Dailyhunt
सॅमसंग, विवो, ओप्पो स्मार्टफोनच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्या

सॅमसंग, विवो, ओप्पो स्मार्टफोनच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्या

सामना 3 weeks ago

हिंदुस्थानात सॅमसंग, विवो आणि ओप्पो कंपनीने स्मार्टफोनच्या किमतीत 40 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. सध्या जगभरात चीपची कमतरता भासत असल्याने स्मार्टफोन कंपन्यांनी ही वाढ केली आहे. याव्यतिरिक्त, इराण-इस्रायल, अमेरिका युद्धामुळे पुरवठा विस्कळीत झाल्याने प्लॅस्टिक पॅकेजिंगही महाग झाल्याने कंपन्या आता वाढलेल्या खर्चाचा भार ग्राहकांवर टाकत आहेत.

मार्पेट रिसर्चर आयडीसी इंडियानुसार, गेल्या वर्षी देशभरात विकल्या गेलेल्या एकूण 15.2 कोटी स्मार्टफोनपैकी 47 टक्के वाटा हा विवो, सॅमसंग आणि ओप्पो फोनचा होता. एआय तंत्रज्ञानाच्या वाढत्या मागणीमुळे एनव्हीडियासारख्या चीप बनवणाऱ्या कंपन्या आपले पूर्ण लक्ष एआय मेमरी चीप्सवर केंद्रित करत आहेत. काऊंटरपॉइंट इंडियानुसार, स्मार्टफोन मेमरी चीप्सच्या किमती डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान 120 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.

प्लॅस्टिकसारख्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. ज्याचा वापर फोनची बॉडी बनवण्यासाठी होतो. त्याचबरोबर पॅकेजिंगचे साहित्यही महाग झाले आहे. शाओमीनेही आपल्या रेडमी पॅड आणि इतर 6 स्मार्टफोन्सच्या किमतीत 32 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे, तर रियलमीनेही आपल्या काही मॉडेल्सचे दर वाढवले आहेत.

47,999 रुपयाचा पह्न 62,499 रुपयांना

सॅमसंग कंपनीचा मिड रेंज फोन गॅलेक्सी ए 57 हा फोन बाजारात आणला आहे. याची किंमत 62,499 रुपये ठेवली आहे. त्याआधी कंपनीचा ए 56 फोन आला होता. याची किंमत 47,999 रुपये होती. म्हणजेच हा फोन 30 टक्क्यांनी महाग झाला आहे. विवो कंपनीने आपला बजेट स्मार्टफोन विवो टी 4 लाइटची किंमत 9999 वरून थेट 13,999 रुपये केली आहे. ओप्पोने आपल्या 5 मॉडेल्सच्या किमतीत 2 हजार रुपयांची वाढ केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana