Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सामना अग्रलेख - 'नॉर्वे'कर मंडळींचे आभार!

सामना अग्रलेख - 'नॉर्वे'कर मंडळींचे आभार!

सामना 4 days ago

'नॉर्वे'कर पत्रकार व राजकीय विश्लेषकांचे ठाम म्हणणे आहे की, 43 वर्षांनंतर पंतप्रधान मोदी यांनी नॉर्वेत दौरा केला तो अदानी समूहाला 'काळ्या यादी'तून बाहेर काढण्यासाठी.

अमेरिकेने अदानींवरील भ्रष्टाचाराचे खटले मागे घेतले तसे 'नॉर्वे'कर मंडळींनीही प्रिय अदानींवरील खटले मागे घ्यावेत याच हेतूने पंतप्रधान मोदी नॉर्वेत आले, पण हा दौरा पत्रकार हेले लिंग यांच्या एका प्रश्नाने गाजवला. मोदींचे पलायन हाच जगभरात चर्चेचा विषय ठरला. मोदी सध्या इटलीत मिसेस मेलोनी यांच्यासोबत 'सूटबूट' पोशाखात आहेत. मोदींच्या राजकारणात हीच 'मेलोडी' आहे. भारतीय पत्रकारांना जे जमले नाही ते 'नॉर्वे'करांनी' करून दाखवले! त्यांचे आभार!!

भारतीय जनतेला काटकसरीचा, परदेश दौरे टाळण्याचा उपदेश झोडून स्वतः पंतप्रधान मोदी हे सात देशांच्या दौऱ्यावर निघून गेले. हा फसवाफसवीचा उद्योग फक्त आपले पंतप्रधान मोदीच करू शकतात. भारतीय जनतेला मूर्ख बनवण्याच्या बाबतीत ते कमालीचे साहसी आहेत, पण हे साहस नॉर्वे देशातील एक महिला पत्रकार हेले लिंग हिने उलटवले आहे. भारतीय लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे त्यामुळे जगात हसे झाले. मोदींच्या अंधभक्तांना त्याबद्दल काय वाटते? नॉर्वेत पंतप्रधान मोदी हे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे न देता मंचावरून निघून गेले. पत्रकार हेले लिंग हिने मोदींना विचारले, ''मि. प्राईम मिनिस्टर, आपण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे नेते आहात आणि आम्ही जगातील पहिल्या क्रमांकाचे 'प्रेस फ्रीडम'वाले देश आहोत, आमच्या प्रश्नांची उत्तरे का टाळत आहात?'' या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी मोदी तेथून अक्षरशः पळत आहेत हे चित्र त्या वेळी जगभरच्या मीडियाने टिपले. मोदी यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे कधीच दिली नाहीत. बारा वर्षे ते पंतप्रधान आहेत. या काळात त्यांनी एकदाही पत्रकारांना प्रश्न विचारण्याची संधी दिली नाही. पंतप्रधान जाहीर सभा, रॅली, रोड शोमध्ये सहभागी होतात. विरोधकांवर एकतर्फी टीका करणारी भाषणे करून निघून जातात. त्यांनी काही मुलाखती दिल्या त्या त्यांच्याच चमच्यांना. अक्षय कुमारने त्यांची एक मुलाखत घेतल्याची नोंद आहे. त्यात अक्षय कुमारने त्यांना प्रश्न विचारला की, ''मोदी साहेब, तुम्ही आंबे चोखून खाता की कापून?'' मोदी यांना असे प्रश्न आवडतात, पण फसलेले 'ऑपरेशन सिंदूर', निवडणूक आयोगाचा घोळ, सुप्रीम कोर्टावरील दबाव, मृत झालेला भारतीय रुपया, आर्थिक मंदी, लोकशाहीच्या राज्यात सुरू असलेले मानवी हक्कांचे उल्लंघन यावर

