Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सामना अग्रलेख - विघ्नहर्त्या, तूच सांभाळ!

सामना अग्रलेख - विघ्नहर्त्या, तूच सांभाळ!

सामना 4 days ago

हाराष्ट्र आज कधी नव्हे इतक्या संकटांमध्ये सापडला आहे. दरवाढ, महागाई, भ्रष्टाचार, अत्याचार, दुष्काळ, पेपरफुटी, 'डीजे'चा वादंग, प्रत्यक्ष श्रीगणरायांच्या आगमनावरच दुर्घटनेची विघ्ने अशी संकटांची मालिका वाढतच आहे.

टिळकांनी ज्या उद्देशासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तो उद्देश हरवत चालला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवावरही 'कॉर्पोरेट' कब्जा होऊ लागला आहे. कधीकाळी देशाला विचारांची दिशा देणारा महाराष्ट्र सत्तांध आणि धर्मांध राज्यकर्त्यांमुळे दिशाहीन झाला आहे. राज्यकर्त्यांनी पुरोगामी महाराष्ट्राला धार्मिक उन्मादाच्या अंधारात ढकलले आहे. विद्यमान राज्यकर्ते हेच देश आणि महाराष्ट्रावरील सध्याचे सर्वात मोठे विघ्न आहे. आता तरी जनता हे ओळखेल का? तशी बुद्धी हे गणराया, तू जनतेला देशील का? विघ्नहर्त्या, आता तूच सांभाळ रे बाबा!

महाराष्ट्रावर एकापाठोपाठ एक संकटांचे विघ्न कोसळत असतानाच विघ्नहर्त्या श्रीगणरायांचे आज आगमन होत आहे. पारंपरिक उत्साह आणि वातावरणात आज घराघरांत लाडक्या गणरायांची प्रतिष्ठापना होईल. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणरायदेखील आपापल्या मंडपांमध्ये दिमाखात विराजमान होतील. यंदाचा गणेशोत्सव तब्बल 12 दिवसांचा आहे. त्यामुळे पुढील दोन आठवडे महाराष्ट्र एका वेगळय़ाच चैतन्यमय, भक्तिमय आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणाने भारलेला असेल. गणेशोत्सवाचा काळ म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि परंपरा यांचा अनोखा संगम. याच संगमात मराठी माणूस अनंत चतुर्दशीपर्यंत आनंदाने न्हाऊन निघेल. राज्यकर्त्यांनी निर्माण केलेली असंख्य संकटे, विघ्ने समोर असली तरी लाडक्या गणरायांच्या सरबराईत मराठी माणूस काहीही कमी पडू देणार नाही. सरकारने साखरेच्या महागाईचा दांडपट्टा ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर चालवला. दूध महाग केले. सीएनजी, घरगुती गॅस, पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले. त्याचा परिणाम मिठाईपासून गोड पदार्थांपर्यंत सगळ्यांच्या किमती वाढण्यात झाला. तरीही गणरायांना त्यांच्या लाडक्या मोदकांचा, लाडूंचा प्रसाद कमी पडणार नाही याची पुरेपूर काळजी गणेशभक्त घेतील. सामान्य जनता एका श्रद्धेने हे सर्व करीत असली तरी या

श्रद्धेचे आणि भक्तीचे अवडंबर

माजविण्याचे उद्योग सत्तापक्षाकडून सध्या केले जात आहेत. हे अवडंबर म्हणजेच हिंदुत्व आणि हिंदू धर्म असे ठसविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुण्याच्या गणेशोत्सवातील 'डीजे'च्या दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट या तरुणाला मारहाण याच उद्देशाने झाली. या वादावर मार्ग काढण्याऐवजी सत्ताधारी मंडळी विद्यानंद बापट यांना 'दिमागी नक्षल', 'उपरा' ठरवत आहेत. मुख्यमंत्री तर लोकसंवादातून मार्ग काढा, अशी पळवाट काढत आहेत. देशात दरवाढ आणि महागाईचा भडका उडाला आहे. अमेरिका-इराणमध्ये पुन्हा उसळलेल्या युद्धाचे तेल महागाईत ओतले जात आहे. 'अल-निनो'च्या तडाख्यामुळे राज्यावरील दुष्काळाचे संकट आणखी गडद झाले आहे. खरिपाची पिके अनेक ठिकाणी करपायला लागली आहेत. पाऊसच कमी झाला असल्याने यंदाच्या रब्बीच्या हंगामावर अनिश्चिततेचे सावट आले आहे. पेपरफुटीचे विघ्न महाराष्ट्राची पाठ सोडायला तयार नाही. नीट, टीईटीपाठोपाठ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे पेपर फुटले. त्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या. आता म्हणे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी

एसआयटी नेमून

संपूर्ण परीक्षा पद्धती सुधारण्याचा निश्चय वगैरे केला आहे. मुलाखती रद्द केल्या आहेत, पण हजारो विद्यार्थ्यांच्या राखरांगोळी झालेल्या स्वप्नांचे काय? चिमुरड्यांवरील अत्याचार वाढले आहेत. रस्त्यांवरील खड्डे रोज निष्पापांचे बळी घेत आहेत. शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची करण्याच्या पिपाण्या राज्यकर्तेच मोडून-तोडून खात आहेत. महाराष्ट्र आज कधी नव्हे इतक्या संकटांमध्ये सापडला आहे. दरवाढ, महागाई, भ्रष्टाचार, अत्याचार, दुष्काळ, पेपरफुटी, 'डीजे'चा वादंग, प्रत्यक्ष श्रीगणरायांच्या आगमनावरच दुर्घटनेची विघ्ने अशी संकटांची मालिका वाढतच आहे. टिळकांनी ज्या उद्देशासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तो उद्देश हरवत चालला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवावरही 'कॉर्पोरेट' कब्जा होऊ लागला आहे. कधीकाळी देशाला विचारांची दिशा देणारा महाराष्ट्र सत्तांध आणि धर्मांध राज्यकर्त्यांमुळे दिशाहीन झाला आहे. राज्यकर्त्यांनी पुरोगामी महाराष्ट्राला धार्मिक उन्मादाच्या अंधारात ढकलले आहे. विद्यमान राज्यकर्ते हेच देश आणि महाराष्ट्रावरील सध्याचे सर्वात मोठे विघ्न आहे. आता तरी जनता हे ओळखेल का? तशी बुद्धी हे गणराया, तू जनतेला देशील का? विघ्नहर्त्या, आता तूच सांभाळ रे बाबा!

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana