Dailyhunt
सत्तेच्या 'भस्मासुरात' महाराष्ट्र विस्कटला! राज ठाकरेंचा हल्लाबोल; नसरापूर प्रकरणातील नराधमाला हालहाल करून संपवण्याची सरकारकडे मागणी

सत्तेच्या 'भस्मासुरात' महाराष्ट्र विस्कटला! राज ठाकरेंचा हल्लाबोल; नसरापूर प्रकरणातील नराधमाला हालहाल करून संपवण्याची सरकारकडे मागणी

सामना 1 week ago

पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या भयंकर घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या घटनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून, सोशल मीडियाद्वारे सरकार आणि समाजातील बदलत्या मानसिकतेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

“या घटनेने मनाचा थरकाप उडाला असून भयानक चीड आली आहे. सरकारने कायदा काय सांगतो याचा विचार न करता, अशा नराधमाला हालहाल करून संपवले पाहिजे,” अशा शब्दांत त्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

राज ठाकरे यांनी X वर केलेल्या ट्वीटमध्ये केवळ गुन्हेगारावरच नाही, तर सरकारच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकार अशा घटनांमध्ये जेंव्हा फास्टटट्रॅक पद्धतीने कारवाई करू म्हणतं तेंव्हा सरकारने फास्टट्रॅकची व्याख्या पण सांगावी, अशा बोचऱ्या शब्दात सरकारला सुनावले.महाराष्ट्रात महिला आणि मुलींच्या शोषणाचे प्रमाण वर्षागणिक वाढत असून कायद्याचा धाक उरलेला नाही, हे त्यांनी प्रकर्षाने नमूद केले. या घटनेनंतर आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी जो लाठीचार्ज केला, त्यावरून त्यांनी सरकारला फटकारले. जी तत्परता आंदोलकांवर दाखवली जाते, ती महिलांचे शोषण करणाऱ्यांच्या विरोधात सरकार का दाखवत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या गंभीर समस्येच्या मुळाशी जाताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विस्कळीत झालेल्या समाजव्यवस्थेवर भाष्य केले. “आज महाराष्ट्राचे ‘लक्ष’ आणि ‘लक्ष्य’ दोन्ही विचलित झाले असून कोणाचाच कोणाकडे धाक उरलेला नाही,” असे ते म्हणाले. सत्ता मिळवण्याच्या आणि ती गाजवण्याच्या ‘भस्मासुरा’ने संपूर्ण महाराष्ट्र विस्कटून टाकला आहे. राजकारण्यांपासून लेखकांपर्यंत प्रत्येकाला केवळ सत्तेची हाव लागली आहे. वरच्या स्तरावर चाललेल्या या सत्तेच्या संघर्षाचे प्रतिबिंब समाजात खालपर्यंत उमटत असून, समाजातील दुबळा माणूसही आता स्वतःपेक्षा दुबळ्यांचे शोषण करताना दिसत आहे’, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

पूर्वी समाजात एकमेकांचा आणि ‘कोणीतरी आपल्याला बघत आहे’ याचा जो धाक असायचा, तो आता पूर्णपणे नष्ट झाला आहे. समस्या चांगल्या किंवा वाईट या दोन्ही प्रवृत्तीच्या असतात. त्यातल्या वाईट प्रवृत्तींवर समाजाची, कायद्याची जी दहशत, नियंत्रण असायला हवं तेच नाहीस झालेल दिसतंय. हाताबाहेर गेलेली लालसा, सत्तेची हाव, ओटीटी प्लॅटफॉर्मवरील हिंसक आशय आणि मोबाईलमध्ये गुंतलेला समाज यामुळे ही घडी विस्कटली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अशा घटनांनी महाराष्ट्र अधिक जखमी होत आहे. याच भान माध्यमं, राजकारणी आणि समाजांनी ठेवलं पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले. मी नेहमी माझ्या भाषणांत सांगतो की 1195 नंतर महाराष्ट्र आरपार बदलला. 1992 पासून जगाचे दरवाजे आपल्यासाठी उघडले गेले . उदारीकरणाचे वारे देशभर घुमू लागले , परंतु हे वारे आपण नीट समजूनच घेतले नाहीत. उदारीकरणाने प्रचंड फायदे झाले पण जिथे आम्हाला लोकशाहीच समजली नाही तिथे उदारीकरण काय समजणार? उदारीकरणाने सगळी जुनी मूल्यव्यवस्था उध्वस्त केली आणि नवी व्यवस्था इतकी व्यक्तिकेंद्रित आणि लालसाकेंद्रित केली की जर आपण आजच यावर सर्वांगाने विचार केला नाही तर मात्र आपला वाली कोणीच नाही हे नक्की, असंही त्यांनी लिहिले आहे.

ही मूल्यव्यवस्था सुधारण्यासाठी आणि विचलित झालेले महाराष्ट्राचे ‘लक्ष्य’ आणि भरकटलेलं ‘लक्ष्य’ पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन करत त्यांनी या कार्यात मनसे पूर्ण ताकदीने सोबत असेल, असं आश्वासनही दिले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana