Monday, 20 Jan, 5.00 am सामना

ठळक बातम्या
सामना अग्रलेख - माणुसकीला काळिमा!

निर्भया प्रकरणानंतर जनजागृती होऊनही या घटना थांबताना दिसत नाहीत. कधी दिल्ली, कधी उत्तर प्रदेश तर कधी आंध्र प्रदेशात आणि देशाच्या इतर भागांतही रोज कुठे ना कुठे माणुसकीला काळिमा फासणाऱ्या स्त्री अत्याचाराच्या घटना घडतच आहेत. केवळ कठोर कायदे करून ही विकृती नष्ट होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. समाजात संस्कारमूल्ये रुजविणेही कायद्याइतकेच महत्त्वाचे आहे. त्यावरही आता काम व्हायला हवे!

मानव जातीची मान शरमेने खाली झुकावी, अशा दोन घटना मराठवाड्यात घडल्या आहेत. दोन्ही घटना अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या आणि माणुसकीला काळिमा फासणाऱया आहेत. सहा वर्षांपूर्वी दिल्लीतील निर्भयाचे बलात्कार आणि खून प्रकरण खूप गाजले. अशा घटना रोखण्यासाठी खास कायदा वगैरे झाला, पण त्यानंतरही देशात सातत्याने अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना घडतच आहेत. या घटना रोखायच्या तरी कशा? निर्भयाच्या घटनेतून देशातील स्त्री शक्ती एकवटल्याचे दर्शन घडले, पण पुढे काय? राजधानी दिल्लीपासून देशाच्या कानाकोपऱयात कॅण्डल मार्च निघाले, आंदोलने झाली. निर्भयावर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या नराधमांना न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. निर्भयाच्या नृशंस हत्याकांडातील गुन्हेगारांना वाचविण्यासाठी काही दयाबुद्धीवाले बुद्धिवादी अजूनही गळा काढत असले, तरी येत्या काही दिवसांत निर्भयावर अनन्वित अत्याचार करणारे गुन्हेगार फासावर लटकलेले दिसतील. फाशीचा दोरखंडही वळून तयार आहे. जल्लादही ठरला आहे. त्या नराधमांचा अंत आता कोणीही रोखू शकणार नाही. मात्र, अशा प्रकारचे राक्षसी कृत्य करणाऱ्या विकृतींचा अंत कधी होणार आणि या घटना रोखायच्या कशा, असे प्रश्न मराठवाडय़ातील दोन घटनांनी नक्कीच उपस्थित केले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील शंकरनगर येथील शाळेत सातवीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर दोन शिक्षकांनी शाळेतच लैंगिक अत्याचार केले. शिक्षण क्षेत्रालाच नव्हे तर माणुसकीलाही काळिमा फासणारी ही घटना आहे. मुलीने घडला प्रकार आईला सांगितल्यानंतर आईने मुख्याध्यापकांची भेट घेऊन तक्रार केली. मात्र, अत्याचार करणाऱ्या शिक्षकांना पोलिसांच्या हवाली करण्याऐवजी मुख्याध्यापकांनी पीडित मुलीच्या आईकडूनच याविषयी कोणालाही न बोलण्याचे शपथपत्र लिहून घेतले. दोन महिन्यांनंतर या प्रकरणाला वाचा फुटली आणि दोषी शिक्षक व त्यांची पाठराखण करणाऱयांवर गुन्हे दाखल झाले. दुसरी घटना संभाजीनगरची आहे. ती तर आणखीनच भयंकर! गतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱया स्कूल व्हॅनच्या चालकाने आपल्या दोन साथीदारांसह गतिमंद मुलींसोबत अश्लील वर्तन केले. या नराधमांनी जे काही केले, ते शब्दात लिहिणेही कठीण आहे. ज्यांना काहीच कळत नाही, ज्यांच्या तोंडातून एक शब्दही फुटत नाही त्यांच्याविषयी मनात सहानुभूती निर्माण होत नसेल तर तो माणूसच नाही.

ज्या व्हॅनचालकाच्या भरवशावर पालकांनी आपल्या विशेष मुली पाठविल्या, त्यानेच घात केला. रस्त्यामध्ये व्हॅन थांबवून आणखी दोन नराधमांना त्याने सोबत घेतले. मुलींचा विनयभंग करत फोटो घेतले, व्हिडिओ क्लिप तयार केल्या. व्हिडिओ गुन्हेगारांनी आपल्या व्हॉट्सऍप स्टेट्सवर टाकले. आपल्या निर्लज्जपणाचा कळस जगाने पहावा, ही गलिच्छ मानसिकता येते तरी कुठून? ही विकृती भयंकर आहे. जनावरांनीही माना खाली घालाव्यात, अशा घटनांना पाशवी तरी कसे म्हणायचे? आता या नराधमांना अटक झाली आहे. निर्भया प्रकरणानंतर जनजागृती होऊनही या घटना थांबताना दिसत नाहीत. कधी दिल्ली, कधी उत्तर प्रदेश तर कधी आंध्र प्रदेशात आणि देशाच्या इतर भागांतही रोज कुठे ना कुठे माणुसकीला काळिमा फासणाऱया स्त्री अत्याचाराच्या घटना घडतच आहेत. केवळ कठोर कायदे करून ही विकृती नष्ट होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. समाजात संस्कारमूल्ये रुजविणेही कायद्याइतकेच महत्त्वाचे आहे. त्यावरही आता काम व्हायला हवे!

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top