Dailyhunt
Sangameshwar News - संगमेश्वर पंचायत समितीवर 34 लाखांच्या देणीचे संकट

Sangameshwar News - संगमेश्वर पंचायत समितीवर 34 लाखांच्या देणीचे संकट

सामना 3 weeks ago

संगमेश्वर पंचायत समितीचा कारभार गेल्या चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय राजवटीनंतर आता लोकप्रतिनिधींच्या हाती सोपवण्यात आला आहे. मात्र,कारभाराची सूत्रे हाती घेताच नवनिर्वाचित पदाधिकारी आणि सदस्यांसमोर 34 लाख रुपयांच्या थकीत दायित्वाचे मोठे संकट उभे ठाकले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने या काळात विविध योजना, विकासकामे आणि प्रशासकीय खर्चाचे नियोजन करताना ही 34 लाखांची देणी निर्माण झाली आहेत. ही रक्कम प्रामुख्याने विविध कंत्राटदारांची देणी, साहित्य पुरवठा आणि प्रलंबित देयकांशी संबंधित असल्याचे समजते. आता नवीन सदस्य निवडून आल्यानंतर या थकबाकीचा थेट परिणाम त्यांच्या कामकाजावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींनी कार्यभार स्वीकारला असला, तरी त्यांच्यासमोर नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि रखडलेली विकासकामे मार्गी लावण्याचे मोठे आव्हान आहे. त्यातच तिजोरीतील तुटपुंज्या निधीतून ही 34 लाखांची जुनी देणी कशी भागवायची,असा प्रश्न मासिक सभेत सदस्यांनी उपस्थित केला आहे.

या आर्थिक पेचावर भाष्य करताना उपसभापती प्रफुल्ल बाईत यांनी सांगितले की, प्रशासकीय काळात हे दायित्व निर्माण झाले हे वास्तव असले तरी आम्ही यातून नक्कीच मार्ग काढू. या वाढीव निधीसाठी आमदार शेखर निकम यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सुटतील अशी आशा सर्वसामान्यांना आहे,मात्र ही जुनी देणी विकासकामांत अडथळा ठरू नयेत, अशी भावना व्यक्त होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana