अनेक हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबईसह महाराष्ट्र मिळाल्याचा इतिहास, संस्कृती देशाचे भविष्य असलेल्या आताच्या विद्यार्थ्यांना कळावा यासाठी मुंबई विद्यापीठ सर्व संलग्न महाविद्यालयांमध्ये 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करण्याचे आदेश द्या, अशी मागणी युवासेनेने केली आहे.
याबाबत युवासेना सिनेट सदस्यांनी आज विद्यापीठाला निवेदन दिले.
महाराष्ट्र शासन आणि संचालक, उच्च व तंत्रशिक्षण यांच्याकडून महाराष्ट्र दिन सोहळा साजरा करण्याचे आदेश देण्यात येतात. असे असताना अनेक अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्र दिन साजरा केला जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिन साजरा निर्देश देण्याची मागणी करण्यात आली. याकरिता युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, मिलिंद साटम, परमात्मा यादव, मयूर पांचाळ, किसन सावंत आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी मुंबई विद्यापीठ कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र कुलगुरू डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांची भेट घेतली. यावेळी परीक्षा विभागातील प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, एम. कॉम. निकालातील त्रुटी, अमली पदार्थ सेवनविरोधी जागरूकता कार्यक्रम आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

