Sunday, 15 Sep, 5.54 am सामना

ठळक बातम्या
सौदीवरील ड्रोन हल्ल्यानंतर जगावर 'तेल संकट'; किंमती वाढण्याची शक्यता

सौदी अरबमधील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत अरामको या तेलकंपनीच्या दोन संयंत्रांवर शनिवारी झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर सौदीतील तेल उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे जगावर तेल संकट ओढवण्याची शक्यता आहे. या हल्ल्यानंतर सौदीतील तेल उत्पादन प्रतिदिवसाला 50 लाख बॅरेलने घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सौदीतून जगभरात मोठ्या प्रमाणात तेल निर्यात करण्यात येते.

अरामकोच्या अबकैक आणि खुरैस या सयंत्रांवर ड्रोन हल्ला झाल्यानंतर या दोन ठिकाणचे तेल उत्पादन अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याचे उर्जामंत्री शहजादा अब्दुलअजीज यांच्या हवाल्याने सांगण्यात आले. त्याचप्रमाणे या हल्ल्यानंतर सौदीतील तेल वितरणावरही परिणाम झाला आहे. सौदीतही तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. या हल्ल्यामुळे सौदीतील तेल उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार असल्याने आखाती आणि आशियाई देशात तेलाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता असून तेलाची चणचण भासण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ड्रोन हल्ल्यानंतर जगाचे लक्ष सौदीकडे वेधले गेले आहे. या हल्ल्याप्रकरणी अमेरिकेने इराणवर टीका केली आहे. जगभरातील तेल वितरण रोखण्यासाठी इराणने सौदीवरील मोठ्या तेल कंपनीवर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोपिंयो यांनी इराणवर केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदीचे राजपुत्र मोहम्द बिन सलमान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून हल्ल्याबाबतची माहिती घेतली. येमेनच्या इराण समर्थक हुती बंडखोरांनी ड्रोन हल्ल्याची जबाबदारी स्विकारल्याने अमेरिकेने थेट इराणवरच निशाणा साधला आहे. जगभरात तेलाच्या किंमती वाढण्याबरोबच अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा संघर्ष उफाळण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top