प्रश्न विचारण्याची संधी
पंतप्रधान कुणालाच देत नाहीत. इंदिरा गांधी 43 वर्षांपूर्वी नॉर्वेत गेल्या होत्या व तेथील पंतप्रधानांसोबत पत्रकार परिषद घेतली होती. नेहरूंपासून मनमोहन सिंगांपर्यंत प्रत्येक पंतप्रधान पत्रकारांना उत्तर देत होते. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आतापर्यंत 150 पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. मोदी यांचे आदर्श प्रे. ट्रम्प तर रोजच पत्रकारांशी संवाद साधतात. मग पंतप्रधान मोदीच पत्रकारांचे प्रश्न का सहन करू शकत नाहीत? मोदी काळात भारताचा मीडिया 'गोदी' मीडिया झाला हे खरे, पण पाठीचा कणा असलेले अनेक पत्रकार आजही भारतात काम करत आहेत. सरकारच्या दबावाखाली यायला ते तयार नाहीत. अशा पत्रकारांना मोदी व त्यांच्या लोकांनी देशाचे शत्रू ठरवले आहे. भारतीय लोकशाहीची व वृत्तपत्र स्वातंत्र्याची ही सध्याची स्थिती आहे. भारताच्या वृत्तपत्र स्वातंत्र्याचा मुखवटा नॉर्वेच्या मंचावर फाटला आहे. 'नॉर्वे'कर पत्रकाराने एक प्रश्न विचारला व मोदी यांना घाम फोडला. दुसरा एखादा 56 इंच छातीवाला पंतप्रधान असता तर तो पत्रकार हेले लिंगच्या धारदार प्रश्नांवर थांबला असता व उत्तर देऊन निघून गेला असता. यात भारतीय लोकशाहीची प्रतिष्ठा राहिली असती. नॉर्वेत मोदी हे भारतीय वेशात होते. म्हणजे सदरा, खाली घट्ट नाडीवाली सुरवार, जॅकेट वगैरे, पण तेथून मोदी इटलीत पोहोचले व त्यांचा पोशाख पूर्ण बदलला. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिआ मेलोनी यांच्या सोबतची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. त्यात मोदी हे महागड्या सुटात दिसत आहेत व मेलोनी यांना भारतातून नेलेल्या टॉफीज भेट देत आहेत. इतर सर्व देशांत मोदी भारतीय पोशाखात जाऊन संस्कृतीचे दर्शन घडवतात, पण इटलीतील मेमसाबना भेटायला जाताना 'सूट' घालून 'साब' बनून जातात हे एक गौडबंगालच आहे. मोदी यांनी इटलीच्या मेलोनींना मेलोडी चॉकलेट भेट दिले तसे इतर देशांच्या राष्ट्राध्यक्षांना काय भेटी दिल्या ते समोर आले नाही. भारतीय जनतेने काटकसर करायची व जनतेच्या

राजाने युरोप दौऱ्यावर
जाऊन इतर राजांना नजराणे द्यायचे हे ढोंग भाजपमधील राष्ट्रभक्तांना मान्य आहे काय? आता पुन्हा नॉर्वेकडे वळू या. नॉर्वेत पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारल्यानंतर चर्चेत आलेल्या पत्रकार हेले लिंग यांनी दावा केला आहे की, आपले फेसबुक अकाऊंट आणि इन्स्टाग्राम अकाऊंट 'सस्पेन्ड' करण्यात आले आहे. बरे झाले, हेले मॅडम थोडक्यात बचावल्या. मोदींना असा प्रश्न कुणा भारतीय पत्रकाराने विचारला असता तर एव्हाना ईडी, सीबीआयची पथके त्यांच्या घरी पोहोचून धाडसत्र सुरू झाले असते. भारतातील पत्रकारितेची ही दारुण अवस्था आहे. 'नॉर्वे प्रकरणात' राहुल गांधी यांनी एक गंभीर मुद्दा समोर आणला. नॉर्वे सरकारने फेब्रुवारी 2026 पासून Government Pension Fund Global मधून Adani Green Energy ला बाहेर फेकले. काळ्या यादीत टाकले. भ्रष्टाचार आणि आर्थिक अफरातफरीचे आरोप अदानींच्या कंपन्यांवर आहेत. हा फंड जगातील सगळ्यात मोठा 'सॉवरेन वेल्थ फंड' आहे. भारताची यात 28 बिलियन डॉलर गुंतवणूक आहे. मे 2024 मध्ये Adani Ports लासुद्धा मानवाधिकार उल्लंघनाच्या आरोपाखाली या 'फंड'मधून बाहेर काढले होते. 'नॉर्वे'कर पत्रकार व राजकीय विश्लेषकांचे ठाम म्हणणे आहे की, 43 वर्षांनंतर पंतप्रधान मोदी यांनी नॉर्वेत दौरा केला तो अदानी समूहाला या 'काळ्या यादी'तून बाहेर काढण्यासाठी. अमेरिकेने अदानींवरील भ्रष्टाचाराचे खटले मागे घेतले तसे 'नॉर्वे'कर मंडळींनीही प्रिय अदानींवरील खटले मागे घ्यावेत याच हेतूने पंतप्रधान मोदी नॉर्वेत आले, पण हा दौरा पत्रकार हेले लिंग यांच्या एका प्रश्नाने गाजवला. मोदींचे पलायन हाच जगभरात चर्चेचा विषय ठरला. मोदी सध्या इटलीत मिसेस मेलोनी यांच्यासोबत 'सूटबूट' पोशाखात आहेत. मोदींच्या राजकारणात हीच 'मेलोडी' आहे. भारतीय पत्रकारांना जे जमले नाही ते 'नॉर्वे'करांनी' करून दाखवले! त्यांचे आभार!!

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana