Friday, 20 Sep, 5.06 am सामना

ठळक बातम्या
सामना अग्रलेख - तेलाची पेटवापेटवी !

आखातातील तेलसंपन्न देशांवर अमेरिकेची सदैव वक्रदृष्टीच राहिली आहे . तेल विहिरींवरील नियंत्रणाच्या हव्यासातूनच अमेरिकेने इराकसारखा देश बेचिराख केला . आता अमेरिकेचा डोळा इराणवर आहे . सौदीतील तेल प्रकल्पांवरील ड्रोन हल्ल्यानंतर अमेरिकेने जी आगलावी भूमिका घेतली आहे ती जगासाठी घातक ठरू शकते . तेलाची ही पेटवापेटवी धोकादायक आहे . महासत्ता असलेले देश यातून कसेही तरून जातील , पण आधीच मंदीचे चटके सहन करणाऱ्या हिंदुस्थानसारख्या देशांनी मात्र तेलाचा भडका उडण्यापूर्वीच सावध व्हायला हवे !

पश्चिम आशियातील तेल उत्पादक देशांची पुन्हा एकदा आखाती युद्धाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. सौदी अरबमधील दोन मोठय़ा तेल प्रकल्पांवर मागच्या आठवडय़ात येमेनच्या हैती या दहशतवादी संघटनेने भीषण हल्ले चढवल्यापासून आखाती देशांमध्ये जबरदस्त तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच अमेरिकेने या हल्ल्यामागे इराणचाच हात असल्याचा आरोप करून आगीत आणखी तेल ओतण्याचे काम केले आहे. इराणने हा आरोप फेटाळून लावला असला तरी हैती बंडखोरांना इराणकडूनच रसद मिळते हे आता लपून राहिलेले नाही. सौदी सरकारचा अंकुश असलेली येमेनमधील राजवट अलीकडेच हैती बंडखोरांनी उलथवून टाकली, तीही इराणच्याच सहकार्याने. इराण आणि अमेरिकेत गेल्या काही महिन्यांत संघर्ष वाढलेला असतानाच तेल प्रकल्पांवरील हल्ल्याची घटना घडल्यामुळे अमेरिकेलाही एक प्रकारे आयते कोलीतच मिळाले. त्यामुळेच अमेरिकेने पद्धतशीरपणे या हल्ल्याचा वापर करून सौदी अरब आणि इराणमध्ये होता होईल तेवढी भडकवाभडकवी सुरू केली आहे. अमेरिकेच्या या आगलाव्या भूमिकेमुळे आखातात कधीही युद्धाची ठिणगी पडू शकते असे चित्र निर्माण झाले आहे. येत्या काळात हा तणाव आणखी वाढून युद्धाचा भडका उडाला तर काय होणार या भयाने जगाला ग्रासले आहे. आधीच जगभरात आर्थिक मंदीने धुमाकूळ घातला आहे. त्यात आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झाला तर जगभरातच

पेट्रोल आणि डिझेलचे भाव

गगनाला भिडतील, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. मंदीचे तडाखे झेलणाऱ्या विकसित देशांनाच नव्हे तर हिंदुस्थानसारख्या विकसनशील देशालाही याचा मोठा फटका बसण्याचा धोका आहे. त्यामुळे केवळ आखाती देशांतील प्रश्न म्हणून या घटनेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आधीच मामला तेलाचा, त्यात तेल विहिरी आणि तेल प्रकल्प म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये उलथापालथ घडवण्याची क्षमता असलेले क्षेत्र. तिथेच अतिरेक्यांनी स्फोट घडवून जी आग भडकवली ती केवळ सौदी अरबपुरती मर्यादित नक्कीच असणार नाही. सौदीमधील हिजरा खुरैस आणि अबकीक या दोन सर्वात मोठय़ा तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर हैतीच्या अतिरेक्यांनी ड्रोन्सचा वापर करून लागोपाठ अनेक हल्ले चढवले. हे दोन्ही तेल प्रकल्प आरामको या विश्वविख्यात तेल कंपनीच्या मालकीचे आहेत. ड्रोन्समधून झालेल्या बॉम्ब वर्षावानंतर आगीच्या गगनचुंबी ज्वाळा आणि धुराने हे दोन्ही तेल प्रकल्प व्यापून टाकले. अतिरेक्यांनी घडवलेल्या या अग्निकांडानंतर सौदी अरबने आपले तेल उत्पादन थेट निम्म्याने घटवले आहे. सबंध जगाला तेलपुरवठा करणाऱ्या सौदीने तेलनिर्मिती निम्म्यावर आणली ही साधीसुधी घटना नाही. या दोन्ही प्रकल्पांतून दररोज 57 लाख बॅरल तेलाचे शुद्धीकरण होत असे. ड्रोन हल्ल्यानंतर हे काम पूर्णपणे ठप्प आहे. स्फोटानंतर झालेला विध्वंस इतका मोठा आहे की, आणखी काही महिने तरी या प्रकल्पांमधून तेलनिर्मिती होणे शक्य नाही. त्यामुळे या प्रकल्पांत घडवण्यात आलेल्या

स्फोटांनंतर

जी भयंकर आग भडकली त्याची धग आणखी काही महिने तरी जगाला सोसावीच लागेल. सौदी अरेबियाची अत्यंत महागडी सुरक्षा व्यवस्था आणि अमेरिकेचे हायटेक सुरक्षा कवच भेदून हैतीच्या दहशतवाद्यांनी तेल प्रकल्पांवर ड्रोन हल्ले चढवले आणि जगाच्या नाकावर टिच्चून या हल्ल्यांची जबाबदारीही 'हैती'ने स्वीकारली. सौदी अरब आणि त्याचा संरक्षक असलेल्या अमेरिकेसाठी ही मोठी नाचक्की आहे. सौदी अरब आणि इराण हे जगातील दोन मोठे तेल उत्पादक देश. सौदी अरबला खूश करण्यासाठी अमेरिकेने इराणच्या तेल विक्रीला लगाम घातला. इराणवर आर्थिक निर्बंध लादले आणि हिंदुस्थानसह इराणकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर दबाव आणून इराणचा तेलबाजार उठवला. तेल विक्री ठप्प झाल्यामुळे इराणची अर्थव्यवस्था मोडकळीस आली. त्यातून जगाला सर्वाधिक तेलपुरवठा करणाऱ्या तेल प्रकल्पांवर ड्रोन हल्ले चढवण्याची योजना आखली गेली असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. मुळात आखातातील तेलसंपन्न देशांवर अमेरिकेची सदैव वक्रदृष्टीच राहिली आहे. तेल विहिरींवरील नियंत्रणाच्या हव्यासातूनच अमेरिकेने इराकसारखा देश बेचिराख केला. आता अमेरिकेचा डोळा इराणवर आहे. सौदीतील तेल प्रकल्पांवरील ड्रोन हल्ल्यानंतर अमेरिकेने जी आगलावी भूमिका घेतली आहे ती जगासाठी घातक ठरू शकते. तेलाची ही पेटवापेटवी धोकादायक आहे. महासत्ता असलेले देश यातून कसेही तरून जातील, पण आधीच मंदीचे चटके सहन करणाऱ्या हिंदुस्थानसारख्या देशांनी मात्र तेलाचा भडका उडण्यापूर्वीच सावध व्हायला हवे!

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top