Saturday, 25 Sep, 7.55 am सामना

ठळक
सामना अग्रलेख - साकीनाका ते डोंबिवली

तरुण मुलांत व्यसनाधिनता वाढत आहे. निराशा, वैफल्याने त्यांना ग्रासले आहे. शिक्षण थांबले आहे आणि डोकी रिकामी आहेत. त्या रिकाम्या डोक्यांत सैतान घर करीत आहे. ही सैतानी डोकी विकृतीचा नंगानाच करीत आहेत. महाराष्ट्र हा महिलांसाठी नक्कीच सुरक्षित आहे. मुंबई तर जगातील सगळय़ात सुरक्षित शहर आहे. तरीही साकीनाका ते डोंबिवलीपर्यंत अबलांच्या किंकाळय़ा ऐकू येत आहेत. पुन्हा मध्ये बोरिवली भाजप कार्यालय लागतेच. हे सर्व भयंकर प्रकार एक प्रकारच्या मानसिक विकृतीतून घडत आहेत. ही विकृती मोडून काढावीच लागेल.

मुंबईतील साकीनाक्यातील घटनेच्या जखमांचे व्रण ताजे असतानाच डोंबिवलीच्या घटनेने महाराष्ट्राचे समाजमन हादरले आहे. विकृतीचा कळस गाठणाऱया घटना देशभरात वाढत आहेत. त्यात महाराष्ट्रानेही सामील व्हावे याची खंत वाटते. 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 29 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना मुंबईनजीकच्या डोंबिवलीत घडली आहे. हे अत्याचार गेले आठ महिने सुरू होते. ही अशी प्रकरणे समोर येतात व राजकीय पक्ष बेबंदपणे अशा प्रकरणांचा गाजावाजा करून आपापल्या राजकीय मतलबाच्या पोळय़ा भाजतात तेव्हा त्या राजकारणाचीही किळस वाटते. साकीनाक्यात एक महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी तेथे तासाभरात कारवाई करून आरोपीस बेडय़ा ठोकल्या. डोंबिवलीच्या प्रकरणातही पोलिसांनी 29 पैकी 26 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हे आरोपी सधन घरातील आहेत व त्यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. दिल्लीच्या 'निर्भया' कांडातील एक आरोपी अल्पवयीन होता व त्याच आरोपीने 'निर्भया'वर सगळय़ात जास्त अत्याचार केले असल्याचे उघड झाले होते. आता डोंबिवलीतही तेच घडले. विरोधी पक्षाचे लोक याप्रश्नी पोलीस, कायदा-सुव्यवस्था व सरकारला धारेवर धरत आहेत. त्यांनी साकीनाक्याप्रमाणेच डोंबिवलीचे प्रकरण नीट समजून घेतले पाहिजे. अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने जानेवारी महिन्यात पीडित मुलीवर बलात्कार करत व्हिडीओ काढला. याच व्हिडीओच्या आधारे त्या मुलीस ब्लॅकमेल करीत तिच्यावर त्या प्रियकराचे 29 मित्र अत्याचार करीत राहिले. दुसरे असे की, या प्रकरणाची वाच्यता झाली तेव्हा

