊंटच बंद केले. सरकारच्या हातात हेच एकमेव बंदीचे हत्यार आहे. हे सरकार नॉर्वेची महिला पत्रकार हेले लिंग यांना घाबरले. सरकार एपस्टीनला घाबरले. सरकार आता झुरळांना घाबरले. झुरळांना घाबरणारे सरकार राज्य करायला नालायक आहे. कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे भारतीय तरुणांचे व्यंगात्मक बंड आहे. 'आळशी आणि बेरोजगार तरुणांचा आवाज' अशी या कॉक्रोच पार्टीची मुख्य घोषणा आहे. या पार्टीचे प्रतीक 'कॉक्रोच' आहे. ते म्हणते, 'होय, आम्ही कॉक्रोच आहोत. आम्हाला मारले तर आम्ही परत येतो. आम्ही अमर आहोत.' अर्थात कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे भारतीय तरुणांतील अस्वस्थतेचा उद्रेक असेल तर या तरुण वर्गाला दिशा दाखवण्यात देशातील विरोधी पक्ष कमजोर पडला, असे म्हणावे लागेल. आम आदमी पक्षातही अशी

क्रांतिकारी झुरळे

होती. मात्र त्या झुरळांतही फूट पाडण्याचे काम मोदी सरकारने केले. देशात कोणताही राजकीय पक्ष, प्रादेशिक पक्ष व संघटना राहू नये असे मोदी सरकारचे मत आहे. देश एकपक्षीय राजवटीकडे निघाला आहे. त्या सिस्टीममध्ये संविधान, लोकशाही, लोकांच्या भावनेला महत्त्व नाही. मात्र असे आवाज दडपण्याचा प्रयत्न ज्या ज्या देशांत झाला तेथे 'Gen z' म्हणजे झुरळे रस्त्यावर उतरली व झुरळांच्या हल्ल्यात तेथील मस्तवाल सरकारे नष्ट झाली. त्यामुळे झुरळांच्या नव्या संघटनेवर मोठी जबाबदारी आहे. कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित म्हणतो, ''भारताची सिस्टीम इतकी सडली आहे की, आता त्याविरुद्ध लढण्यासाठी कॉक्रोचलाच बाहेर यावे लागले.'' राजकारणात व्यंग हे एक शक्तिशाली हत्यार आहे. व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगातून तेव्हाच्या सिस्टीमवर हल्ला केला व शिवसेनेसारखा तरुणांचा पक्ष निर्माण झाला. काँग्रेसमध्ये एकेकाळी तरुण क्रांतिकारक होते. ती झुरळे देशासाठी फासावर गेली. भ्रष्ट सिस्टीमविरुद्ध लढणाऱया झुरळांना माओवादी, नक्षलवादी ठरवून गोळ्या घातल्या गेल्या. तरीही कॉक्रोचची संख्या वाढतेच आहे. कॉक्रोचमध्ये धर्मभेद, जातीभेद, लिंगभेदाचे विष पेरले तरीही कॉक्रोच मरत नाहीत. देशातील नव्या कॉक्रोच पार्टीने अनेकांना 'मंच' दिले. ज्यांच्या डिग्य्रा खणांत धूळ खात पडल्या आहेत, ज्यांच्या स्पर्धा परीक्षांचे पेपर लीक होत आहेत, ज्यांची नोकरीची संधी इंटरव्ह्यूच्या आधीच विकली जाते, ज्यांच्या हक्कांची, अधिकारांची खिल्ली उडवली जाते, ज्यांना नपुंसक, अंधभक्त बनवले गेले अशा सर्व 'झुरळां'ना कॉक्रोच जनता पार्टीत स्थान मिळाले आहे. भ्रष्ट न्याय व्यवस्था, शासन व्यवस्था, निवडणूक आयोगाची लाचारी यांना आता कॉक्रोचच्या संतापाला तोंड द्यावे लागेल. कॉक्रोच जनता पार्टीचा विजय असो! देशात झुरळांचे बंड सुरू झाले आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत तुमचे आभार!

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana