Saturday, 28 Nov, 5.01 am सामना

ठळक
शेतकरी दिल्लीत घुसले, मोदी सरकार अखेर नमले

कृषी कायद्यांविरोधात एल्गार पुकारत दिल्लीत निघालेल्या पंजाब, हरयाणातील हजारो शेतकऱयांना रोखण्यासाठी भाजप सरकारने दडपशाही केली. बॅरिकेड्स, तारांचे कुंपण घालून महामार्ग रोखले, पोलिसांनी कडाक्याच्या थंडीत पाण्याचे फवारे मारले, अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडत लाठीमार केला. मात्र, बळीराजा मागे हटला नाही. अखेर शेतकऱयांनी राजधानीत धडक दिली आहे.

केंद्र सरकारने घाईत केलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशभर संताप आहे. पंजाबमध्ये दीड महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. या कायद्यात शेतमालास किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) हमी नसल्याने हे कायदे रद्द करावे अशी शेतकऱयांची मागणी आहे. त्यासाठी पंजाबमधील हजारो शेतकरी चार हजारांवर ट्रक्टर ट्रॉली घेऊन राजधानी दिल्लीकडे निघाले. विविध 30 शेतकरी संघटनांनी 'दिल्ली चलो' चा नारा दिला. मात्र, हरियाणातील भाजप सरकारने दडपशाही केली.

अखेर सरकार झुकले
पोलिसांच्या दडपशाहीला नाजुमानता शेतकरी दिल्लीकडे आगेकूच करीत राहिले. शेतकऱयांचा उद्रेक पाहून सरकार अखेर झुकले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी शेतकरी नेत्यांशी चर्चा केली आणि दिल्ली येण्याची परवानगी दिली. मात्र. रामलिला मैदानावर आंदोलन करण्यास मंजुरी दिली नाही. बुराडी येथील निरंकारी मैदानावर शेतकरी आंदोलन करणार आहेत. रात्री उशीरापर्यंत शेतकरी मैदानावर येत होते.

प्रचंड धुमश्चक्री
n राजधानी दिल्लीकडे येणारे सर्व रस्ते अडविण्यात आले होते. मोठे बॅरिकेट्स, तारेचे कुंपन घालण्यात आले. हरियाणा आणि दिल्ली पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात केला होता. n शुक्रवारी सिंधु सीमेवर पोलिसांनी वॉटर कॅननचा वापर केला. अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. तिकरी सीमेवरही पोलिसांनी पाण्याचे फवारे मारले, लाठीमार केला. तरीही शेतकरी मागे हटले नाहीत. n पंजाब शेतकऱयांच्या 'दिल्ली चलो' मार्चला हरियाणाप्रमाणेच पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकऱयांनीही पाठिंबा दिला. मेरठ, मुजफ्फरनगर, बागपतचे शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले. यामुळे उत्तर प्रदेश, हरियाणातून येणाऱया वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली.

ही तर फक्त सुरुवात आहे - राहुल गांधी
पंतप्रधानांनी लक्षात ठेवायला हवे जेव्हा अहंकाराचा सत्याशी सामना होतो तेव्हा अहंकाराचाच पराभव होतो. सत्याच्या लढाईत उतरलेल्या शेतकऱयांना कोणी रोखू शकत नाही. सरकारला काळे कायदे मागे घ्यावेच लागतील. ही तर फक्त सुरुवात आहे असे ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे.

दोन महिन्यांचे राशन घेऊन शेतकरी आले
पंजाबमधून येतानाच हजारो शेतकरी दोन महिने पुरेल एवढे राशन घेऊन आले आहेत. त्यामुळे दिल्लीतील निरंकारी मैदानावर शेतकरी अनेक दिवस ठाण मांडतील. दीर्घकाळ हे आंदोलन चालण्याची शक्यता आहे.

बिहार निवडणुकीत कोरोना नव्हता का?
आंदोलन करू नका, एकत्रित आल्यास कोरोना संसर्ग होईल असे पोलीस शेतकऱयांना सांगत होते. मात्र, बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचार केला. निवडणुका झाल्या तेव्हा कोरोना नव्हता का, असा सवाल शेतकऱयांनी केला.

स्टेडियम्सचे तुरुंग करून डांबण्याचा केंद्राचा डाव
राजधानीत येण्याची परवानगी दिली तरी शेतकऱयांना डांबून ठेवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी दिल्ली सरकारच्या ताब्यातील स्टेडियमचे तुरुंगात रूपांतर करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी दिला होता. मात्र, दिल्ली सरकारचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी स्टेडियम्स पोलिसांच्या ताब्यात देण्यास नकार दिला. शेतकऱयांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. तुरुंगात डांबता येणार नाही असे जैन म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top