पोलिसांनी पुढाकार

घेतला. त्या पीडित मुलीला विश्वास दिला व तिला गुन्हा दाखल करायला लावून चौकशीची सूत्रे फिरवली. म्हणजेच पोलिसांनी त्यांचे कर्तव्य चोख बजावले आहे. डोंबिवलीतली घटना नक्कीच गंभीर आहे. साकीनाक्याप्रमाणेच डोंबिवलीतही पीडित महिला व आरोपीची घनिष्ठ ओळख होती. आरोपींनी या गुन्हय़ात हुक्का, दारू, गांजा या अमली पदार्थांचा वापर केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आता खोलात शिरणे गरजेचे आहे. हे सर्व आरोपी वजनदार घरातले आहेत व त्यांचे राजकीय लागेबांधे आहेत, पण कोणत्याही दबावास बळी न पडता पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले आहे. याकडे डोळेझाक करून विरोधक सरकार, पोलिसांवर चिखलफेक का करीत आहेत? डोंबिवली प्रकरणाचा गवगवा सुरू असतानाच बोरिवली येथील भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात एका महिलेचा विनयभंग भाजप पदाधिकाऱयाने केला व या प्रकरणात भाजपच्या सर्व ताई, माई, अक्का, भाऊ तोंडास कुलूप ठोपून बसले आहेत. भाजप कार्यालयात ज्या महिलेचा विनयभंग झाला ती त्यांचीच कार्यकर्ती आहे. या पीडित महिलेनेही पोलिसांत गुन्हा दाखल करून न्यायाची मागणी केली आहे. बोरिवली प्रकरणातही भाजपच्या ताई-माई-अक्कांनी डोळे ओले करायला हरकत नव्हती, पण त्यांनी अश्रूंना बांध मोकळा करून दिला ते साकीनाका, डोंबिवलीप्रकरणी. हे धोरण दुटप्पी आहे. राज्यपालांना महाराष्ट्रातील अशा घटनांची चिंता वाटते व ते तत्काळ मुख्यमंत्र्यांशी पत्राचार करून विशेष अधिवेशनाची सूचना करतात. अशा घटना दुर्दैवीच आहेत, पण समाजाचे मानसिक आरोग्य बिघडले आहे व

विकृतीने कळस

गाठला आहे. त्यातून हे भयंकर गुन्हे घडत आहेत. महिला सुरक्षा, लैंगिक अत्याचाराबाबत कठोर कायदे होऊनही विपृतांकडून हे असले प्रकार घडतच आहेत. डोंबिवलीनजीक कल्याणात एका आठ वर्षांच्या बालिकेवर शिक्षकाकडूनच अत्याचार झाला. हे भयंकर प्रकार फक्त कायद्याने थांबतील अशी अपेक्षा करता येणार नाही. शेवटी समाजातील वाढत्या विकृतीचाही प्रश्न आहेच. कायद्याची भीती नाही यापेक्षाही समाजात उफाळलेल्या विकृतीवर कायदा हतबल ठरतो, हादेखील मुद्दा आहेच. हे असले प्रकार घरात, शाळेत, पवित्र नात्यांत, जवळच्या मित्र-मैत्रिणींत, ओळखीत होत आहेत व तेथे कायदा कसा प्रभावी ठरणार? म्हणून विकृतांची माहिती आधीच गोळा करणे हाच एक उपाय आहे. आपल्या आसपास असे विकृत-लंपट दिसले की, त्यांची माहिती पोलिसांना देणे हा एक सावधगिरीचा उपाय आहे. डोंबिवलीतील पीडित मुलगी तब्बल आठ महिने 29 विकृतांचा अत्याचार सहन करत होती. तिच्या प्रियकराकडूनच लैंगिक अत्याचारास सुरुवात झाली व ती पीडित मुलगी गप्प राहिली. या मुलीने वेळीच कायद्याचा दरवाजा ठोठावला असता तर चित्र वेगळे दिसले असते. तरुण मुलांत व्यसनाधिनता वाढत आहे. निराशा, वैफल्याने त्यांना ग्रासले आहे. शिक्षण थांबले आहे आणि डोकी रिकामी आहेत. त्या रिकाम्या डोक्यांत सैतान घर करीत आहे. ही सैतानी डोकी विकृतीचा नंगानाच करीत आहेत. महाराष्ट्र हा महिलांसाठी नक्कीच सुरक्षित आहे. मुंबई तर जगातील सगळय़ात सुरक्षित शहर आहे. तरीही साकीनाका ते डोंबिवलीपर्यंत अबलांच्या किंकाळय़ा ऐकू येत आहेत. पुन्हा मध्ये बोरिवली भाजप कार्यालय लागतेच. हे सर्व भयंकर प्रकार एक प्रकारच्या मानसिक विकृतीतून घडत आहेत. ही विकृती मोडून काढावीच लागेल.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top