Sunday, 07 Mar, 5.00 am सामना

ठळक
शिरीषायन - मोठ्यांच्या छोट्या गोष्टी : 2

>> शिरीष कणेकर

मी माझ्या मुलीच्या-श्वेताच्या लग्नाची पत्रिका द्यायला आशाताई भोसलेंकडे गेलो होतो (यापुढे उल्लेख फक्त 'आशा' हं! 'आये है दूर से मिलने हुजुर से…). सोबत कन्यारत्न होतंच. आशानं आमचं उत्साहानं स्वागत केलं.

''तू आधी माझ्याजवळ येऊन बस'' आशा कोचावर थोपटत म्हणाली, ''बाबांकडे लक्ष देऊ नकोस.''

माझ्याकडे लक्ष न द्यायला श्वेताला या वेळी सबळ कारण मिळालं होतं.

''मला सांग'', श्वेताचा हात हातात घेत आशा म्हणाली, ''तू लग्नात रिसेप्शनला काय ड्रेस घालणार आहेस?''

''शरारा.'' माझी मुलगी सुखावून म्हणाली.

''आपण रितू बेरीकडे जाऊ'' आशा त्याच उत्साहानं म्हणाली, ''मी येते तुझ्याबरोबर. एकापेक्षा एक भारी शरारे तुला पाहायला मिळतील. तुला पाहिजे तो निवड!''

माझ्या पोटात खड्डा पडला. रितू बेरी म्हणजे सिनेमावाल्यांची ड्रेस डिझायनर. तिचे भाव मला कसे परवडणार? मी रस्त्यावर आलो असतो. कदाचित आशानेही शराराची किंमत मोजली असती, पण सहृदय माणसाला लुबाडण्याबद्दल माझी ख्याती नव्हती.

मी (पोटातील) 'खड्डा भरो' मोहीम सुरू करणार तोच श्वेता म्हणाली, ''आम्ही शरारा ऑलरेडी घेतलाय.''

मी एवढय़ा मोठय़ानं सुटकेचा निःश्वास सोडला की, शेजारच्या फ्लॅटमधल्या लतालाही तो ऐकू गेला असेल. एक दरिद्री गिऱहाईक पाहण्याची रितू बेरीची सुवर्णसंधी मात्र हुकली.

''बरं, लग्नात नाचणार कोण आहे? कोणाला बोलावलंय?'' आशाचा पुढचा बॉम्बरूपी प्रश्न आला.

''प्रभुदेवा व हेलन'' हे उत्तर माझ्या तोंडी आलं होतं, पण प्रत्यक्षात माझ्या ओठांना कोरड पडली होती. लग्नात नाचायचं?

''मी नाचते मी नाचते'' आशा देवदुर्लभ उत्साहानं म्हणाली. मी खचलो.

मागे एकदा आशानंच सांगितलेला किस्सा. थोरली बहीण तिला म्हणाली, ''आशा, तू काय म्हणे स्टेजवरून गाताना नाचतेस?''

''छे गं!'' आशा उत्तरली, ''नाचत्येय कसली? उगीच आपली थोडे पाय थिरकवते.''

''त्यालाच नाचणं म्हणतात'' लता थंडपणे म्हणाली.

नाना कारणं सांगून मी आशाला नाचण्याची कल्पना सोडून द्यायला लावली. तरीदेखील ती रिसेप्शनला आल्यापासून जाईपर्यंत नाचेल ही भीती मला भेडसावत होती.

आज वाटतं की, मी उगीचच घाबरलो. मी तिला नाचू द्यायला हवं होतं ('चैन से हमको कभी आपने जीने न दिया'!). आम्हाला व सर्व उपस्थित निमंत्रितांना आयुष्यभर पुरणारी आठवण मिळाली असती. माझ्या ('शरारा' फेम) मुलीनं अमेरिकेत हिंदुस्थानी मैत्रिणींना अभिमानानं सांगितलं असतं, ''यू नो, माझ्या लग्नात आशा नाचली होती.''

मैत्रिणींना वाटलं असतं की, श्वेता फेकत्येय, बापावर गेल्येय.

ओ. पी. नय्यर माझ्याकडे जेवायला आला होता. येताना तो माझ्यासाठी 'काश्मिर की कली'ची एल. पी. घेऊन आला. मी वाजवणार कशावर? मी मार्क केलं की, हातातली पिन फिरवून ती वाजत नाही ('गरिबी हा गुन्हा नाही, पण ती अडचण आहे' या अर्थी एक इंग्रजी म्हण आहे. मला न भेटताच ती कुणी, कशी लिहिली?) आजही ती एल. पी. ट्रंकेत तळाशी पडून आहे.

ओपीला विचारून, त्याचं पथ्यपाणी जाणून घेऊन आम्ही मेनू ठरविला. पुरी, बासुंदी, बटाटय़ाची भाजी, व्हेज पुलाव वगैरे. जेवायला बसल्यावर भरलेल्या ताटाकडे बघून ओ. पी. म्हणाला, ''गोड नको, तेलकट नको, बटाटा नको, भात नको.''

क्षणभर मी हतबुद्ध झालो व मग म्हणालो, ''उठा आता. हात धुऊन घ्या. तुम्ही खाऊ शकाल असं काहीच नाही.''

त्यानंतर ओ. पी. गुमान जेवला. बासुंदी पुन्हा मागूनही घेतली. भंपक बेटा!

एकदा आमचं चाललं होतं की, सी. रामचंद्र व ओ. पी. नय्यर यांना एकत्र आणायचं व गप्पा मारायला लावायचं. त्यावर अर्थातच लेख करायचा. अण्णा रामचंद्र एका पायावर तयार झाले. ओ. पी. 'कां कू' करत राहिला.

''क्या हुवा नैय्यर साब?'' अखेर मी वैतागून विचारलं.

''अरे यार, लफडा कायकू? रामचंद्र लता को गाली देगा. मैं आशा को गाली दूंगा. पाहिजे कशाला नसतं झंझट?''

''गाली दूंगा म्हणजे?'' मी उसळून म्हणालो, ''मत देना. गाली देना कम्पल्सरी है क्या? बोलण्यासारखं दुसरं काही तुमच्या आयुष्यात राहिलंच नाही का आता?''

ओ. पी. काही बोलला नाही. त्यानं नुसतंच तोंड वेडंवाकडं केलं.

सी. रामचंद्र व ओ. पी. नय्यर यांची अखेर भेट झालीच नाही. ते स्वतंत्रपणे शिव्या देत राहिले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top