Friday, 02 Oct, 5.10 am सामना

ठळक बातम्या
सामना अग्रलेख - माझे कुटुंब, माझीच जबाबदारी!

हिंदुस्थानात कोरोनाचे संक्रमण वाढतच आहे. गेल्या चोवीस तासांत 85 हजारांच्या आसपास कोरोनाचे रुग्ण समोर आले. महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासांत पंधरा हजार लोक कोरोनाग्रस्त झाले. त्यामुळे 'अनलॉक-5' मध्येही सगळे आलबेल आहेच असे नाही. महाराष्ट्रातले दोन प्रमुख मंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार हे कोरोना संक्रमित आहेत. हे चित्र काही आशादायक नाही. त्यामुळे स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घेणे हाच कोरोनावर विजय मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. मास्क ही ढाल, तर सामाजिक दुरी ही तलवार आहे. 'लस' येईल तेव्हा येईल, तोपर्यंत माझे कुटुंब, माझीच जबाबदारी!

'अनलॉक-5' ची घोषणा सरकारने केली आहे. महाराष्ट्र सरकार राज्यातील 'अनलॉक' केंद्राच्याच मार्गदर्शक तत्त्वांनुसार करीत आहे व तेच योग्य आहे. लॉक डाऊन 2 आणि 3 चे पालन काटेकोरपणे झाले असते तर बऱयाच गोष्टी सुरळीत झाल्या असत्या. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे आजही कोरोनाग्रस्त आहेत. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांतील स्थिती अद्यापही संपूर्ण नियंत्रणाखाली आलेली नाही व पंतप्रधान मोदी हे सर्वच बाबतीत 'जादूगार' किंवा सुपरमॅन असले तरी कोरोनास पळवून लावणारी जादूची छडी त्यांच्या हाती नाही. त्यामुळे 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' हेच हत्यार या कोरोनास पराभूत करण्यासाठी वापरावे लागेल. तोंडावरील मास्क हीच आता ढाल आहे व सामाजिक दुरी राखणे ही तलवार आहे. 'अनलॉक-5' मध्ये नव्या सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. देशभरातील सिनेमाघरे, मल्टिप्लेक्स पन्नास टक्के क्षमतेने चालू करण्याची परवानगी केंद्रीय गृहखात्याने दिली आहे. बार, रेस्टॉरंटदेखील पन्नास टक्के क्षमतेने सुरू होतील. मनोरंजन पार्क, स्वीमिंग पूल वगैरे सुरू करता येईल. शैक्षणिक संस्थांनाही मोकळीक मिळाली आहे. शाळा कधी व कशा सुरू करायच्या याबाबत राज्य सरकारांनी 5 ऑक्टोबरनंतर निर्णय घ्यायचा आहे, पण आजही 75 टक्के पालक मुलांना शाळेत पाठवायच्या मनस्थितीत नाहीत. धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांस 100 पेक्षा जास्त लोकांनी जमायचे नाही. कॉर्पोरेट कंपन्यांचे एक्झिबिशन्स, चर्चासत्रे यांना अटी, शर्तींवर परवानगी मिळाली आहे. चांगली बातमी अशी की,

मुंबईतील डबेवाल्यांना

लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे, पण मुळात मुंबईची उपनगरीय रेल्वे सुरू झाली आहे काय? पुण्याच्या लोकल सेवेस सरकारने परवानगी दिली, पण मुंबईचा नोकरदार वर्ग आजही लोकलच्या प्रतीक्षेत फलाटावरच उभा आहे. उद्योगधंदे उघडण्यास परवानगी दिली, पण कामगार कामाच्या ठिकाणी कसा पोहोचणार? म्हणजे रेस्टॉरंट उघडा असे सांगितले, पण रेस्टॉरंटमध्ये काम करणारा नोकरवर्ग त्या ठिकाणी कसा पोहोचणार? याचे नियोजन नीट झालेले दिसत नाही. गर्दी टाळता यावी म्हणून दिवस व रात्र अशा दोन वेळांत काम व्हावे. त्यामुळे काही नियम पाळता येतील, असे मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले. सर्वांसाठी लोकल सेवा सुरू होईल असे त्यांनी स्पष्ट केले. पण हे सर्व कधी व कसे घडणार? लोकांनी ईद साजरी केली नाही, सार्वजनिक गणेशोत्सवात संयम राखला. गणपती कधी आले व गेले ते समजलेच नाही. इतका फिका गणेशोत्सव इतिहासात कधी साजरा झाला नव्हता, पण संकटच असे गंभीर आहे की, आनंदास मुरड घालून सण-उत्सव साजरे करावे लागले आहेत. आता नवरात्री, दसरा, पाठोपाठ दिवाळी येत आहे. लगोलग नाताळ आणि नववर्षाचे आगमन आहेच. दसरा-दिवाळीत गर्दी तर होणारच. नवरात्रीच्या दांडियावर बंधने आलीच आहेत, पण शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे भविष्यही या क्षणी अधांतरीच आहे. लाखो लोक विचारांचे सोने लुटायला शिवतीर्थावर जमतात. महाराष्ट्रातला हा एक राजकीय, पण सांस्कृतिक उत्सवच असतो. अनेक वादळांत हा

दसरा मेळावा

आजपर्यंत झालाच आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला असताना शिवसैनिकांच्या उत्साहास कसा बांध घालायचा हा प्रश्नच आहे. पण कायदा, नियमांचे पालन तर करावेच लागेल. छत्रपती शिवराय, आई जगदंबा जो मार्ग दाखवतील त्याच मार्गाने पुढे जावे लागेल. कायद्याच्या राज्याला गालबोट लागेल आणि त्यामुळे विरोधकांना टीकेचा दांडिया नाचवता येईल, असे काहीच घडणार नाही. हे सर्व ठीक असले तरी अनलॉक-5 मुळे लोकांचे जनजीवन थोडे तरी रुळावर यावे अशी अपेक्षा आहे. नोकरीधंद्याचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे राज्याची व देशाची अर्थव्यवस्था ठेवा बाजूला, सामान्यांची, मध्यमवर्गीयांची तोळामासाची अर्थव्यवस्थाही मातीमोल झाली आहे. सर्वत्र अंधकार आणि निराशा आहे. त्या निराशेतून लोकांना बाहेर काढले नाही, तर महाराष्ट्राच्या लढवय्या परंपरेस गालबोट लागेल. हिंदुस्थानात कोरोनाचे संक्रमण वाढतच आहे. गेल्या चोवीस तासांत 85 हजारांच्या आसपास कोरोनाचे रुग्ण समोर आले. महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासांत पंधरा हजार लोक कोरोनाग्रस्त झाले. त्यामुळे 'अनलॉक-5' मध्येही सगळे आलबेल आहेच असे नाही. महाराष्ट्रातले दोन प्रमुख मंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार हे कोरोना संक्रमित आहेत. हे चित्र काही आशादायक नाही. त्यामुळे स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घेणे हाच कोरोनावर विजय मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. मास्क ही ढाल, तर सामाजिक दुरी ही तलवार आहे. 'लस' येईल तेव्हा येईल, तोपर्यंत माझे कुटुंब, माझीच जबाबदारी!

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top