Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सप्टेंबरमध्येही पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता, 1901 नंतरचा ऑगस्ट सर्वाधिक उष्ण महिना

सप्टेंबरमध्येही पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता, 1901 नंतरचा ऑगस्ट सर्वाधिक उष्ण महिना

सामना 1 week ago

यंदाच्या मान्सूनचा शेवटचा महिना असलेल्या सप्टेंबरमध्ये देशभरात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांचा मान्सून हंगाम तुटीचा राहण्याची शक्यता आणखी बळावली आहे.

एल निनोच्या प्रभावामुळे सप्टेंबरमध्येही पाऊस कमी राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

ऑगस्टमध्ये देशभरात सरासरीच्या तुलनेत 16 टक्क्यांहून अधिक कमी पाऊस झाला. मात्र, काही भागांत चांगला पाऊस झाल्याने परिस्थिती काही प्रमाणात सुधारली. असे असले तरी ऑगस्ट हा 1901 नंतरचा देशातील सर्वाधिक उष्ण ऑगस्ट ठरला. या महिन्यात देशाचे सरासरी तापमान 28.01 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. हिंदुस्थानात ऑगस्ट हा 1901 नंतरचा दुसरा सर्वाधिक उष्ण ठरला. पूर्व आणि ईशान्य हिंदुस्थानात तो तिसरा, तर वायव्य हिंदुस्थानात गेल्या 126 वर्षांतील पाचवा सर्वाधिक उष्ण ऑगस्ट ठरला.

1 जून ते 31 ऑगस्ट या कालावधीत देशभरात पाऊस सरासरीपेक्षा 14 टक्के कमी झाला आहे. जुलैमध्ये पाऊस सामान्य राहिला असला तरी जूनमध्ये पावसाची कमतरता तब्बल 35 टक्के होती. मान्सूनच्या पावसाचे मूल्यांकन करण्यात आलेल्या 741 जिल्ह्यांपैकी 312 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच 42 टक्के जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. तर 38 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच 5 टक्के जिल्ह्यांत पावसाची मोठी कमतरता राहिली आहे.

सप्टेंबरमध्येही पाऊस कमी राहिल्यास त्याचा परिणाम खरीप पिकांवर होण्याची शक्यता आहे. बहुतांश खरीप पिकांची पेरणी जवळपास पूर्ण झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पेरणी क्षेत्रात सुमारे 2 टक्क्यांची घट झाली आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस कमी पडल्यास उभ्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना सिंचनावर अधिक खर्च करावा लागू शकतो. परिणामी शेतीचा उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, देशातील अनेक भागांत सप्टेंबरमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र, वायव्य, ईशान्य, पूर्व, पूर्व-मध्य आणि आग्नेय द्वीपकल्पीय हिंदुस्थानातील काही भागांत सामान्य ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो. सप्टेंबरमध्ये देशभरात पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या 91 टक्क्यांपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सध्या एल निनोची स्थिती मजबूत झाली आहे. मध्य आणि पूर्वेकडील विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यापेक्षा अधिक आहे. आगामी काही महिन्यांत एल निनो आणखी मजबूत होण्याची शक्यता असल्याचे महापात्रा यांनी सांगितले. एल निनोचा हिंदुस्थानातील मान्सूनवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. विशेषतः मान्सूनच्या उत्तरार्धात, म्हणजे सप्टेंबरमधील पावसावर त्याचा प्रभाव अधिक जाणवू शकतो.

ऑगस्टमध्ये वीज पडणे, मेघगर्जना आणि मुसळधार पाऊस यांसारख्या तीव्र हवामान घटनांमध्ये 113 जणांचा मृत्यू झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. मात्र, या आकडेवारीची राज्य सरकारांकडून संकलित करण्यात आलेल्या आकडेवारीशी पडताळणी करता येईल, असे महापात्रा यांनी स्पष्ट केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana